Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड Happy Birthday: अभिनेता म्हणून केली करिअरची सुरुवात, पण दिग्दर्शक म्हणून सुभाष घईंनी दिले सुपरडूपर हिट चित्रपट

Happy Birthday: अभिनेता म्हणून केली करिअरची सुरुवात, पण दिग्दर्शक म्हणून सुभाष घईंनी दिले सुपरडूपर हिट चित्रपट

सुभाष घई (Subhash Ghai) हे शॉ-मॅन म्हणून ओळखले जातात. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले, जे आजही संस्मरणीय आहेत. ‘कालीचरण’, ‘हीरो’, ‘जंग’, ‘कर्मा’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘खलनायक’, ‘परदेस’ आणि ‘ताल’ या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ते हिंदी चित्रपटसृष्टीत ओळखले जातात. २००६ मध्ये ‘इकबाल’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

घईंचा जन्म २४ जानेवारी १९४५ रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील दिल्लीत दंतवैद्य होते.

बऱ्याच चित्रपटात केलाय अभिनय
सुभाष घई यांनी आपले प्रारंभिक शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी १९६३ मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. सुभाष घई यांचे लग्न रिहाना उर्फ ​​मुक्तासोबत झाले आहे. दोघांना मेघना आणि मुस्कान या दोन मुली आहेत. सुभाष घई यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून केली होती, हे फार लोकांना माहीत नाही. शिवाय, कमी बजेटच्या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ज्यामध्ये तें सहाय्यक कलाकारासोबत ‘उमंग’ आणि ‘गुमराह’ सारख्या चित्रपटांमध्येही मुख्य भूमिकेत दिसले होते.

पण हे सिनेमे केल्यानंतर सुभाष घईंना वाटलं की आपलं करिअर चित्रपटांमध्ये अभिनयात नसावं. यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनात नशीब आजमावण्याचा विचार केला. सुभाष घई यांनी ‘कालीचरण’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. हा चित्रपट १९७६ साली आला होता. जो सुपर-डुपर हिट ठरला. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते. सुभाष घई यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत ‘विधाता’, ‘सौदागर’ आणि ‘कर्मा’ या चित्रपटांसह अनेक चित्रपट केले. ‘कर्मा’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. यानंतर त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले.

१६ पैकी १३ ठरले ब्लॉकबस्टर
सुभाष घई यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील सुमारे १६ चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले, त्यापैकी १३ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. या यशाने खूश होऊन सुभाष घई यांनी ‘मुक्ता आर्ट्स’ची निर्मिती केली. १९८२ मध्ये त्यांनी त्यांच्या प्रोडक्शन बॅनरखाली अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली. सुभाष घई यांनी केवळ दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर निर्माता म्हणूनही अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ज्यात ‘ऐतराज’, ‘इक्बाल’, ‘चायना टाउन’, ‘अपना सपना मनी मनी’ या चित्रपटांचा समावेश आहे.

शो मॅन सुभाष घई यांनी बॉलिवूडला अनेक नायक आणि नायिकाही दिल्या, ज्यामध्ये माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, मनीषा कोईराला, सरोज खान, महिमा चौधरी, ईशा श्रावणी आणि श्रेयस तळपदे यांसारखे कलाकार आहेत.

हे देखील वाचा