दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक जबरदस्त सिनेमा ३ जून, २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाची चर्चा फक्त दक्षिण भारतातच नाही, तर जगभरात होतेय. तो सिनेमा म्हणजेच ‘विक्रम’ होय. आता हा सिनेमा प्रदर्शित होऊन २२ दिवस उलटलेत. मात्र, तरीही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा राज करतोय. यामुळे हा सिनेमा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा कॉलिवूड सिनेमा ठरला आहे. चित्रपटगृहात या सिनेमासाठी प्रेक्षक अजूनही गर्दी करताना दिसत आहेत. या सिनेमात दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. चाहते सिनेमातील त्यांच्या कामाची प्रशंसा करत आहेत.
‘विक्रम’ (Vikram) या सिनेमातून कमल हासन (Kamal Haasan) यांनी ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. पुनरागमन करताच ते धमाल करत आहेत. या सिनेमापुढे सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) अभिनित ‘सम्राट पृथ्वीराज‘ (Samrat Prithviraj) हा सिनेमा पिछाडीवर पडला आहे. ‘विक्रम’ सिनेमाने दाक्षिणात्य भागासोबतच ऑस्ट्रेलिया, यूएई, युके आणि इतर अनेक देशांमध्ये जबरदस्त यश मिळवत आहे.
‘विक्रम’चे यश आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ला अपयश
‘विक्रम’ सिनेमाच्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत बोलायचं झालं, तर सिनेमाने आतापर्यंत ३९०.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा सिनेमा लवकरच ४०० कोटींचा आकडा पार करू शकतो. ३ जून, २०२२रोजी या सिनेमासोबतच अक्षयचा ‘सम्राट पृथ्वीराज’ सिनेमाही प्रदर्शित झाला होता. मात्र, अक्षयच्या सिनेमाला आतापर्यंत फक्त १०० कोटी रुपयांची कमाईदेखील करता आली नाहीये. ‘सम्राट पृथ्वीराज’ सिनेमाच्या निर्मितीसाठी ३०० कोटी रुपयांचे बजेट लागले होते. त्यामुळे आता या सिनेमाचे जवळपास २५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, फक्त १५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘विक्रम’ सिनेमाने आपल्या बजेटच्या तुलनेत दुप्पट कमाई केली आहे.
या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘विक्रम’
अवघ्या ८६ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या ‘सम्राट पृथ्वीराज’ सिनेमाचे शो चित्रपटगृहातून हटवण्यात आले आहेत. कारण, प्रेक्षकांना इम्प्रेस करण्यात या सिनेमाला अपयश आले आहे. दुसरीकडे, जवळपास ४०० कोटींची कमाई करणारा ‘विक्रम’ सिनेमा अजूनही कमाईचे विक्रम मोडत आहे. हा सिनेमा ८ जुलैपासून तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये डिज्नी+ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन ‘विक्रम’ सिनेमा पाहू न शकणाऱ्या चाहत्यांना हा सिनेमा घरबसल्या ओटीटीवर पाहता येऊ शकतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-