Sunday, July 14, 2024

SSR जयंती | आज वाचा सुशांत आणि रिया यांची खरी लव्हस्टोरी, काही गोष्टींची कल्पनाच नसेल

कमी काळात बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण करणे ही प्रत्येक कलाकाराला जमेलच अशी गोष्ट नाही. भले-भले कलाकार येतात आणि जातात, पण त्यातही उजवा ठरतो तोच पुढे जातो. तसेच आख्ख्या बॉलिवूडला आपली दखल घेण्यास भाग पाडतो. असाच एक अभिनेता होता, तो म्हणजे सुशांत सिंग राजपूत. सुशांत आज आपल्यात नाही, पण तो सदैव चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहील. सुशांतचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. त्यापैकीच एक म्हणजे रिया चक्रवर्ती. रियाची चर्चा सर्वाधिक झाली होती, पण तुम्हाला माहितीये का? की, सुशांत आणि रियाची भेट नक्की कशी झाली होती? नसेल, तर आज या लेखातून आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे, शुक्रवारी (२१ जानेवारी) सुशांतची ३६ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने सुशात आणि रियाच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया.

दिनांक २१ जानेवारी, १९८६ रोजी बिहारमधील पाटण्यात जन्मलेल्या सुशांतची रियासोबत पहिली भेट यश राज फिल्म्स स्टुडिओमध्ये झाली होती. पुढे सुशांत जेव्हा ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाची शूटिंग करत होता, तेव्हा रिया ‘मेरे डॅड की मारुती’ सिनेमाची शूटिंग करत होती. दोन्ही सिनेमांचे सेट जवळच असल्याने त्यांच्या भेटी व्हायला सुरुवात झाली, तेव्हा सुशांत आधीच एका रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर रिया आणि सुशांतच्या भेटी वाढल्या. आधी मैत्री आणि मग प्रेम असा प्रवास असणाऱ्या या दोघांच्या नात्यात अनेक चढ- उतार आले.

सन २००९ पासून ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला सुशांत आपली सहअभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत (Ankita Lokhande) रिलेशनशिपमध्ये होता. त्यांचे नाते कोणापासूनही लपून नव्हते. २००९ ते २०१४ यादरम्यान ते ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम करत होते. पण पुढे सुशांत आणि अंकिताच्या रिलेशनशिपमध्ये चढ-उतार येऊ लागले आणि त्यांचे रिलेशनशिप एवढे ताणले गेले की, ते तुटल्याशिवाय मार्गच नव्हता. २०१६ दरम्यान अंकितापासून वेगळे झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. तब्बल ७ वर्षांचे नाते संपले होते.

अंकितापासून वेगळे झाल्यानंतर रिया चक्रवर्तीच्या जवळ
अंकितापासून वेगळे झाल्यानंतर सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या जवळ आला. या दोघांनीही सन २०१८ दरम्यान एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१९ मध्ये हे दोघेही रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यांनी जरी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नसली, तरीही त्यांचे प्रेम सोशल मीडियावर संपूर्ण जग पाहत होते.

सुशांतच्या मृत्यूने रिया अडचणीत
रिया आणि सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, पण त्याच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच ती त्याला सोडून निघून गेली होती. १४ जून, २०२० रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर तिला मुख्य आरोपी मानले गेले होते. सुशांतला जाळ्यात अडकवून त्याचे पैसे हडप केल्याचा आरोप रियावर लावला गेला होता. परंतु याबाबत कोणताही पुरावा मिळाला नाही. एवढंच काय तर सुशांतच्या मृत्यूनंतर तिला जेलची हवा देखील खायला लागली होती. ती सध्या जामिनावर बाहेर आहे, पण तिच्यावरचे आरोप आजही कायम आहेत.

सुशांतच्या कुटुंबीयांनी लावलेल्या सगळ्या आरोपांचे रियाने सोशल मीडियावर खंडन केले होते. त्याच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेली रिया आजही अनेकवेळा सुशांतबद्दल असलेले प्रेम व्यक्त करताना दिसत असते. सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त तिने फोटो शेअर करून लिहिले होते की, “मला माहित आहे तू इथेच माझ्यासोबत आहे.”

आर्मी ऑफिसरची मुलगी असलेल्या रियाने तिच्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवरील ‘वीजे’मधून केली होती. तिने तेलुगू चित्रपटात काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने ‘मेरे डॅड और मारूती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दुसरीकडे सुशांतला सन २०१३ साली अभिषेक कपूर यांच्या ‘काय पो छे’ सिनेमात मुख्य भूमिका मिळाली. सुशांतने चित्रपटासाठी फिल्म मेकिंगचा कोर्स करण्याचे पुढे ढकलले. या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये यशस्वी आणि दमदार पदार्पण केले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. पण अशा हरहुन्नरी अभिनेत्याचा वाईट अंत होणे सर्वांसाठीच धक्कादायक होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा