देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे सिद्ध झाले आहे. दररोज लाखोच्या संख्येने नागरिक कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. यात अबालवृद्धांसह तरुणही बाधीत होताना दिसत आहे.
राजकारण्यांप्रमाणे बॉलिवूडलाही कोरोनाचा विळखा पडत असल्याचे मागील काही दिवसांपासून दिसत आहे. त्यातच आता लॉकडाऊन काळात हजारो नागरिकांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद यालाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोनूने याबाबत स्वतः माहिची दिली आहे.
सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यात लिहिले आहे की, “नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, माझी कोव्हिड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. काळजी करण्याची गोष्ट नाही. उलट, तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी माझ्याकडे आता आधीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, कोणत्याही अडचणीत.. मी तुमच्यासोबत आहे.”
सोनू सूदने ही इन्टाग्राम पोस्ट करताच त्याचे अनेक चाहते तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. सोनू सूदने एक ट्विट करत त्याच्या ट्विटर फॉलोअर्सला देखील तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. त्याच्या या ट्विटला अर्ध्या तासाच हजारो लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे.
???? pic.twitter.com/ZRkapUQXFK
— sonu sood (@SonuSood) April 17, 2021
देशात सध्या कोरोनाचा हाहाकार
भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार शुक्रवारी देशात २.३४ लाख नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच शुक्रवारी एकाच दिवशी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे १ हजार ३४१ लोकांचा जीव गेला आहे.