Saturday, July 6, 2024

वयात २२ वर्षांचे अंतर असूनही अमिताभ यांचे खास मित्र होते आदेश; वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी झाला मृत्यू

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन यांचा दर्जा सर्वात मोठा आहे. या मागे त्यांची प्रतिभा तसेच प्रेक्षकांकडून भरपूर मिळालेले प्रेमही आहे. तसेच त्यांना आयुष्यात संघर्षमय प्रसंगांचाही सामना करावा लागला होता. यादरम्यान त्यांना इंडस्ट्रीमधूनही पाठिंबा मिळाला. अमिताभ देखील प्रत्येकाच्या मर्जीचा विचार करतात आणि प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात एक विशेष स्थान देतात. जेव्हा अमिताभ यांनी आपला दुसरा डाव सुरू केला, तेव्हा आदेश श्रीवास्तव यांनी त्यांच्या काही चित्रपटांमध्ये संगीत दिले आणि ‘बिग बीं’साठी गाणी देखील गायली. ‘शावा शावा’ हे गाणे कोण विसरू शकेल? आदेश यांच्याशी अमिताभ यांची मैत्री व्यावसायिक संबंधांमुळेही घट्ट झाली होती. चला तर मग संगीतकाराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघांच्या खास मैत्रीबद्दल जाणून घेऊया…

१०० चित्रपटांमध्ये संगीत दिले
आदेश श्रीवास्तव यांचा जन्म ४ सप्टेंबर, १९६४ रोजी जबलपूर येथे झाला होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी आरडी बर्मन आणि राजेश रोशन यांच्या ड्रमरची भूमिकाही बजावली होती. यानंतर ते स्वतंत्र संगीत दिग्दर्शक झाले. त्यांनी सुमारे १०० चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय ते ‘सा रे गा मा पा’मध्ये परीक्षाच्या भूमिकेतही दिसले. काही चित्रपटांमध्ये त्यांनी आवाजही दिला. अमिताभ बच्चन यांच्या नंतरच्या करिअरमध्ये चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्यात ‘लाल बादशाह,’ ‘दीवार,’ ‘मेजर साहब,’ ‘बाबुल,’ ‘बागवान,’ ‘आँखें,’ ‘कभी खुशी कभी गम’सह अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आदेश श्रीवास्तव यांनी ‘बिग बीं’ची ‘शोना शोना’ आणि ‘शावा शावा’ ही सुपरहिट गाणी गायली आहेत.

वयातील अंतर २२ वर्षे, पण मैत्री जबरदस्त
दोघांच्या वयात २२ वर्षांचा फरक होता. परंतु असे असूनही त्यांची मैत्री खूप घट्ट होती. मिळालेल्या माहितीनुसार, आदेश यांच्या खालावलेल्या तब्येतीबद्दल ऐकल्यानंतर अमिताभ खूप चिंतेत पडले होते. त्यांनी आदेश यांच्या वैद्यकीय परिस्थितीचा आढावा घेतला आणि जी काही मदत करता येईल ती केली. अमिताभ यांनी त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला होता. एवढेच नाही, तर अमिताभ जेव्हाही आदेश यांना भेटायचे तेव्हा ते त्यांना खूप उत्साही वाटेल असे वागायचे. दोघेही म्युझिक स्टुडिओमध्ये जायचे आणि संगीत तयार करायचे. त्यांच्या उपस्थितीत ते आदेश यांना बिघडलेल्या तब्येतीची जाणीव करून देत नसायचे. याशिवाय, आदेश यांच्या मृत्यूनंतर ‘बिग बीं’नीही त्यांच्या कुटुंबाला आधार दिला.

वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला
आपल्या ५१ व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आदेश श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला. ते कर्करोगाने ग्रस्त होते आणि बराच काळ आजारी होते. २०१० मध्येच त्यांना त्यांच्या आजाराची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि ते बरे झाले, पण ५ सप्टेंबर, २०१५ रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवसानंतर आदेश यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे लग्न विजया पंडितशी झाले होते. त्यांना अवितेश आणि अविनेश नावाची दोन मुले आहेत. अवितेश कला क्षेत्राशी निगडीत आहे आणि अविनेश अभिनेता-गायक आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

हे देखील वाचा