Friday, April 19, 2024

किशोरदांच्या चित्रपटात रफीसाहेबांना गाणं गायला लावणारी शंकर-जयकिशन संगीतकार जोडी, का पडली नात्यात फूट?

‘तुम मुझे यूँ भुला ना पाओगे’, ‘जब कभी भी सुनोगे गीत मेरे’, ‘संग संग तुम भी गुनगुनाओगे’, अगदी या ओळी ज्यांच्यासाठी तंतोतंत लागू होतात. ज्यांनी, भारतीय संगीत इतिहासात स्वत:चं नाव सुवर्णक्षरांनी लिहिलं, ज्यांचं नाव अजरामर झालं अशी एक संगीतकारांची जोडी म्हणजे शंकर – जयकिशन. आज अनेक दिग्गज संगीतकार भारतात होऊन गेले, पण तरी त्यातही शंकर- जयकिशन यांनी आपली वेगळीच ओळख आणि स्थान निर्माण केलं. त्यांना आजही भारतातील सर्वात यशस्वी संगीतकार जोडी म्हटलं जातं. तशा तर भारतात अनेक संगीतकार जोड्या झाल्या, पण खऱ्या अर्थानं पहिल्यांदा स्टारडम पाहिलेली संगीतकार जोडी म्हणजेच शंकर- जयकिशन. हवा मे उडता जाये गाण्यापासून ते ‘जिना यहा मरना यहा’, ‘जिंदगी एक सफर’ अशा गाण्यांपर्यंत तब्बल 2 दशके अनेक हिट गाणी देणारी ही जोडी, पण हे दोघे भेटले कसे, कसा होता त्यांचा प्रवास जाणून चला जाणून घेऊयात.

तारिख होती 15 ऑक्टोबर, 1922 याच दिवशी शंकर सिंग रघुवंशी यांचा जन्म झाला. हैदराबादमध्ये बालपण गेलं. घरात फार काही संगीताचा वारसा नव्हता, पण शंकरला मंदिरात होणाऱ्या किर्तन भजनावेळी तबला वाजवायला आवडायला लागलं. तिथूनच सुरू झाला संगीताबरोबरचा प्रवास. पुढे मग बाबा नासिर खानसाहेब यांच्याकडून तबला वाजवण्याचे रीतसर धडे गिरवले. त्यानंतर शंकर पुढे ख्वाजा खुर्शिद अन्वर यांचाही शिष्य राहिला. त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये तो कामही करू लागला. इतकंच नाही, तर त्याने पुढे नृत्य करायलाही शिकू लागला. त्यानिमित्ताने त्याने मुंबईत सत्यनारायण आणि हेमवती यांच्या एका थेटर ग्रुपमध्येही सहभाग घेतला, इथेच त्याच्या करियला सुरूवात झाली. तो तबला वाजवायचा, काही नाटकांत कामही करायला लागला. पुढे त्याची भेट झाली पृथ्वीराज कपूर यांच्याशी. त्यांना त्याने प्रभावित केलं. तबला सुंदर वाजवायचा, थोडंफार चांगला नाचताही यायचं आणि छोट्या भूमिकाही साकारायचा. मग काय त्याने पृथ्वीराज कपूर यांचं पृथ्वी थेटर जॉईन केलं आणि करियरला नवीन वळण मिळालं. इथं काम करताना तो अन्य वाद्यही थोडीफार शिकला. त्याचबरोबर संगीतकार हन्सलाल भगत्रम यांचा असिस्टंट म्हणूनही तो कमी वयातच काम करू लागला आणि त्यांच्याकडून संगीतबद्दल शिकूही लागला. शेवटी अनुभव हाच गुरु असतो, असं म्हणतात ना तसं शंकर अगदी कमी वयापासूनच असे अनुभव गोळा करत होता. एक किस्सा असा सांगितला जातो की, एकदा त्याची सायकल हरवली, ती शोधण्यासाठी बाहेर पडलेला असताना त्याने एका ठिकाणी मुजरा सुरू असलेला ऐकला, त्यावेळी तबलाही वाजवला जात होता. त्यावेळी हा तिथे तावातावाने गेला आणि थेट म्हणाला, चुकीचा तबला वाजवत आहेत, त्याने तबला वाजवून दाखवला. त्यावेळी त्याला बक्षीसही तिथे देऊ केलं, पण त्याने ते नाकारत चांगला तबला वाजवण्यास सांगून तो निघून आला. शंकरचा स्वभाव असाच होता.

