Monday, July 1, 2024

सिनेमात काम करण्यासाठी ‘पंजाबी कुडी’ रिचाला आई-वडिलांनी दिलेला ‘हा’ महामंत्र, आज बनलीय बॉलिवूड स्टार

बॉलिवूडमध्ये कलाकार येतात- जातात. कुणाला गॉडफादर मिळतो, त्याचं बोट धरून काही कलाकारांचं करिअर रुळावर येतं, पण ज्यांना गॉडफादर नसतो, त्यांचं इंडस्ट्रीत टिकणं तसं जरा अवघडंच असतं. प्रत्येक क्षणाला कलाकाराला इथे एक वेगवेगळ्या कसोटीला सामोरं जावं लागतं. जे या कसोटीला सचोटीने सामोरे जातात तेच कलाकार बॉलिवूडमध्ये यश मिळवतात. पण या क्षेत्रात येण्यापूर्वी कलाकारांना त्यांच्या कुटुंबाकडून सपोर्ट मिळेलच असं थोडीचे ना. काही कलाकार आपण आपलं १००टक्के देऊन यश मिळवू असं वचन देऊन या क्षेत्रात येतात आणि इंडस्ट्रीत खास स्थानही मिळवतात. अशाच एका गुणी कलाकाराविषयी आपण बोलणार आहोत, ती अभिनेत्री आहे रिचा चड्ढा.

रिचाच्या आयुष्यातही इंडस्ट्रीतला कोणताही गॉडफादर नव्हता, तर तिचे आई-वडीलच तिचे गॉडफादर होते, ज्यांनी तिला या क्षेत्रात येण्यासाठी टिपिकल भारतीय आई-वडिलांसारखं आधी आडकाठी केली. नंतर त्यांनी फुल सपोर्ट केला. तिच्या आई-वडिलांनी तिला सिनेमात काम करण्याबद्दल जे काही सांगितलं, ते आजच्या प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांसाठी गरजेचं आहे. तिच्या आई-वडिलांनी तिला असा काय महामंत्र दिला होता, हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

पंजाबी कुडी असलेली रिचा चड्ढा १८ डिसेंबर, १९८६ रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मली होती. तिचे वडील एका मॅनेजमेंट फर्मचे मालक आहेत, तर तिची आई दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका आहे. रिचानं तिचं शिक्षण दिल्लीतनं पूर्ण केलं होतं. हा किस्साही यादरम्यानचाच आहे, म्हणजेच रिचानं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतरचा. आता कॉलेज संपल्यानंतर पुढचा निर्णय होता करिअर निवडण्याचा. टिपिकल भारतीय आई-वडिलांसारखं रिचाच्या घरच्यांनीही तिच्याकडून सगळे फॉर्म वगैरे भरवून घेतले. यादरम्यानच तिनंही गुपचूप FTII चा फॉर्म भरूनच टाकला. घरी जेव्हा समजलं, तेव्हा तिला विचारण्यात आलं. खरंच अभिनेत्री व्हायचंय? ही तर तुझी फक्त हॉबी होती ना? तिला घरच्यांनी सांगितलं. गप गुमान १ वर्षे पत्रकाराची नोकरी कर. कुठं तरी जा, हवा- पाण्यात बदल कर. तिनंही मुलाखती द्यायला सुरुवात केली. वकिलीपासून एमबीएपर्यंत सर्वांना फोन घुमवले. रिचाला कळून चुकलं होतं कितीही परीक्षा दिल्या, तरीही आवड तर एकाच गोष्टीत आहे. तिनंही आई-वडिलांशी चर्चा केली. विश्वास दिला की, स्वत:चं पोट भरू शकेल, इतकं तर ऍक्टिंगमधून करेलच. त्याबदल्यात तिनं घरच्यांकडं फक्त एकच गोष्ट मागितली, त्यांचा सपोर्ट.

