Monday, July 1, 2024

‘तुमची हिम्मतच कशी झाली?’ म्हणत लग्नात घुसून राडा घालणाऱ्या त्रिपुराच्या जिल्हाधिकाऱ्यावर भडकला सोनू निगम, व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे आपले स्वतःचे मत सोशल मीडियावर ठामपणे मांडत असतात. मात्र, काही कलाकार असेही आहेत, जे चाहत्यांचा विचार करून काही गोष्टींबाबत सोशल मीडियावर आपले मत मांडत असतात. पश्चिम त्रिपुराचे डीएम (District Magistrate) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते कोरोना दरम्यानच्या लग्नावर कारवाई करण्यासाठी पोहोचले होते. या व्हिडिओमध्ये जिल्हाधिकारी शैलेश यादव खूप रागावलेले दिसत आहेत. डीएम यांनी राडा घालत, कागदपत्र दाखविल्यावर पण त्यांनी ते फाडून टाकले, आणि हवेत उडवून दिले. डीएम यांची ही प्रवृत्ती पाहून सर्वजण त्यांच्यावर खूप टीका करत आहेत. त्याचबरोबर भारताचा प्रसिद्ध गायक सोनू निगम यानेही कडक शब्दात याचा निषेध केला आहे.

डीएम यांच्या वर्तनाचा निषेध करणारा स्वत: चा एक व्हिडिओ सोनू निगमने शेअर केला आहे. त्यामध्ये तो म्हणतो की, ‘मी बर्‍याचदा माझ्याबद्दल बोलतो, पण मला हा व्हिडिओ बघणे थांबवता आले नाही. मी डीएम शैलेश कुमार, यांना एका लग्नात जाताना पाहिले, आणि लोकांना फटकारताना पाहिले. लोकांनी परवानगी घेतली होती की नाही, हे मला माहिती नाही, परंतु त्यांनी परवानगी घेतल्याचे ते व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.’

सोनू पुढे प्रश्न उपस्थित करत म्हणाला, ‘डीएम साहेब, ही काय पद्धत आहे? आपण कोणत्या देशात राहतो? अशा प्रकारे आपण आपल्या देशवासीयांशी कसे बोलू शकतो? प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा हक्क आहे. आपण कोणाचे ऐकूनच घेत नाही आहे. सगळ्यांना अटक करा, अटक करा असे म्हणत आहात. तुम्ही नवरदेवाचा कॉलर पकडून धक्का देता. तुमची हिम्मतच कशी झाली? आपण आपल्या सामर्थ्यावर एवढा गर्व करता का? पंतप्रधान मोदींकडेही असे काही नाही. जेव्हा ते लोकांशी बोलतात, तेव्हा तेही मान राखून बोलतात.’

‘तुम्ही डीएम आहात, राजा नाही. राजवाडा या देशातून गेला. अशा वेळी जेव्हा भारत कठीण काळातून जात आहे. प्रत्येकजण काळजीत आहे. अशा वेळी केवळ गरीब लोकच नाही, तर सर्व स्तरातील लोक दु: खी आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते देखील अस्वस्थ आहेत. अशा वेळी आपण एकमेकांचे समर्थन केले पाहिजे,’ असे आपला राग व्यक्त करताना सोनू म्हणाला. तो पुढे म्हणाला की, ‘अशा लोकांना पदावर ठेवू नये, जे त्यासाठी पात्र नाही.’

‘तुम्हाला शिक्षा व्हावी, असे मी म्हणणार नाही. कारण तुमचेही एक कुटुंब आहे. आपणास माहित आहे की, लग्न ही एक विशेष गोष्ट आहे. विवाह हा दोन कुटुंबांचा एक विशेष कार्यक्रम आहे. हा दिवस लोक नेहमीच लक्षात ठेवतात. आपणास असे वाटते का, या कुटुंबास हे लग्न कधीही लक्षात ठेवावेसे वाटेल. ते आयुष्यभर विसरणार नाही. आयुष्यात एकदा ही संधी येते, आपण ती देखील खराब केली. अशा वेळी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. जर कोणाला काही आनंद मिळत असेल, तर तो आनंद त्यांना मिळुदेत,’ असेही डीमबद्दल बोलताना सोनू म्हणाला.

या प्रकरणात, डीएम यांच्या गैरकारभाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या हस्तक्षेपानंतर डीएम यांना निलंबित केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर झाली मुंबई विमानतळावर स्पॉट, हातावरील टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष

-स्लो मोशन स्टाईलमधील उर्वशी रौतेलाचा खास व्हिडिओ आला समोर; ग्लॅमरस स्टाईल पाहून चाहते झाले फिदा!

-‘कॉल मी’ गाण्यावर नोराचे भन्नाट एक्सप्रेशन्स, पाहून तुम्हीही म्हणाल ‘झक्कास!’

हे देखील वाचा