[rank_math_breadcrumb]

अरिजीत सिंहने अचानक निवृत्ती का घेतली? कारण झाले स्पष्ट

27 जानेवारी 2026 हा दिवस संगीतप्रेमींसाठी निराशाजनक ठरला आहे. प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह यांनी प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली असून मंगळवारी संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली. या घोषणेनंतर चाहते भावनिक झाले असून त्यांच्या निर्णयामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर विविध चर्चा आणि थिअरीज सुरू झाल्या असून अनेक चाहते कमेंट्सद्वारे अरिजीतकडे थेट प्रश्न विचारत आहेत.

निवृत्तीची घोषणा करताना अरिजीत सिंह (Arijit Singh)यांनी लिहिले, -“हॅलो, आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. इतकी वर्षे श्रोते म्हणून मला भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. मला हे सांगताना आनंद होत आहे की आता मी प्लेबॅक व्होकॅलिस्ट म्हणून कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. या प्रवासाला मी अलविदा म्हणतो. हा एक अद्भुत प्रवास होता.”यानंतर लगेचच त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत म्हटले, “देव माझ्यावर फार मेहरबान राहिला आहे. मी चांगल्या संगीताचा चाहता आहे आणि पुढे एक लहान कलाकार म्हणून अधिक शिकत राहीन व स्वतःच्या जोरावर काम करेन. तुमच्या पाठिंब्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.”

अरिजीत सिंह यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी फक्त प्लेबॅक सिंगिंगमधूनच निवृत्ती घेतली आहे. ते संगीतापासून दूर जात नाहीत. त्यांनी पुढे लिहिले, “माझी काही पेंडिंग कामे अजून बाकी आहेत, ती मी पूर्ण करणार आहे. त्यामुळे यावर्षी तुम्हाला माझी काही गाणी रिलीज होताना दिसू शकतात.”

या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क सुरू झाले. काही चाहत्यांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला, तर अनेकांनी त्यांना पुन्हा विचार करण्याची विनंती केली. यावर स्पष्टीकरण देताना अरिजीत म्हणाले की या निर्णयामागे एक नाही, तर अनेक कारणे आहेत. ते म्हणाले, “मी खूप लवकर कंटाळतो. म्हणूनच एका गाण्याचं अरेंजमेंट बदलून ते स्टेजवर वेगवेगळ्या पद्धतीने सादर करतो. मला वेगळ्या प्रकारचं संगीत करायचं आहे.”

अरिजीत सिंह यांनी इंडियन क्लासिकल म्युझिककडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका चाहत्याने हा सगळा प्रकार विनोद तर नाही ना, असा प्रश्न विचारला असता अरिजीत यांनी स्पष्ट केले की ते कोणाच्याही भावना दुखावत नाहीत.
ते म्हणाले की ते फक्त बॉलिवूड प्लेबॅक सिंगिंगपासून दूर जात आहेत, मात्र संगीताशी—विशेषतः इंडियन क्लासिकल म्युझिकशी—त्यांचं नातं कायम राहील. पुढे त्यांनी सांगितले की ते स्वतःचं संगीत तयार करतील आणि जेव्हा ते पूर्णपणे तयार असेल, तेव्हा ते प्रेक्षकांसमोर घेऊन येतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

पलाश मुच्छल यांनी विज्ञान माने यांच्याविरुद्ध दाखल केला मानहानीचा खटला; वकिलासह पोहोचला अंधेरी न्यायालयात