कुटुंबाने आधी थोडा विचार केला, मग तिला हिरवा कंदील दाखवला. फुल्ल सपोर्टसोबत लेकीला स्वप्ननगरी म्हणजेच मुंबईत पाठवलं. असंही नव्हतं की, रिचाला मुंबईत आल्या आल्या काम मिळू लागलं. त्यासाठी तिनं घरच्यांकडून पैसे मागवले. कोणता तरी बेकार सिनेमात काम करण्यापेक्षातरी हेच चांगलं होतं. घरच्यांकडून पैसे मागवल्यानंतर रिचाने एकेदिवशी आईला फोन करत विचारलं. तुला नाही का वाटत आता मी स्वत:ला कमवलं पाहिजे. माझ्या वयात तर तू शिक्षिका बनली होती. आईनेही तिला उदाहरण देत समजवलं. “जुन्या काळात राजा- रानी कलेचं संरक्षण करत होते. तूसुद्धा असंच समज की, आम्हीच तुझे राजा- रानी आहोत आणि दर महिन्याला तुझ्या कलेसाठी आम्ही तिला काही हजार-एक रुपये पाठवत राहू. तू कलाकार आहेस, फक्त आपल्या प्रवासाची मजा लूट.”

रिचाच्या आई-वडिलांचा आणि फिल्मी दुनियेचा काडीमात्र संबंध नव्हता. त्यांच्या आणि रिचासाठी शुक्रवारच्या दिवसाचं महत्त्व वेगळंय. अनेकदा रिचाला कुतूहलाने तिचे आई-वडील विचारायचे की, तुझा नवीन सिनेमा कधी येतोय? बरं, तू खरंच यासाठी केस कापलेत का? वगैरे वगैरे.

पुढं मॉडेल म्हणून रिचानं पदार्पण केलं. परंतु त्यानंतर तिनं नाटकात काम करायला सुरुवात केली. रिचा पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘ओए लकी लकी ओय’ या सिनेमातून दिसली होती. या सिनेमात तिनं छोटीशी भूमिका साकारली होती. २००८ मध्ये आलेल्या या सिनेमानंतर ती २०१० मध्ये आलेल्या बेनी आणि बबलू या सिनेमात पुन्हा एकदा छोट्या भूमिकेत दिसली होती.

सन २०१२मधील ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमाच्या पहिल्या भागात रिचा पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसली होती. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा सिनेमा प्रचंड गाजला आणि सिनेमात नगमा खातूनची भूमिका साकारल्याबद्दल रिचाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर समीक्षकांचा पुरस्कार मिळाला. पुढे याच सिनेमाच्या दुसर्‍या भागात देखील रिचा दिसली.

त्यानंतर पुढं ती ‘फुकरे’ आणि मग ‘मसान’ या सिनेमाच्या पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर मुख्य भूमिकेत झळकली. तिचे हे सर्व सिनेमे सलग यशस्वी ठरले आणि आणि ऋचा चड्ढा बॉलिवूडमध्ये नावारूपास आली.

रिचाची ही कहाणी मुलींना जग जिंकण्यासाठी प्रोत्साहन तर देईलच, पण त्याहीपेक्षा हे त्या मुलींच्या पालकांसाठी खूप गरजेचं आहे आणि त्यांची जबाबदारी आहे की, आपल्या मुलींना मुक्तपणे उडता यावं यासाठी त्यांच्या स्वप्नांना पंख दिले पाहिजेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
देसी गाण्यांवर व्हिडिओ बनवून भारतीयांचं लक्ष वेधून घेणारे ‘हे’ फॉरेनर्स आहेत तरी कोण? जाणून घ्याच
लग्न, मुलं-बाळं होऊनदेखील साऊथच्या ‘या’ कलाकारांचे बाहेर होते अफेअर; यादीत बडे ऍक्टरही सामील
सनी देओल सोडाच, रजनीकांत यांच्यावरही भारी पडली होती श्रीदेवी; तिनंच ठरवलेलं सिनेमात कुणाला करायचं कास्ट

हे देखील वाचा