Friday, November 22, 2024
Home नक्की वाचा एका मेकॅनिकल इंजीनिअरनं बनवलाय ‘रेहना है तेरे दिल में’ सिनेमा, रंजक आहे Film Makingची कहाणी

एका मेकॅनिकल इंजीनिअरनं बनवलाय ‘रेहना है तेरे दिल में’ सिनेमा, रंजक आहे Film Makingची कहाणी

ते वर्ष होतं २००१… महिना होता ऑक्टोबरचा, अन् तारीख होती १९. तरुणाईला वेड लावण्यासाठी एका रोमँटिक सिनेमाने एन्ट्री केली होती. सिनेमातील हिरो आणि हिरोईनला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. त्यांना रिलेशनशिप गोलचा टॅगही दिला. पण मंडळी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही चालला नाही. मात्र, पुढं जसा काळ लोटला. तसा प्रेक्षकांनाही कुठंतरी खंत वाटली की, काय राव हा सिनेमा थिएटरमध्ये का नाही पाहिला. आता तुम्ही म्हणाल, एकदाचं सांगून टाका की कोणता होता तो सिनेमा, तर मंडळी तो सिनेमा होता रेहना है तेरे दिल मैं. हा सिनेमा बनवला होता एका मेकॅनिकल इंजीनिअरनं. याच सिनेमाविषयी रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

हिरो कुठला तरी साऊथचा पोरगा होता. त्याच्या नावापुढं नव्हतं कुठलंही खान किंवा कपूर. आधी इंजीनिअरिंग केली, नंतर काही हिंदी टीव्ही शो केले आणि पुढे तमिळ सिनेसृष्टीत गेला. पण आता आपलाच पहिलाच हिंदी सिनेमा करत होता. हिरोईनही नवी होती. ऍक्टिंगशी निगडीत कोणतंच काम पाहायला नव्हतंच. दिग्दर्शकही नवीनच अन् तोही मेकॅनिकल इंजीनिअर. सिनेमात यायचं नव्हतंच, पण होता होता झालंच असं समजा. यात हिरो-हिरोईन, डिरेक्टरही नवीन. पण यात प्रोड्युसरच हिंदी सिनेमातील अनुभवी होते. ते म्हणजे वासू भगनानी. तेच हा सिनेमा प्रोड्युस करत होते.

‘रेहना है तेरे दिल में’ सिनेमानं यावर्षी ऑक्टोबरमध्ये २० वर्षे पूर्ण केले. सिनेमाचे दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन मेकॅनिकल इंजीनिअरिंग करत होते. तेव्हाच त्यांना सिनेमाची गोडी लागली. इंजीनिअरिंग पूर्ण केली. घरच्यांना थेट सांगितलंं. इंजीनिअरिंगमध्ये काहीच राहिलं नाही आणि करायचंही नाही. आता सिनेमात हात आजमावून पाहायचाय. घरच्यांनीही लेकाला सपोर्ट केला, आणि त्याला पाठवून दिलं राजीव मेननकडं. गौतम यांनी राजीव यांना एका सिनेमासाठी असिस्ट केलं. दरम्यानच ते आपल्या कहाणीवरही काम करत होते. राजीव यांच्या सिनेमाचं काम झाल्यानंतर त्यांना वाटलं आता ते आपल्या सिनेमासाठी तयार आहेत. त्यांनी लिहिलेली कहाणी ही कॉलेजच्या पोराची लव्हस्टोरी होती. जी त्यांनी इंजीनिअरिंगच्या दिवसाच्या अनुभवावर आधारित केली होती. फक्त आता त्यांना तो मुलगा हवा होता. जो हिरोच्या रोलमध्ये फीट बसेल. तो मुलगाही सापडलाच. आणखी एक मेकॅनिकल इंजीनिअरच्या रुपात आर माधवन. आपली इंजीनिअरिंग पूर्ण केल्यानंतर तो फुल टाईम ऍक्टर बनला होता.

