Saturday, June 29, 2024

श्रीदेवी शेर, तर अमिताभ सव्वाशेर! कामंच करायचं नाही म्हणून बसलेल्या अभिनेत्रीला महानायकांनी ‘असं’ पटवलेलं

श्रीदेवी, ८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री. जसे आजच्या काळात विद्या बालनच्या नावावर सिनेमे चालतात, तसे त्याकाळी श्रीदेवीच्या नावावर सिनेमे चालायचे. सिनेमात अभिनेत्यापेक्षाही जास्त वजन श्रीदेवीच्या पात्राला असायचे. एकप्रकारे तिने आपला दबदबा कायम केला होता. दुसरीकडे महानायक अमिताभ बच्चनही त्याकाळचे दिग्गज अभिनेते होते. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेत्रींची लाईन लागली होती. आधी २-३ सिनेमात अमिताभ यांच्यासोबत श्रीदेवीनं काम केलं होतं. दोघेही दिग्गज कलाकार, पण आता श्रीदेवीला त्यांच्यासोबत काम करायचंच नव्हतं, आणि अमिताभ यांना श्रीदेवीलाच त्यांच्या सिनेमात घ्यायचं होतं. श्रीदेवीला त्यांच्या सिनेमात घेण्यासाठी एक झक्कास आयडिया शोधली. त्यानंतर अडून बसलेल्या श्रीदेवीनंही अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. काय होती ती आयडिया चला जाणून घेऊया…

चांदनी, हिंदी चित्रपटसृष्टीतील बिग बजेट महिला केंद्रित सिनेमा बनत होता. हा सिनेमा म्हणजे एकप्रकारे पुरुष केंद्रित सिनेमांना चपराकच होता. या सिनेमात श्रीदेवीसोबत त्या काळातील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आणि विनोद खन्ना, साईड रोल करत होते, तर मुख्य भूमिकेत होती श्रीदेवी. यावरून तुम्हाला समजलंच असेल की, श्रीदेवीचं सिनेमातील वजन काय असेल.

दिनांक १४ सप्टेंबर, १९८९ रोजी चांदनी सिनेमा रिलीझ झाला. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. आता श्रीदेवीला फिमेल अमिताभ बच्चन म्हणले जाऊ लागले होते. कारण, ज्याप्रकारे अमिताभ बच्चन ज्या सिनेमात असतील, तो सिनेमा हिटच ठरणार असं म्हणलं जायचं. तसंच काहीसं श्रीदेवीबद्दलही झालं, पण दुसरीकडं अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणं श्रीदेवीनं बंद केलं होतं. याचं कारण जेव्हा श्रीदेवीला विचारलं, तेव्हा ती म्हणाली, “ज्या सिनेमात अमितजी असतात, तिथे इतरांना करण्यासारखं असतंच काय?”

प्रसिद्ध दिग्दर्शक मुकुल आनंद, १९९१ मध्ये अमिताभ यांच्याकडं ‘खुदा गवाह’ सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन गेले. अमिताभ यांनी कहानी ऐकताच सांगितलं की, या सिनेमाची हिरोईन श्रीदेवीच असेल. यापूर्वी अमिताभ आणि श्रीदेवी यांनी ‘इंकलाब’ आणि ‘आखिरी रास्ता’ यांसारख्या सिनेमात एकत्र काम केलं होतं. आता अमिताभ यांना त्यांच्या या सिनेमात श्रीदेवीला घ्यायचं होतं, पण अमिताभ यांनाही समजलं होतं की, श्रीदेवी त्यांच्यासोबत काम करणार नाही. त्यांनी यासाठी एक जबरदस्त आयडिया शोधली.

श्रीदेवी तेव्हा सरोज खान यांच्यासोबत एका गाण्याची शूटिंग करत होती. अमिताभ यांनी थेट त्या लोकेशनवर गुलाबाने भरलेला ट्रक पाठवला. तो ट्रक श्रीदेवीला जवळ बोलावून खाली करण्यात आला. तिलाही अमिताभ यांची ही स्टाईल खूपच आवडली. आता तर प्रश्नच नव्हता. श्रीदेवी ‘खुदा गवाह’ सिनेमात काम करण्यासाठी तयार झाली, पण इथं तिनं एक अटही घातली होती. ती अट अशी की, सिनेमात ती डबल रोल करणार. तिला या सिनेमात आई आणि मुलगी दोन्ही भूमिका करायच्या होत्या. आपण बोलतोय ८०-९० च्या दशकातील. अमिताभ यांच्या सिनेमात पहिल्यांदा कोणतीतरी अभिनेत्री डबल रोल करण्याचा विचार करत होती. या सिनेमात श्रीदेवीला घेण्याचा अट्टाहास केला. आता तिची अटही त्यांना मान्य करावीच लागणार होती. श्रीदेवीची अट मान्य करण्यात आली. तेव्हा कुठे जाऊन ‘खुदा गवाह’ सिनेमा बनला.

दिनांक ८ मे, १९९२ रोजी रिलीझ झालेल्या ‘खुदा गवाह’ सिनेमाने जगभरात जवळपास १७ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा सिनेमा त्याकाळचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
देवाघरी गेलेल्या बप्पी दांकडे किती रुपयांचं सोनं होतं? आकडा वाचूनच येईल आकडी
सिनेमात काम करण्यासाठी ‘पंजाबी कुडी’ रिचाला आई-वडिलांनी दिलेला ‘हा’ महामंत्र, आज बनलीय बॉलिवूड स्टार
देसी गाण्यांवर व्हिडिओ बनवून भारतीयांचं लक्ष वेधून घेणारे ‘हे’ फॉरेनर्स आहेत तरी कोण? जाणून घ्याच

हे देखील वाचा