दुसरीकडे जयशकिशन दयाभाई पांचालचा जन्म 4 नोव्हेंबर, 1929 रोजी गुजरातमध्ये झाला. घरात तसं संगीताचं वातावरण होतं. असं म्हटलं जातं की, त्याचे वडील धरमपूरच्या राजाकडे संगीतकार म्हणून होते. त्याने सुरुवातीला संगीत विशारद वादिलालजी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. जयकिशन हार्मोनियम वाजवायचा. नंतर मुंबईला आल्यावर विनायक तांबे यांच्याकडूनही त्याने हार्मोनियम वादनाचे धडे घेतले. यादरम्यान मुंबईला आल्यावर त्याने काही कारखान्यांमध्येही काम केलं. हे करता करता तो काही स्टुडियोंमध्येही जायचा. विशेष गोष्ट अशी की जयकिशन डाव्या हाताने हार्मोनियम वाजवायचे.

असंच एकदा झालं असं की पृथ्वी थेटरमध्ये काम करत असताना शंकर चंद्रवर्धन भट या गुजराती दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये एखाद्या चित्रपटात काम मिळेल म्हणून जात असे, त्यावेळी तिथे जयकिशनही त्याला दिसत, पण एकेदिवशी या दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. या चर्चेदरम्यानच शंकरला कळालं की, जयकिशन हार्मोनियम वाजवतो आणि इथंच बेला फुलाला एकच गाठ पडावी असं काहीतरी झालं. त्याचवेळी पृथ्वी थेटरमध्ये हार्मोनियम वादक हवाच होता. मग शंकरने जयकिशनलाही पृथ्वी थेटरमध्ये काम मिळवून दिलं. हे दोघं तिथं काम करू लागले. मैत्री बहरत गेली. एकमेकांना ते चांगले ओळखू लागले. एकमेकांना ते पूरक बनले, त्यांची एक जोडगोळी तिथं तयार झाली, अगदी ‘पठाण’ या नाटकात त्यांनी एकत्र कामही केलं. पृथ्वीराज कपूर यांनीही शंकरने जयकिशनला आणल्याचे कौतुक केलं. असंच काम करता करता त्यांची जवळीक पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा राज कपूर यांच्याशीही वाढली. राज कपूर हे सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचे. पुढे त्यांनी आग चित्रपटातून दिग्दर्शनात उडी घेतली. त्यावेळी राम कपूर यांनी संगीत दिग्दर्शन केले होते आणि त्यांना सहाय्य केलेलं शंकर आणि जयकिशनने. पुढे 1949मध्ये आलेल्या ‘बरसात’ चित्रपटापूर्वी राज कपूर आणि राम गांगुली यांचे वाद झाले आणि हेच वाद शंकर आणि जयकिशन यांना मोठी संधी देऊन गेले. बरसात चित्रपटासाठी शंकर आणि जयकिशन यांना संगीत दिग्दर्शनाबद्दल विचारण्यात आलं आणि इथंच बनली द शंकर-जयकिशन यांची जोडी. पहिल्याच चित्रपटात त्यांनी अनेक हिट गाणी दिली. पहिल्याच चित्रपटासाठी लता मंगेशकर, मुकेश आणि मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांनी गाणी गाऊन घेतली. आरके बॅनरसाठी शंकर-जयकिशन संगीतकार म्हणून जवळपास निश्चित झाले.

शंकर- जयकिशन यांच्या जोडीच्या यशात मोठे योगदान गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपूरी यांचेही राहिले. त्यांच्या अनेक गाण्यांचे बोल या दोघांनी लिहिले. हसरत जयपूरी यांनी पूर्वी बस कंडक्टर म्हणूनही काम केलं होतं. या दोघांबरोबर दत्ताराम वाडकर आणि सेबास्टियन डिसुजा हे दोघेही शंकर- जयकिशन यांचे अनेक वर्षे सहाय्यक राहिले. दत्ताराम यांच्या भेटीचाही एक किस्सा आहे. जिममध्ये एकदा शंकर यांचा तबला ऐकून दत्ताराम फार प्रभावित झाले होते, त्यांनी त्यांच्याकडून तबला शिकण्यासही सुरूवात केली होती. पुढे ते शंकर- जयकिशन टीमचा बरीचवर्षे हिस्सा राहिले. या टीमने मिळून अनेक चित्रपटांना संगीतामुळे हिट केले. एकवेळ तर अशी होती की, चित्रपट चालले नाही चालले तरी चालेल पण शंकर- जयकिशन यांचे संगीत मात्र तुफान चालायचे. त्यांनी एक पर्व सुरू केलं होतं, त्यावेळी त्यांना स्पर्धक होते रोशन, एसडी बर्मन, ओपी नय्यर, मदन मोहन पण तरीही ते अव्वल राहिले. आवारा चित्रपटासाठी त्यांनी दिलेली अनेक गाणी हिट राहिली. आजही ‘आवारा हूं’ हे गाणं अनेकदा ऐकू येतं. तसेच असंही म्हटलं जातं की, त्यांच्या कारकिर्दीत राज कपूर हे नाव महत्त्वाचं राहिलं. कारण त्यांच्यासाठी त्यांनी अनेक हिट गाणी दिली, राज कपूर यांच्या यशात शंकर- जयकिशन या जोडीचं मोठं योगदान राहिलं. असं असतानाही त्यांनी आरके बॅनर व्यतिरिक्तही अनेक चित्रपटांसाठी आणि प्रोड्यूसरसाठी कामं केली.

शंकर- जयकिशन यांनी जवळपास अनेक दिग्गज गायकांकडून गाणी गाऊन घेतली. त्यांनी मुकेश यांच्याव्यतिरिक्त मन्ना डे यांचाही आवाज राज कपूर यांच्यासाठी वापरला. त्यांनी आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी यांच्याव्यतिरिक्तही अनेक गायकांबरोबर कामं केली. त्यांनी बरसात नंतरही आवारा, बादल, काली खटा, नया घर, श्री 420, न्यू दिल्ली, चोरी चोरी, दाग, बुट पॉलिश, शरारत, उजाला, जंगली, प्रोफेसर, संगम, सुरज, मेरा नाम जोकर अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी गाणी दिली. त्यांनी त्याकाळातील जवळपास सर्वच सर्वोत्तम गायकांकडून गाणी गाऊन घेतलेली. त्याचबरोबर त्यांनी राज कपूर यांच्याव्यतिरिक्त शम्मी कपूर, देव आनंद, सुनील दत्त, दिलीप कुमार, मनोज कुमार, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार अशा अनेक स्टार्ससाठी गाणी तयार केली. इतकंच नाही, तर शरारत चित्रपटात किशोर कुमार यांच्या भूमिकेसाठी त्यांनी मोहम्मद रफी यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करून घेतलं होतं. हा खूप दुर्मिळ क्षण होता, कारण त्यावेळी किशोर कुमार आणि मोहम्मद रफी हे दोघंही दिग्गज गायकांपैकी एक होते आणि एका गायकानेच दुसऱ्या गायकासाठी आवाज दिला होता.

त्यांनी भारतीय सिनेसृष्टीत संगीताबाबत क्रांती घडवून आणली होती. त्यांनी केवळ एकाच प्रकारची नाही, तर वैविध्यपूर्ण गाणी तयार केली. त्यांनी वेस्टर्न पद्धतीतील गाण्यांनाही प्राधान्य दिलं, पण त्याला शास्त्रीय संगीताचीही जोड दिली. भैरवी रागाचा तर त्यांच्या गाण्यांमध्ये मोठा प्राभाव दिसायचा. त्यांनी अनेक वेस्टर्न वाद्यही त्यांच्या गाण्यांमध्ये वापरली. अनेकदा त्यांच्यावर असाही आरोप झाला की त्यांनी इजिप्त, अरेबियन, इटालियन, जिप्सी यांच्या संगीतातून ट्यून्स कॉपी केल्या, पण तरीही त्यांच्याबाजूने एक गोष्ट उभी राहिली ती म्हणजे त्यांनी कितीही वेस्टर्न पद्धतीच्या ट्यून्स केल्या असल्या तरी त्याला भारतीय ठसका दिला होता की, त्या ट्यून्स त्यांच्याच असल्याचे दिसून आले. असंही म्हटलं जातं की, डान्स, थिम साँग अशा गोष्टींमध्ये शंकर यांचा हातखंडा होता, तर रोमँटिक आणि बॅकग्राऊंड स्कोर तयार करण्यात जयकिशन यांचा हातखंडा होता. इतकंच नाही, तर शंकर हे जास्तकरून शैलेंद्र यांच्यासह, तर जयकिशन हे हसरत जयपूरी यांच्यासह काम करत. कधी कधी हे एकत्रही काम करत, पण असं असलं तरी त्यांचा अलिखित करार होता की, कोणी कोणती ट्यून तयार केली, हे कोणीही सांगायचं नाही. त्यामुळे कोणालाही हे कळायचं नाही की, कोणतं गाणं कोणाचं आहे. असंही सांगितलं जातं की, भारतात जॅझ म्युझिकची प्रसिद्धी करण्यात त्यांचाही मोठा वाटा होता.

