Wednesday, July 3, 2024

मराठीतील आघाडीची अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी आज आहे अंथरुणाला खिळून

मधू कांबीकर म्हणजे मराठी चित्रपट, लावणी क्षेत्राला लाभलेले एक वरदानच. मधू कांबीकर यांनी त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर श्रीराम लागू यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवली. त्यांनी चित्रपट आणि नाटकात त्यांच्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तर नृत्याने लोकांचा मनाचा मुजरा मिळवला. मात्र याच मधू कांबीकर ह्या सध्या या क्षेत्रापासून त्यांच्या आजारामुळे दुरावल्या गेल्या असून त्या सध्या अंथरुणाला खिळल्या आहेत.

मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ मध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे झाला. तेथेच त्यांनी तिसरीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडीलही कलाकार होते. ते त्यांना नाटकांना घेऊन जात. त्यातून त्यांची कलावंत म्हणून जडणघडण झाली. पुढे त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण कांबी या गावी पूर्ण केले. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी पुण्याच्या बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले, तर वयाच्या १३-१४ व्या वर्षी मधू कांबीकर यांनी गुरू पांडुरंग घोटीकर व लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्याकडे लावणी नृत्याचे धडे घेतले. येथूनच मधू कांबीकर यांचा लोककलेचा प्रवास सुरु झाला.

लावणीच्या चाहत्या वर्गाला लावणीचा इतिहास कळावा, यासाठी त्यांनी लावणीबाबतचे जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून त्याद्वारे तमाशाचा इतिहास गुंफण्याचे महत्त्वाचे काम केले. हे अवघड काम यशस्वी करण्यासाठी मधू कांबीकरांना त्याच्या तमाशा फडातील ११ कलाकारांनी भरपूर मदत केली. या इतिहासावर आधारित ’सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम कांबीकर रंगमंचावर सादर करायच्या.

१९८३ साली आलेल्या ‘शापित’ या सिनेमातून मधू कांबीकर यांनी चित्रपटात पदार्पण केले आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक दर्जेदार अभिनेत्री मिळाली. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना १९८३ सालची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राज्य शासनाने गौरवले, तसेच ‘फिल्मफेअर’ हा मानाचा पुरस्कारही लाभला. अभिनयाची कारकिर्द सुरू झाल्या-झाल्या मानाचे पुरस्कार मधू कांबीकरांना लाभले, यातूनच त्यांची अभिनयक्षमता सर्वांच्या लक्षात आली. मधू कांबीकरांनी निळू फुले यांच्यापासून, जब्बार पटेल, अशोक सराफ, नाना पाटेकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले.

डिसेंबर २०१६ मध्ये ‘लावण्य संगीत’ या ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. तरीही त्यांनी भैरवीचे सादरीकरण केले. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला. काही वर्षांपूर्वी अशाच एका कार्यक्रमात त्यांना त्रास झाला होता. त्यामुळे त्यांनी नृत्य न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीही त्या यावेळी त्यांची कला सादर करण्यासाठी मंचावर आला होत्या. तेव्हापासून मधू कांबीकर अभिनयापासून दूर आहेत.

हे देखील वाचा