लोकप्रिय मराठी दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांनी दिग्दर्शित केलेला धर्मवीरः मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. ठाणे जिल्ह्याचे नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता, ज्यामध्ये अभिनेते प्रसाद ओक यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र नुकतेच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा चित्रपट पुर्णतः व्यावसायिक चित्रपट असल्याचे म्हणले आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी प्रदर्शित झालेला धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटात एकनाथ शिंदे यांचीही भूमिका दाखवण्यात आली होती. तेव्हापासूनच या चित्रपटावर एकनाथ शिंदे यांची प्रतिमा निर्मीती केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी पहिल्यांदाच मत व्यक्त केले आहे.
नुकतेच आनंद दिघे यांनी शिर्डी साईबाबाचे दर्शन घेतले. त्यावेळी माध्यमांनी त्यांना धर्मवीर चित्रपटाबद्दल काय वाटते असे विचारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “धर्मवीरः मुक्काम पोस्ट ठाणे हा पुर्णतः व्यावसायिक चित्रपट आहे. दिघेसाहेब हे दोन-तीन जणांतच वावरले नाहीत. त्यांच्याच आयुष्यात बदल व्हावा म्हणून त्यांनी काम केले नाही. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्या प्रत्येकाच्याच आयुष्यात बदल व्हावा म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर तीन तासांचा चित्रपट नव्हेतर सिरीज काढावी लागेल.”
दरम्यान धर्मवीरःमुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात प्रसाद ओक, स्नेहल तरडे, क्षितीज दाते यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई होते.
हेही वाचा-
सिक्सपॅक दाखवत टायगर श्रॉफने समुद्रकिनारी दिल्या खतरनाक पोझ, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
लेखकाला दुसरं काही सुचत नाही का? यामुळे ‘मुलगी झाली हो’ मालिकेवर संतापले प्रेक्षक