×

स्पृहा जोशीने तिच्या ‘फर्माइश’च्या भागात प्रेक्षकांना ऐकवली स्वतःच्याच लोपामुद्रा कविता संग्रहातील ‘शब्द’ कविता

स्पृहा जोशी मराठी सिनेविश्वातील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच उत्तम लिखाणासाठी देखील स्पृहाचे नाव घेतले. अभिनय, लिखाण, सूत्रसंचालन आदी सर्वच क्षेत्रात आपल्या ठसा उमटवणाऱ्या स्पृहाने काही दिवसांपासून एक उत्तम आणि हटके उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये ती तिच्या यूट्यूब चॅनेलवर तिच्या चाहत्यांच्या विविध फर्माइश पूर्ण करताना दिसते. यामध्ये ती विविध कवितांचे वाचन करते आणि काही खास दिवसांचे औचित्य साधत त्या विशिष्ट दिवसाला अनुसरून कविता किंवा वेगळा कार्यक्रम देखील सादर करते.

दर थोड्या दिवसांनी स्पृहा तिच्या चॅनेलवरती तिचा एक फर्माइशीचा व्हिडिओ अपलोड करते आणि सुंदर कवितांचे वाचन करून दाखवते. नुकताच स्पृहाने तिचा एक नवीन व्हिडिओ यूटुबवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या चाहत्यांची फर्माइश पूर्ण करत तिच्याच ‘लोपामुद्रा’ या कविता संग्रहातील ‘शब्द’ ही कविता वाचून दाखवली आहे. मात्र या व्हिडिओमध्ये स्पृहाने सर्वात आधी तिला आवडणारी ‘आठवणी’ ही कविता देखील वाचून दाखवली.

आठवणी :

आठवणी सरल्या स्वप्नांच्या
घेऊन आले अवचित कोणी
नजरेमध्ये अनोळखी, पण
तीच जुनी भासली विराणी…

उंबरठ्यावर पाऊल माझे
अडखळले का उगा कळेना
थरथरला प्राजक्त जरासा
खूण अंतरी तरी पटेना…

रुणझणले अनुबंध जरासे
सरून उरला जरा पूरिया
नको नको म्हणता बिलगे
तुझ्या मिठीची साखरमाया… !!

शब्द :

आपल्या दोघांमध्ये ‘शब्द’ कधीच आले नाहीत.
ते होतेच सतत आपल्यासोबत, आणि नव्हते ही. महत्त्वाचे होतेच आपल्यासाठी आणि नव्हतेही ! कारण अवघड वळणांचे शब्द अर्थासह पोचायचे,
कुणीही न समजावता…
हसरे, दुःखी, रागीट, गंभीर.
असंख्य शब्दांची असंख्य वळणं
हसत हसत पार पडली, कारण संवादाचा पूल होता…!!

आता तो पूलच धुक्यात हरवलाय
आणि आपण दोघेही ‘शब्दांत’ हरवलोय !
एकच सांगते,
शब्द शोधता शोधता कधी मला शोधावंसं वाटलं, तर, मी तिथेच असेन दडलेली
शब्दांच्या आड…!!

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post