एक किस्सा असाही सांगितला जातो की जयकिशन यांना एकदम टिपटॉप राहायला आवडायचं. एकदा एका पार्टीदरम्यान देव आनंद, दिलीप कुमार, राज कपूर हे असताना देखील जयकिशन यांच्या आजूबाजूला गर्दी जमलेली, पण त्यावेळी जयकिशन यांचा स्मार्टनेस आणि स्टारडम माहित असल्याने राज कपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार यांना फार काही वाटलं नाही. असाच एक किस्सा म्हणजे जयकिशन यांची चाहती म्हणून एक मुलगी त्यांना ब्रेबॉर्न स्टेडियमवर भेटली होती. हळूहळू मैत्री वाढत गेली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. त्या मुलीचं नाव होतं पल्लवी. पल्लवी आणि जयकिशन यांनी 1963 रोजी लग्न केलं. त्यांना भैरवी नावाची मुलगी देखील आहे.

त्यांचे काही किस्से चांगलेच फेमस आहेत, त्यातील एक किस्सा असा की एकदा परदेशात जयकिशन आणि हसरत जयपूरी गेले होते. त्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी एका महिलेच्या अंगावरील वस्त्र एकदम चमचम करत असल्याचे पाहिले होते. त्यावरून त्या दोघांनी ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ हे गाणं तयार केलं होतं. जे शम्मी कपूर आणि वैजयंतीमाला यांच्यासाठी ‘प्रिन्स’ चित्रपटात वापरण्यात आलं. आणखी एक किस्सा असा की रमय्या वस्तावैय्या गाण्याचा. एकदा राज कपूर हे त्यांच्या टीमला खंडाळ्याला घेऊन गेले. तिथे त्यांना एक गाणं तयार करायचं होतं. त्यावेळी शंकर ट्यून तयार करत असताना रमय्या वस्तावैय्या हे सारंख म्हणत होते. त्यावरून राज कपूर यांनी त्यांना प्रश्न विचारला काय सारखं रमय्या वस्तावय्या म्हणतोय पण त्यापुढे लगेचच शैलेंद्र यांनी शब्द जोडले ‘मैने दिल तुझको दिया.’ असं करत ते गाणं पूर्ण तयार झालं.

‘मुड मुड के ना देख’ या गाण्याचाही असाच एक मजेशीर किस्सा आहे. एकदा जयकिशन शैलेंद्र आणि दत्ताराम यांच्याबरोबर प्रवास करत होते. त्यावेळी दत्ताराम सारखे मागे पाहात होते. त्यावर जयकिशननी मुडकर क्या देख रेहे हो असं काही तरी त्यांना म्हटलं आणि त्यावरून शैलेंद्र यांना ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ हे गाणं सुचलं आणि असंच हे गाणं तयारही झालं. एकदा तर शंकर जयकिशन यांनी चक्क पंडित भीमसेन जोशी यांना हिंदी चित्रपटात गाण्यासाठी तयार केलं होतं. ‘बसंत बहार’ या चित्रपटात त्यांनी केतकी, गुलाब, जुही हे गाणं गायलं होतं. त्यांना मन्ना डे यांनी साथ दिलेली, विशेष गोष्ट अशी की, असं सांगितलं जातं की, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर गायचं हे ऐकूनच मन्ना डे यांनी चक्क पळून जाण्याचा विचार केला होता, पण नंतर त्यांनी ते गाणं गायलं. असंच ब्रह्मचारी चित्रपटावेळी ‘दिल के झराको में’ या गाण्याची पहिली ओळ शंकर-जयकिशन यांनी मोहम्मद रफी यांना श्वास न घेता गायला सांगितली होती. त्यावेळी गाणं रेकॉर्ड झाल्यावर रफी गमतीने त्यांना म्हणालेले, “असं केलं तर माझं तुमच्यासाठी अंतिम गाणं पुढे ठरेल.”

