Monday, July 1, 2024

किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमारला सोनू निगमचा पाठिंबा; मनोज मुंतशिर अन् आदित्य नारायणवर साधला निशाना

टेलिव्हिजन क्षेत्रातला सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी शो म्हणून नेहमीच ‘इंडियन आयडल’ या शो कडे पाहिले जाते. संगीताच्या, गायनाच्या क्षेत्रात नाव कमावण्याच्या उद्देशाने या शोमध्ये स्पर्धक येतात. या शोने आतापर्यँत चित्रपटसृष्टीला अनेक मोठे गायक दिले आहेत. सध्या ‘इंडियन आयडल’ शो चे १२ वे पर्व सुरु आहे. मात्र, ‘इंडियन आयडल’च्या सर्व पर्वांमधे आता सुरू असलेले पर्व सर्वात जास्त गाजत आहे.

मात्र, हे पर्व शो संबंधित उठणाऱ्या वादांमुळे गाजताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शोमध्ये किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी हजेरी लावली होती. पण त्यांनी हजेरी लावलेला एपिसोड प्रदर्शित होताच अमित यांनी शोवर टीका केली होती. सोबतच सुनिधी चौहान, अभिजित सावंत यांनी देखील या शोबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

यासर्वांमध्ये बॉलिवूडमधील आघाडीचा गायक आणि ‘इंडियन आयडल’चा परीक्षक म्हणून काम केलेला गायक सोनू निगमने आता या वादावर त्याची बाजू मांडली आहे. त्याने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत अमित कुमार यांना त्याचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्याने मनोज मुंतशिर आणि आदित्य नारायणवर निशाणा साधला आहे.

सोनू निगमने या व्हिडिओमध्ये सांगितले की, ‘मागील काही दिवसांपासून इंडियन आयडल या शोवरुन अनेक वाद सुरु आहे. मात्र, तरीही मी शांत होतो. पण आता मात्र मला असे वाटत आहे की, मी आता बोलायला पाहिजे. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये जेष्ठ गायक आणि किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार पाहुणे म्हणून आले होते. अमित कुमार खूप मोठे गायक आहेत. वैयक्तिकरीत्या मला असे वाटते की त्यांचे शोबद्दल असलेले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे.’

पुढे सोनू म्हणाला, ‘अमित कुमार हे अतिशय साधे आणि सरळ व्यक्ती आहेत. ते काही बोलत नाही याचाच फायदा घेतला जात आहे. मी इंडियन आयडलच्या संपूर्ण टीमला सांगू इच्छितो, की हे प्रकरण इथेच थांबवा. या सर्व वादात इंडियन आयडल शो किंवा अमित कुमार यांची कोणतीच चूक नाही, तर चूक आहे ती, आदित्य नारायण आणि मनोज मुंतशिर यांची. कारण ते मध्ये येऊन या प्रकरणावर त्यांचे मत मांडताना दिसत आहेत. तुम्ही सर्वांनी अमित कुमार यांचा आदर करायला हवा कारण ते इंडस्ट्रीमधील दिग्गज लोकांपैकी एक आहेत.’

‘इंडियन आयडल १२’मध्ये यापूर्वी एका खास एपिसोडमध्ये अमित कुमार यांना पाहुणे म्हणून बोलावले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्यांनी सांगितले होते की, ‘स्पर्धकांची प्रशंसा करण्यासाठी निर्मात्यांनी त्यांना सांगितले होते.’ त्यांना कोणत्याही स्पर्धकाची कामगिरी आवडली नव्हती. यानंतर अनेक चाहते आणि कलाकारांनी यावर आपले मत मांडले होते. शोचे परीक्षक मनोज मुंतशिर यांनीही या वादावर आपले मत व्यक्त केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा