Wednesday, July 3, 2024

अवघ्या सोळाव्या वर्षी आशा ताईंनी केले होते ३१ वर्षाच्या माणसासोबत लग्न, लतादीदींनी दिली होती ‘ही’ मोठी शिक्षा

संगीताची मेजवानी असलेलं मराठमोळं कुटुंब म्हणजेच मंगेशकर कुटुंब. संगीत विश्वातील प्रत्येक गायकाला आपला आवाज सुरेल ठेवण्यासाठी अपार कष्ट आणि दररोज रियाज करावा लागतो. संगीतातला प्रत्येक क्षण जगत त्यातील प्रत्येक स्वर अलगतपणे झेलावे लागतात. मराठीमध्ये स्वरांच्या या मैफिलीत सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, आशा भोसले ही नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतात. या सर्व ज्येष्ठ गायकांच्या यादीमध्ये आशा भोसले या नावाने कायमच वरचा दर्जा गाठला आहे.

‘आशा’ दोन अक्षरांची परिपूर्ण गाथा. ज्यात संगीतातले सात स्वर आणि बावीस श्रुतींचा साज चढलेला आहे. भाव गीत आणि शास्त्रीय संगीतपासून ते डिस्को आणि कॅब्रेपर्यंत आशा ताईंनी त्यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे. त्यांनी जबरदस्त ठसका, खट्याळ, मादक अशा गाण्यांनी प्रेक्षकांना घायाळ केले. तर भावपूर्ण, दुःखदायी अशा गाण्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. तब्बल पाच दशके हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टित आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आशा ताई भोसले या (८ सप्टेंबर) वाढदिवस साजरी करत आहेत. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास.

संगीताच्या मेजवानीत आशा ताई म्हणजे शेवटचा गोड पदार्थ. त्या बुधवारी (८ सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करतात. त्यांचा जन्म सांगली येथे ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. त्या केवळ नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर मंगेशकर कुटुंबीय पुण्याहून मुंबईला आले. त्यांना आपल्या संगीताच्या कारकिर्दीमध्ये लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांकडून कायमच मोलाचं मार्गदर्शन मिळालं. आशा ताईंनी भारताच्या प्रत्येक प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. (Superhit singer asha Bhosle birthday know about singer unknown facts)

कुटुंबियांच्या विरोधात जाऊन उचलले होते चुकीचे पाऊल
आशा ताईंच्या डोक्यावरुन वडिलांच छत्र खूप कमी वयातच निघून गेलं. त्यामुळे त्यांची सर्व जबाबदारी लता ताईंनी स्वतःवर घेतली. आज संपूर्ण भारतात नाव कमावलेल्या आशा ताईंना एकेकाळी रोजचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले होते. त्यांनी लता ताईंचे सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. तेव्हा आशा ताई फक्त १६ वर्षांच्या होत्या आणि त्यांचे पती ३१ वर्षांचे होते. आशा ताईंनी चुकीचं पाऊल उचलल्याने लता दीदींनी त्यांच्याबरोबर बोलणं सोडून दिलं. परंतु दोन्ही पती पत्नीमध्ये होत असलेल्या सततच्या भांडणामुळे आशा ताई आपल्या मुलांसह माहेरी परतल्या.

‘मला गाणं गाता येत नाही’
हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या आवाजाने चाहत्यांना वेड लावलेले संगीतकार सज्जाद हुसैन यांच्याकडून आशा ताईंनी संगीताचे धडे गिरवले. सज्जाद हुसैन हे मुळातच कडक स्वभावाचे होते. त्यामुळे आशा ताईंनी सुरवातीलाच त्यांना सांगितले की, “मला काही गाणं गाता येत नाही. तुम्ही जे शिकवाल तेच मी गाईल.” यावर सज्जाद हुसैन म्हणाले की, “अगं जर तुला गाता येतच नाही, तर मी ओरडण्याचा प्रश्न येतो तरी कुठे. मी जे शिकवेल तेच तू गा.” त्यांनतर त्यांना ‘परिणीता’ आणि ‘बूटपॉलिश’ या सिनेमांमध्ये गायची संधी मिळाली.

संगीताची सुरुवात
आशा ताईंनी ‘माझा बाळ’ या चित्रपटात पाहिले गाणे गायले होते. त्यांनी मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या संगीताच्या रोपट्याला मधुर आवाजाने वटवृक्ष बनवले. त्यांनी मराठीमध्ये गायलेली सर्वच गाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत होती. त्याकाळी हिंदी सिनेसृष्टीत लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिकांच्या वर्चस्वामध्ये त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याकाळी त्यांनी ए.आर.कुरेशी, सज्जद हुसैन, गुलाम मोहोम्मद या संगीतकारांसाठी गाणी गायली. आशा ताईंनी ‘रेशमांच्या रेघांनी’, ‘थांब जरा थांब’, ‘आओ हुजूर’, ‘छोड दो ऑंचल जमाना क्या कहेंगा’ अशी अनेक गाणी त्यांनी गायली आणि आजही रसिक प्रेक्षक त्यांची ही गाणी आवडीने पाहतात. साल १९५७ मध्ये बी.आर.चोपडा यांच्या ‘नया दौर’ या चित्रपटामध्ये आशा ताईंनी प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी सर्वच गाणी गायली. यामध्ये ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ हे गाणे चांगलेच गाजले. तसेच चित्रपट ‘उमराव जान’साठी त्यांनी गजल देखील गायली.

आशा ताईंच्या दुसऱ्या लग्नात होते मोठे अडथळे
आशा ताई आणि आर.डी.बर्मन १९५६ साली पहिल्यांदा भेटले. या दोघांनीही एकत्र अनेक गाणी गायली. तसेच त्यांनी आर.डी.बर्मन यांच्या काम्पोजिशनमध्ये बनलेली ‘आजा आजा’, ‘ओ हसीना जुल्फों वाली’ आणि ‘ओ मेरे सोना रे’ ही सदाबहार हिट गाणी देखील गायली. या दोघांनी जवळ जवळ १४ वर्ष एकत्र काम केले. याकाळी त्यांच्या गाण्यांमुळेच त्यांच्यात जवळीक वाढली. त्यांनी अनेक गाण्यांनाच आपल्या प्रेमाची भाषा बनवले होते. यावेळी सर्वत्र त्यांच्या प्रेम कहाणीची चांगलीच चर्चा सुरु होती. या दोघांनी लग्नगाठीत अडकण्याचे ठरवले. परंतु त्यांच्या विवाहाचा मार्ग एवढा सोप्पा नव्हता.

आशा ताई या आर.डी.बर्मन यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. त्यामुळे बर्मन यांच्या आईंनी या लग्नाला नकार दिला होता. त्यावेळी एवढा तणाव निर्माण झाला होता की, आशा ताईंना नकार देत त्यांच्या आई म्हणाल्या होत्या, “जोवर माझ्या जीवात जीव आहे तोवर मी हे लग्न होऊ नाही देणार. तुला हवं, तर तू आशाला माझ्या मृत शरीरावरुन घेऊन जा.” त्यानंतर आर.डी.बर्मन यांच्या वडिलांचा काही कारणास्तव मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या आई खूप खचल्या. त्या मनोरुग्ण झाल्या आणि आपल्या मुलाची ओळख देखील विसरल्या. आईवर खूप उपचार करून देखील त्यांची परिस्थिती काही सुधारत नव्हती. त्यामुळे साल १९८०मध्ये त्यांनी आशा ताईंसोबत विवाह केला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
‘मी काहीच विसरले नाही, मी अखेरची मुघल आहे…’, आशा भोसलेंच्या विधानाने वेधले सर्वांचे लक्ष
कंगना रणौतने केले शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे कौतुक; म्हणाली, ‘गॉड ऑफ सिनेमा’

हे देखील वाचा