शंकर-जयकिशन यांची जोडी एकवेळ सर्वाधिक मानधन घेणारी जोडी बनली होती. असंही म्हटलं जातं की, आरजू चित्रपटासाठी त्यांनी 10 लाख रुपये घेतले होते, जे की त्यावेळी खूप मोठी रक्कम होती, पण म्हणतात ना कुठेतरी मिठाचा खडा पडतो, तसं झालं. या दोघांमध्ये 60च्या दशकाच्या मध्यात फुट पडली. सुरज चित्रपटानंतर दोघही वेगवेगळे काम करू लागले, पण त्यांनी जगाला हे कधीही समजू दिले नाही, कारण वेगळं काम करतानाही त्यांनी शंकर-जयकिशन या बॅनरखालीच कामं केली. त्यांच्यात दरी येण्यासाठी अनेक कारण सांगितली जातात, पण अद्यापही खरं असं काही कारण समोर आलेलं नाही, पण असं सांगितलं जातं की, जयकिशन यांनी त्यांच्या नकळत एका आर्टिकलमध्ये सांगितलं होतं की, संगम मधील ‘ये मेरा प्रेम पत्र पढकर’ या गाण्याचं संगीत त्यांचं आहे. यामुळे शंकर यांना फार वाईट वाटलं, त्यांचा समज झाला की, जयकिशन यांनी त्यांच्यातील करार मोडला. पुढे शंकर यांनी शारदा यांना गायिका म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला, पण जयकिशन हे लता मंगेशकरांना प्राधान्य देत होते, त्यामुळेही त्यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जाते. अनेकदा त्यांच्यातील हे वाद अफवा असल्याचेही जयकिशन, हसरत आणि शंकर यांच्याकडून सांगण्यात आलेले. खूप काम असल्याने वाटून घेतल्याचेही अनेकदा त्यांनी सांगितले.

तसंच असंही म्हटलं गेलं की, मोहम्मद रफी यांनी या दोघांना एकत्र आणण्यात नंतर मदत केली. त्यांनी त्यांचे काही शेवटचे चित्रपट एकत्रही केले. यादरम्यानच त्यांना एक मोठा धक्का बसला होता, तो म्हणजे शैलेंद्र यांच्या जाण्याने. शैलेंद्र यांचे 1966मध्ये निधन झाले होते. शैलेंद्र यांच्यानंतर त्यांनंतर त्यांनी अन्य काही गीतकारांबरोबर कामं केली, पण शैलेंद्र त्यांच्या यशातील महत्त्वाचे व्यक्ती होते. दरम्यान, लता मंगेशकर यांचे राज कपूर यांच्याशी वाद झाले होते. कारण होते की शंकर-जयकिशन यांचेच गाणे असलेले ‘मुझे बुड्ढा मिल गया’ गाणं लता मंगेशकर यांच्याकडून त्यांनी घाईत गाऊन घेतलं होतं. त्यावेळी हे गाणं कॉमेडी असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं, पण जेव्हा चित्रपटात हे गाणं लता यांनी पाहिलं, त्यावेळी त्या चिडल्या होत्या आणि त्यांनी परत राज कपूर यांच्यासाठी गाणं न गाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचमुळे त्यांनी शंकर-जयकिशन यांचं संगीत असलेल्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटासाठी गाणी गाण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांना आशा भोसले यांच्याकडून गाणी गाऊन घ्यावी लागली होती.

पुढे शंकर- जयकिशन जगासाठी वेगळे नसले झाले तरी, त्यांच्यात दरी आली होती, आणि याचमुळे जयकिशन यांनी मोठ्या प्रमाणात दारू पिण्यास सुरूवात केल्याचंही सांगितलं जातं. याचमुळे त्यांना लिव्हरचा त्रास झाला आणि अगदी 41व्या वर्षी ते 12 सप्टेंबर, 1971रोजी हे जग सोडून गेले. त्यांच्या जाण्याने शंकर- जयकिशन ही जोडी कायमचीच तुटली. त्यावेळी चर्चगेटमधील एका रेस्टॉरंटमध्ये जयकिशन नेहमी जायचे, त्यामुळे त्या रेस्टॉरंटमधील जयकिशन यांचे आवडत्या टेबलवर एक महिना मेणबत्ती जाळण्यात आली होती. तसेच तो टेबल एक महिना जयकिशन यांच्या नावाने रिझर्व ठेवण्यात आलेला.

शंकर यांच्यासाठी शैलेंद्र यांच्या जाण्यानंतर जयकिशन यांचे जाणे मोठा धक्का होता. त्या दोघांच्या जाण्याने शंकर एकटे पडले होते. कारण, त्यांच्या यशात या दोन व्यक्तींचं मोलाचं योगदान राहिलं होतं. याच गोष्टीचं भान ठेवत शंकर यांनी पुढे संगीतकार म्हणून काम करतानाही शंकर- जयकिशन याच बॅनरखाली कामं केली. असंही म्हटलं जातं की, शंकर हे त्यांच्या मानधनाचा अर्धा हिस्साही जयकिशन यांच्या कुटुंबीयांना देत होते. पुढे शंकर यांची आरके बॅनरशीही नातं तुटलं. पुढे कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर डी बर्मन यांसारख्या संगीतकारांच्या उदयानंतर शंकर- जयकिशन यांचे पर्व संपुष्टात आले. शंकर यांनी पुढे संन्यासी वैगरे चित्रपटांसाठी गाणी दिली, पण तरीही ते फार काळ आपली प्रतिभा कायम करू शकले नाहीत. पुढे 26 एप्रिल, 1987 रोजी शंकर यांचेही निधन झाले आणि शंकर-जयकिशन हे पर्व खऱ्याअर्थानं शांत झालं. त्यांच्या निधनाची बातमीही सर्वांना दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांतून कळली होती. त्यांच्या जाण्यानंतर राज कपूर यांनी त्यांना ट्रीब्यूट दिला होता.

पण असं असलं तरी तब्बल 2 दशके या जोडीने संगीत क्षेत्रात सुवर्णकाळ पाहिला. आजही त्यांची प्यार हुआ इकरार हुआ, बोल राधा बोल, लिखे जो खत तुझे, याहू, अजीब दास्तां है ये, जीना यहा मरना यहा अशी अनेक गाणी रसिक ऐकत असतात. त्याचमुळे भारताच्या संगीत इतिहासातील शंकर- जयकिशन यांनी गाजवलेले 50-60ची दशके सुवर्णकाळ मानला जातो. या दोघांनी चोरी चोरी, आनाडी, दिल अपना और प्रीत पराई, प्रोफेसर, सुरज, ब्रम्हचारी, पेहचान, मेरा नाम जोकर आणि बेइमान या चित्रपटांतील गाण्यांसाठी 9 फिल्मफेअर पुरस्कार उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून जिंकले. अखेरचे 3 पुरस्कार तर सलग तीन वर्षे त्यांनी जिंकले. त्यामुळे या पुरस्काराची हॅट्रिक करणारे ते पहिले संगीतकार ठरले होते. इतकंच नाही, तर भारत सरकारकडूनही त्यांचा 1968 साली पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. शंकर-जयकिशन यांच्यानंतर अनेक संगीतकार आले आणि गेले पण शंकर- जयकिशन हे नाव भारतीय संगीतसृष्टीत अजरामरच राहील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वाढदिवस विशेष..! सुरांचे बादशाह मोहम्मद रफी यांनी ‘या’ कारणामुळे सोडलं होतं गाणं, कारणही गंभीर

लता दीदी अन् मोहम्मद रफींमध्ये असे काय झाले होते की, तब्बल 4 वर्षे गायले नव्हते एकत्र गाणे

हे देखील वाचा