आज संपूर्ण जगात २७ फेब्रवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जात आहे. मराठीतील थोर लेखक-कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा जन्मदिनाच्या निमित्ताने मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. परंतु, याच दिवसाला अनेक जण ‘मराठी राजभाषा दिन’ असेही म्हणतात. आजच्या दिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेची आणि कवी कुसुमाग्रजांची माहिती लोकांसमोर सादर केली जात आहे.
मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री असलेली स्पृहा जोशी ही एक उत्तम कवियत्री देखील असल्याचे सर्वांनाच माहित आहे. स्पृहाचे कवितांवरील प्रेम तर सर्वांनाच माहित आहे. आज मराठी भाषा दिनाचे औचित्यसाधून स्पृहाने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक विशेष आणि अतिशय खास असा कार्यक्रम सादर केला आहे. तिने आज मराठी दिनाच्या निमित्ताने आजच्या तरुण पिढीतील आघाडीचे कवी असलेल्या संकेत म्हात्रे, श्रीपाद जोशी, आदित्य दवणे या तीन कवींना घेऊन ‘खजिना’ कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात स्पृहाने सांगितले की, ती नेहमीच जेष्ठ कवी, किंवा प्रेक्षकांच्या फर्माइशवरून ती कविता सादर करते. मात्र आजच्या दिनाच्या निमित्ताने तिने आजच्या काळातील कवी काय विचार करता, त्यांना कविता कितीपत समजते, आजचे कवी त्यांच्या लिखाणातून मराठी भाषा कशी जिवंत आणि प्रवाही ठेवत आहे, हे जाणून घेण्यासाठी तिने तिच्या संकेत म्हात्रे, श्रीपाद जोशी, आदित्य दवणे या मित्रांना कार्यक्रमात बोलवले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पृहाने या तिघांना सर्वात जास्त आवडलेली, त्यांच्या आवडत्या कवींची आणि ते कधीही आयुष्यात विसरू शकत नसणारी कविता वाचून दाखवण्यास सांगितले. कवी संकेत म्हात्रेने नागपूरचे कवी असणाऱ्या म. म. देशपांडे यांची ‘तहान’ ही कविता वाचून दाखवली.
सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।
व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।
फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।
राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास ।।
– म. म. देशपांडे.
तर दुसरा कवी असलेल्या श्रीपाद जोशीने कवियत्री अनुराधा पाटील यांची कविता ‘आपणच आपल्याला’
आपणच आपल्याला लिहीलेली
पत्र वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावीत वा-यावर पानं
थोडंसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधी तरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वराचं एखादं गाणं
आपणच जपावेत मनात
वा-यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी दूरात धावणारी पायवाट
जपावेत काही नसलेले भास
जिथे आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास
आदित्य दवणेने विंदा करंदीकर यांची ‘थोडी सुखी थोडी दुःखी’ ही कविता वाचून दाखवली.
फार दिवसांनी आली
मागारीण माहेराला ;
स्टेशनात भेटला नि
ओळखीचा टांगेवाला
ओळखीचा वाटला तो
कोण कोठचा, ही भ्रांत !
हसला तो ओळखीने
आणि चढली ती आत.
नाही वळविली त्याने
पुन्हा दृष्टि तिच्याकडे;
भरदार सुटे घोडा,
आणि चाबूक कडाडे.
ऒळखीचे आले वाडे ;
आली, आली, गेली शाळा
“अगबाई ! तोच हा का ?”
तिला चंदू आठवला !
आठवले सारे सारे,
आठवले त्याचे डोळे
आणि तिच्या काळजात
काही थरारून गेले.
फारा दिवसांनी आली
मागारीण माहेरला ;
गल्लीतल्या घरापुढे
त्याने टांगा थांबविला.
नाही वळवली त्याने
पुन्हा तिच्याकडे दृष्टि :
माहेराला भेटली ती
थोडी सुखी, थोडी कष्टी.
तर स्पृहा जोशीने कवियत्री इंदिरा संत यांची ‘कागदावर’ ही कविता वाचून दाखवली. याशिवाय या कार्यक्रमात स्पृहाने या नवीन पिढीचे कवी असलेल्या कवींना बोलत करत त्यांच्यावर कवितांचे संस्कार कसे झाले याबद्दल विचारले. यासोबतच या कवींनी अनेक कविता देखील वाचून दाखवल्या.
हेही वाचा