गौतम माधवनकडे आपल्या सिनेमाची कहाणी घेऊन पोहोचले. माधवनने त्याचे मेंटॉर मणिरत्नम यांच्याकडून सल्ला घेतला की, या सिनेमात काम करायचं की नाही. ते या सिनेमाच्या स्क्रिप्टवर समाधानी नव्हते आणि त्यांनी माधवनला स्किप करण्यास सांगितले. पण माधवनलाही कुठेतरी गौतम यांचा हा सिनेमा करावा वाटत होते. त्यावेळी त्याला मणिरत्नम यांच्याच ओळी आठवल्या. ‘भलेही तुम्ही इतरांसाठी ४ सिनेमे करा, पण स्वत:साठी एक तरी कराच.’ हा सिनेमा त्याला आपल्यासाठी करायचा होता, त्यामुळे त्याने गौतम यांना होकार कळवला.

आता होकार कळवला असला, तरीही डिरेक्टरचं नाव आल्यानंतर कुठेतरी त्यांना प्रोड्युसर मिळत नव्हता. ते अनेक प्रोड्युसर्सकडे गेले, पण नव्या जोडीसोबत काम करायला कुणी तयारच नव्हते. अशात ते पोहोचले डॉ. मुरलींकडे. त्यांना कहाणी ऐकवली, त्यांना ती आवडलीही. मग त्यांनी विचारलं, दिग्दर्शक कोणंय? त्यावेळी माधवन म्हणाला नवीन आहे. म्युझिक डिरेक्टर कोणंय? तर तोही नवाचंय, आर्ट डिरेक्टर कोणंय? तर तोही नवाच आहे, असं माधवन म्हणाला. यानंतर तर मुरली यांनी डोक्यालाच हात लावला बघा. माझं नुकसानच करायचंय का? पण माधवनने त्यांना विश्वासात घेतलं की, तुमचा पैसा बुडणार नाही. कहाणीत दम आहे आणि हिटच होईल. सिनेमा रिलीझ झाला. मिन्नले नावाने. हा सिनेमा हिट ठरला. माधवनला प्रेक्षकांनी आपला स्टार मानलं होतं. कोणत्याही सिनेमातील म्युझिककडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या सिनेमासाठी दिलेलं हॅरिस जयराज यांच्या म्युझिकने तरुण-तरुणींना वेड लावलं.

गौतम यांच्या पहिल्याच सिनेमाने त्यांना एस्टॅब्लिश केले होते. मिन्नलेनंतर त्यांना साऊथमध्ये राहूनच काम करायचं होतं. पण असं झालं नाहीच. त्यांच्या पहिल्या सिनेमाचं यश उत्तरेपर्यंत पसरलं. हिंदी सिनेसृष्टीतील प्रोड्युसर वासू भगनानींना या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवायचा होता. गौतम यांना बोलावलं अन् त्यांची कशीतरी समजूत काढली की, हिंदी रिमेकचेही डिरेक्शन त्यांनीच करावं. त्यांनीही या सिनेमाला होकार कळवला. वासूंना माहिती होतं की, आता हिंदी सिनेमा बनवायचाय तर हिंदी प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा हवाय. एखाद्या मोठा स्टारचा. कारण मिन्नले ही कॉलेजच्या पोराची स्टोरी होती. मूळ सिनेमातील माधवनचं काम त्यांना इतकं आवडलं की, ते या गोष्टीवर अडून बसले की, लीड रोलमध्ये माधवनच काम करेल.

