‘जाने मेरी जानेमन बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे.’ आणि ‘एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, ज़िंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है’ यांसारखी गाणी कानावर पडली की, आठवतात व्हायरल व्हिडिओंमुळे रातोरात स्टार झालेले सहदेव दिरडो आणि रानू मंडल. काय नशीब म्हणायचं ना यांचं. एक व्हिडिओ काय व्हायरल झाला, आणि संपूर्ण भारतात ते एकाच झटक्यात प्रसिद्ध झाले. ही कमाल आहे सोशल मीडियाची. इंटरनेटच्या युगात, सोशल मीडिया इतका शक्तिशाली झालाय की, फक्त एका क्लिकमध्ये कोणाचंही नशीब बदलू शकतं. नेटकऱ्यांना वाटलं, तर ते एखाद्याला रातोरात स्टार बनवू शकता, आणि यशाच्या शिखरावरून जमिनीवरही आणू शकतात. आजच्या या लेखात आपण सहदेव दिरडो आणि रानू मंडल यांच्यासारखेच रातोरात स्टार झालेल्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत.
रानू मंडल –
रानू मंडलचं नशीब व्हायरल व्हिडिओमुळंच फळफळलं होतं. ती २०१९ साली रेल्वे स्टेशनवर गानकोकिळा लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा’ हे गाणं गाताना दिसली होती. ती रेल्वे स्टेशनवर भीक मागत गाणं गात होती. तिचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ आणि तिचा आवाज लोकांना खूपच आवडला. मग काय आता लोकांना आवडलाय म्हणजे आला व्हिडिओ की केला फॉरवर्ड. असाच हा व्हिडिओ गेला ना थेट प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशमियाकडं. त्यालाही रानूचा आवाज खूपच भावला. हिमेशनं रानूला पहिली संधी दिली होती. ‘हॅप्पी, हार्डी और हीर’ या सिनेमात त्यानं तिला दोन गाणी गाण्याची संधी दिली. या सिनेमात रानू मंडलनं ‘आशिकी में तेरी’ आणि ‘तेरी मेरी कहानी’ ही गाणी गायली. यासाठी तिला लाखो रुपये देखील मिळाले होते. मात्र ही लोकप्रियता रानूला व्यवस्थित सांभाळता आली नाही. ती सध्या अनेक व्हायरल व्हिडिओंवर डान्स किंवा गाणी गाताना दिसते आणि चर्चेत येते.
सहदेव दिरडो –
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका शाळकरी मुलाच्या आवाजातील ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे’ या गाण्याने सगळीकडेच धुमाकूळ माजवला होता. अजूनही या गाण्याचा फिव्हर लोकांवरून गेलेला नाहीये. हे गाणं गायलं होतं छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील रहिवासी असलेला सहदेव दिरडोनं. २ वर्षांपूर्वी त्याच्या शिक्षकानं त्याचा हा व्हिडिओ शूट केला होता. हे गाणं इतकं व्हायरल झालं की, थेट बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहपर्यंत पोहोचलं होतं… त्यानंही या गाण्याचं नवीन व्हर्जन तयार केलं आणि त्यात सहदेवला घेतलं. यानंतर तोही चांगलाच प्रसिद्ध झाला. इतकंच नाही, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या आग्रहामुळे सहदेवने आपल्या स्टाईलमध्ये हे गाणं ऐकवलंही होतं. मुख्यमंत्री बघेल यांनी सहदेवच्या गायन स्टाईलची स्तुती करत भविष्यासाठी त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या.
योहानी-
२०२१ साली म्हणजेच लय नाही मागच्या ४-५ महिन्यांपूर्वी आणखी एक गायिका इंटरनेट सेन्सेशन बनली होती, ती म्हणजेच योहानी. योहानी तिच्या ‘मनिके मागे हिते’ या गाण्यामुळे चांगलीच प्रसिद्ध झाली होती. एकही शब्द धड समजत नसला, तरी ‘हे’ गाणं ऐकायचा भारतीयांचा मोह काही आवरेनासा झालेला. खुद्द बिग बींनाही तिच्या गाण्याने भुरळ घातलेली. हिंदी, मराठी अशा अनेक व्हर्जनमध्ये तिचं हे गाणं रिलीझ झालं होतं. सामान्य लोकांपासून ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता यांनी या गाण्याचं मराठी व्हर्जन गायलं होतं. योहानीचे पूर्ण नाव योहानी दिलोका डिसिल्वा असे आहे. ती मूळची श्रीलंकेचीच. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे ३० जुलै १९९३ रोजी तिचा जन्म झाला. तिने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ती लंडनला रवाना झाली. तिथे तिने लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट ऍंड प्रोफेशनल अकाउंट ही पदवी संपादन केली.
दानानीर मुबीन –
हे नाव ऐकून तुम्हाला ओळख पटणार नाही, पण ‘पावरी गर्ल’ म्हणताच तुमच्या डोक्यातही घंटी वाजेल. अरे हा ही तर इंटरनेट सेन्सेशन मुलगी आहे. दानानीरच्या ‘पावरी हो रही है.’ या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ माजवलेली. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ती ‘ये मैं हूं, ये मेरे दोस्त हैं और हम यहाँ पावरी कर रहे है’ असं म्हणताना दिसलेली. या गाण्यावर अनुपम खेर, शाहिद कपूर, प्रिया बापट यांनीही व्हिडिओ बनवले होते. विशेष म्हणजे, तिने छोट्या पडद्यावरही डेब्यू केलाय. ती ‘सिन्फ-ए-आहान’ या आगामी ड्रामा सीरियलमध्ये काम करतेय.
भुबन बड्डोकर –
सध्या सगळीकडे कच्चा बदाम हे गाणं ट्रेंडिंग आहे. ‘कच्चा बदाम’ हे गाणं कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायलं नाही, तर हे गाणं गाण रस्त्यावर शेंगदाणे विकणाऱ्या व्यक्तीने गायलंय. होय, तुमचा विश्वास बसत नसला, तरी हे खरंय. या गाण्याला आवाज देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे भुबन बड्डोकर. तो पश्चिम बंगालचा आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोलकाता येथील असल्याचे सांगितले जात आहे. जिथे भुबन ‘कच्च्या बदामा’चे गाणे गातो आणि ग्राहकांना शेंगदाणे खरेदी करण्यास सांगतो. भुबनची शेंगदाणे विकण्याची पद्धत लोकांना आवडते, त्याची स्टाईल सोशल मीडिया युजर्सची मने जिंकत आहे आणि तो देशभर प्रसिद्ध होत आहे. विशेष म्हणजे, या गाण्यावर अनेक डान्स व्हिडिओ तयार केले जात आहेत. सामान्यांनाच नाही, तर बॉलिवूड कलाकारांनाही या गाण्याने भुरळ घातलीये.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉसच्या घरात जमलं यांचं! या जोड्यांनी गाजवलंय बिग बॉस
‘सुलतान’च्या सेटवर अचानक पोहोचलेला ‘पठाण’, पुढं दोघांनीही केलं अविश्वसनीय कृत्य
‘पैसे मिळायचे पण…’ कपिल शर्मा शो सोडण्याचे कारण सांगताना हे काय बोलून बसली उपासना सिंग