Thursday, November 30, 2023

अनिल कपूरला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून जाम घाबरलेले लोक, भीतीमुळे थेट पोलिसांना लावलेला फोन

कलाकारांना नेमहीच वेगवेगळ्या पात्रानुसार मेकअप करावा लागतो. एखादा तरुण कलाकार वयस्कर दाखवला जातो, पुरुष कलाकाराला स्त्री कलाकार दाखवलं जातं, तर कधी फायटिंग सीनमुळे कलाकार रक्तबंबाळही झालेला दाखवतात. ही सगळी असते मेकअपची कमाल, पण काहीवेळा कलाकार मेकअप लावलेल्या अवस्थेतच बाहेर पडतात, त्यामुळे एकच खळबळ माजते. असंच काहीसं झालं होतं 1988 साली आलेल्या एका सिनेमावेळी. सिनेमातील कलाकार मेकअप लावलेल्या अवस्थेतच बाहेर पडले होते. त्यामुळे त्यांना पाहून लोकांनी थेट पोलिसांनाच फोन लावला होता. काय होता तो नेमका किस्सा? कलाकारांचा असा कोणता मेकअप होता? आणि कोणकोण होते ते कलाकार? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

तर आपण ज्या सिनेमाबद्दल बोलत आहोत तो सिनेमा होता 1988 सालचा ‘तेजाब.’ या सिनेमाच्या कास्टिंगचाही विषय जरा भन्नाटच आहे. सिनेमाचे दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी ‘तेजाब’साठी अनिल कपूर याला फायनल करण्यापूर्वी आदित्य पांचोलीला लीड रोलसाठी कास्ट केलं होतं, पण मध्येच माशी शिंकली. काही कारणांमुळे आदित्य सिनेमातून बाहेर पडला आणि एन्ट्री झाली अनिल कपूरची. झालं असं की, चंद्रा यांची कहाणी निर्माते बोनी कपूर यांनी ऐकली आणि त्यांना ठीकही वाटली. त्यांनी सांगितलं, या सिनेमात अनिल कपूरला घ्या, पण अनिल कपूर तर ‘मिस्टर इंडिया’च्या यशानंतर इतका व्यस्त होता की, त्याच्याकडे 2 वर्षे सिनेमाच्या शूटिंगसाठी वेळच नव्हता. बोनी म्हणाले की, तुम्ही जाऊन अनिलला स्क्रिप्ट ऐकवा. शूटिंगचं पाहून घेऊ. चंद्राही हो म्हणाले. त्यांनी अनिल कपूरला तेजाब सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवली. अनिलला मुन्नाची भूमिका सूट झाली, पण शूटिंगसाठी वेळ कुठून आणणार ना, तर असं ठरलं की, अनिल कपूरच्या कोणत्याही सिनेमाची शूटिंग रद्द झाली, तर तो चंद्रा यांच्या सिनेमाची शूटिंग करेल. अशाप्रकारे तेजाब सिनेमाची शूटिंग सुरू झाली, पण मजेशीर गोष्ट म्हणजे अनिल ज्या सिनेमांची शूटिंग करत होता, त्या सर्वांच्या आधी ‘तेजाब’ सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली.

सिनेमातील ‘सो गया ये जहां’ या गाण्याच्या शूटिंगवेळचा किस्सा लय भन्नाट आहे. अनिल कपूरच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सिनेमाची शूटिंग त्याच्या मर्जीनुसारच सुरू होती. तो ज्या शहरात, ज्या वेळी फ्री असायचा, तिथं त्यावेळी चंद्रांची टीम पोहोचायची आणि सिनेमाची शूटिंग सुरू व्हायची. अशातच ‘सो गया ये जहां’ हे गाणे १७ रात्रीत आणि ३ वेगवेगळ्या शहरात शूट करण्यात आलं. या गाण्यामध्ये सिनेमातील कलाकार जखमी अवस्थेत दिसतात. कोणाच्या डोक्यावर दुखापत झालीये, तर कुणाच्या शरीरातून रक्त बाहेर येताना त्या गाण्यात दिसतंय. एका रात्री जेव्हा गाण्याची शूटिंग संपली, तेव्हा सिनेमातील कलाकारांना जोराची भूक लागली होती. आता जोराची भूक लागली की, काय हाल होतात हे आपल्याला चांगलंच माहितीये, तर जोराची भूक लागल्याने कलाकारांनी शरीरावरील मेकअप तसाच ठेवला आणि तडकीफड हॉटेलवर काहीतरी खाण्यासाठी निघून गेले.

हॉटेलच्या लॉबीत रक्तबंबाळ अवस्थेत कलाकारांना पाहून लोकांची पळता भुई थोडी झाली. म्हणजेच जाम घाबरले. आधी तर त्यांना हे समजायलाच वेळ गेला की, हे अनिल कपूर आणि चंकी पांडे आहेत. त्याआधी त्यांनी भीतीने थेट पोलिसांना फोन लावले होते. जेव्हा लोकांना समजलं की, ते कलाकार आहेत. तेव्हा ते डॉक्टरांना फोन करू लागले की, त्यांना खूप जखमा झाल्यात. आणि त्यांच्यावर तातडीने उपचार झाले पाहिजेत. खूप खळबळ माजल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की, ते कलाकार थेट सिनेमाच्या शूटिंगवरून इकडे आले आहेत. त्यांना कोणतीही जखम झालेली नाही. तो तर त्यांचा मेकअप आहे. तेव्हा कुठं लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सिनेमाच्या कलाकारांना खूप प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे, अनिल कपूरपेक्षाही जास्त माधुरी दीक्षितला. जेव्हा ‘तेजाब’ रिलीज झाला होता, तेव्हा माधुरी तिच्या बहिणीच्या लग्नासाठी अमेरिकेला गेली होती. सिनेमा रिलीझ झाल्यानंतर ती भारतात आली आणि विमानतळावरून बाहेर येत आपल्या कारकडे जाऊ लागली. यामध्ये तिला काही मुले गाडी साफ करण्यासाठी रस्त्याने चालताना दिसली. माधुरीकडे बघून एकजण जोरात ओरडला, “वो देख हिरोईन.” ती सर्व मुले धावत माधुरीकडे आली आणि तिचा ऑटोग्राफ घेऊ लागली. माधुरीने तिच्या नावाची आद्याक्षरे कागदावर कोरली. तिने लिहिलेले M पाहून ओरडणारे मूल म्हणाले, “हे बघ, मी म्हणालो होतो ना, ही मोहिनी आहे.” ते नाव ‘तेजाब’ सिनेमातील माधुरीच्या पात्राचे होते. माधुरीने मीडियाशी बोलताना सांगितले होते, तिच्या कामामुळे तिला पहिल्यांदाच लोकांमध्ये ओळख मिळाली होती. (story about anil kapoors so gaya yeh jahan song shooting)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
साठच्या दशकात पहिल्यांदाच ‘बिकिनी गर्ल’ने निर्माण केली हाेती दहशत, निषेधाचे लावले गेलेले पोस्टर

तेलगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज कैकला सत्यनारायण यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

हे देखील वाचा