असे असले, तरीही ते स्वत: सांगतात की, त्यांचा हा निर्णय अनेकांच्या पचनी पडला नव्हता. यानंतर त्यांच्या स्वघोषित शुभचिंतकांचा फोन येऊ लागला. ते म्हणाले की, ‘हे काय केलंस? हा मद्राशी पोरगा तुला डूबवेल…’ तसेच तो टीव्हीवरही झळकलाय. प्रेक्षक याला ऍक्सेप्टच करणार नाहीत. पण वासू यांनी अशा अनेक फोन कॉल्सकडे दुर्लक्ष केले. त्यांना माहिती होतं की, माधवनबद्दलचा त्यांचा निर्णय बरोबर असेल, आणि तसं झालंही आणि नाहीही. या सिनेमाचा रिमेक ‘रेहना है तेरे दिल में’ नावाने बनवण्यात आला. मात्र, गौतम यांना हा सिनेमा त्यांच्या मिन्नलेसारखा शॉट बाय शॉट चित्रीत व्हावा असं वाटत नव्हतं. त्यासाठी त्यांनी स्क्रिप्टप्रमाणे काही बदलही केले.

सिनेमा रिलीझ झाला. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. हे मान्य आहेच. पण वासू यांचा माधवनबद्दलचा निर्णय अनेकांना चुकीचा वाटत असला, तरीही तो पुढे तो योग्यच असल्याचे सिद्ध झाले. काही काळ लोटला. त्यानंतर माधवनने आपल्या याच सिनेमातून आपली एक खास ओळख बनवली. ज्या काळात नॅशनल क्रश हा शब्द नव्हता, त्या काळात मॅडी नॅशनल क्रश बनला होता. हा तोच सिनेमा आहे, ज्यामुळे आजही त्याचे फॅन त्याला मॅडी या नावाने ओळखतात.

यातील एक किस्साही खास आहे. जो ऐकून तुम्हालाही भारी वाटेल. सिनेमाला ५ वर्षे लोटली. माधवन आपल्या आईला घेऊन इंग्लंडला गेला होता. तिथे तो आईसोबत एका हॉटेलात डिनरसाठी गेला. तेथील किचनमधील स्टाफने त्याला ओळखले. खरं तर ते बांगलादेशी कूक होते, जे इंग्लंडमध्ये काम करत होते. ते माधवनकडे आले आणि त्याला म्हणू लागले की, मॅडी आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत. माधवनच्या आईलाही हे ऐकून भारी वाटले की, त्यांच्या मुलाला लोकं परदेशातही ओळखू लागली आहेत. यानंतर किचन स्टाफ एकसोबत भांडी वाजवू लागले आणि म्हणू लागले, ‘सच कह रहा है दीवाना.’ हीच होती मॅडीची क्रेझ.

‘रेहना है तेरे दिल में’ सिनेमातील सर्वात भारी काय असेल, तर ते त्याचं म्युझिक. वर सांगितल्याप्रमाणे हे तयार केलं होतं हॅरिस जयराज यांनी. सिनेमातील बेस्ट गाण्यांपैकी एक होतं ‘जरा जरा बेहकता है.’ या गाण्यातील गीत जेव्हा अभिनेत्री दिया मिर्झा हिला ऐकवले, तेव्हा तिने म्हटलं होतं की, हे कसलं विचित्र गाणं आहे. मात्र, हे गाणं आजही तितक्याच आवडीनं ऐकलं जातं.

माधवन हा एक तमिळ ब्राह्मण आहे. एवढंच नाही, तर तो शुद्ध शाकाहारीदेखील आहे. मात्र, या सिनेमातील त्याच्या ‘मॅडी’ या पात्राला चिकन खाताना दाखवलंय. खरं तर इथे पनीरला चिकन समजून खायचं होतं.

हेही पाहा- मोठ्या पडद्यावर फ्लॉप, पण तरुणाईला प्रेम करायला शिकवणारा

या सिनेमाचे चाहते आणखी वाढतच आहेत. सिनेमाने आपला मोठा चाहतावर्ग कमावला. दिया आणि माधवनचे चाहते त्यांना मेसेज करून सांगतात की, आम्हाला सिनेमा खूप आवडला आणि इतक्या- इतक्या वेळा पाहिला. तसेच, ते त्यांची सिनेमाशी जोडली गेलेली मेमरीही शेअर करतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा