Tuesday, July 9, 2024

टीव्ही जगातल्या ‘दादी’ सुरेखा सिक्री यांनी विविध भूमिकांनी जिंकली प्रेक्षकांची मनं! एकेकाळी उपचार घेण्यासाठीही नव्हते पैसे

टीव्हीच्या जगात ‘दादी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेखा सिक्री, यांनी छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. चित्रपट आणि टीव्ही व्यतिरिक्त सुरेखा थिएटर कलाकार देखील आहेत. त्यांनी १९७८ मध्ये ‘किस्सा कुर्सी का’ या राजकीय चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. हिंदी व्यतिरिक्त त्या मल्याळम चित्रपटांचा देखील भाग राहिल्या आहेत. १९ एप्रिल, १९४५ रोजी जन्मलेल्या सुरेखा यांनी तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. चला तर मग आज टीव्हीच्या ‘आजीबाई’ सुरेखा सिक्रीबद्दल काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात.

सुरेखा सिक्री यांनी मोठ्या पडद्यावर बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि टीव्ही विश्वात काम करूनही बरीच प्रसिद्धी मिळवली. ‘बालिका वधू’ मालिकेमध्ये सुरेखा यांनी एका कडक आजीसासूची भूमिका साकारली होती, जिच्या आदेशाशिवाय घरातील पानही हलत नसे. तथापि, काळानुसार त्यांचे वागणे बदलत जाते आणि जी आजीसासू सूनबाईंना रागवत असे, तिच नंतर त्यांना आईपेक्षा जास्त जीव लावू लागली. या भूमिकेत सुरेखा यांना चांगलीच पसंती मिळाली होती.

‘बालिका वधू’ व्यतिरिक्त त्यांनी ‘एक था राजा एक थी राणी’ या शोमध्ये ज्येष्ठ राणी आईची भूमिका साकारली होती. त्याचवेळी त्यांनी ‘परदेस में है मेरा दिल’ मध्ये इंदुमती लाला मेहराची व्यक्तिरेखा साकारली होती. सुरेखा सिक्री टीव्हीच्या जवळजवळ सर्व मालिकांमध्ये आजी किंवा मोठी आई म्हणून दिसल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाचा एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला.

त्यांच्या चित्रपटांमधील अभिनयालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘तमस’ (१९८६), ‘नजर’ (१९९१), ‘सरदारी बेगम’ (१९९६), ‘सरफरोश’ (१९९९), ‘तुमसा नहीं देखा’ (२००४) यांचा समावेश आहे. साल २०१८ मध्ये रिलीझ झालेल्या ‘बधाई हो’ या विनोदी चित्रपटामध्ये, त्यांनी आयुष्मान खुरानाची आजी दुर्गा देवी कौशिकची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जिंकला.

आपल्या कारकीर्दीत बरेच हिट चित्रपट आणि मालिका देणाऱ्या सुरेखा सिक्री एकेकाळी आर्थिक संकटातून जात होत्या. दरम्यान, त्यांना अचानक ब्रेन स्ट्रोक आला. पैशाअभावी त्यांच्या उपचारातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. ‘बधाई हो’च्या रिलीझच्या वेळीही त्यांना असाच स्ट्रोक आला होता. यामुळे त्यांना अर्धांगवायूही झाला. यानंतरपासून एक नर्स नेहमी त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांच्यासोबत असते. आजारपणात मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

-सर्किट होणं सोप्पं नव्हतं भाऊ! चौदाव्या वर्षीच आई-बापाचे छत्र हरपलेल्या अर्शद पुढे असा झाला सुपरस्टार

-‘तुम्ही तुमचे काम करा’, फिरोज खान यांचे शब्द ऐकताच अभिनेते राजकुमार झाले होते रागाने लालेलाल, दिली होती ‘ही’ धमकी

हे देखील वाचा