Latest Posts

पॅशनसाठी इंजिनीयरिंगचे स्वप्न सोडून सुशांतने धरली होती अभिनयाची वाट; स्वप्नवत ठरला त्याचा अभिनय प्रवास


बरोबर एक वर्षांपूर्वी आजच्या दिवशी बॉलिवूडने एका मोठ्या कलाकाराला गमावले. अभिनेता सुशांत सिंग राजपूत १४ जून २०२० रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरात मृत अवस्थेत आढळला होता. अतिशय हुशार, हसतमुख, शांत मात्र चित्रपटांमधून व्यक्त होणारा सुशांत कायमचाच शांत झाला. अभिनयाच्या आवडीमुळे इंजिनीयरिंगचे शिक्षण अर्धवट सोडलेल्या सुशांतने खूपच कमी वेळात त्याच्या अभिनयाने सर्वाना भुरळ घातली. प्रत्येक भूमिका अगदी जिवंत वाटावी इतक्या ताकदीने काम करणाऱ्या सुशांतच्या निधनाची बातमी आज एक वर्षांनंतरही त्याच्या फॅन्सला पचवण्यास जड जात आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी सुशांतने आपला निरोप घेतला. त्याच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्याच्या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे. आज त्याच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याचा जीवनातील काही महत्वाच्या टप्प्यांबद्दल.

ऐश्वर्या राय बच्चनसोबत ज्युनिअर डान्सर म्हणून केला होता डान्स 

२१ जानेवारी १९८६ रोजी सुशांतचा बिहारमधील पाटण्यात जन्म झाला. सुशांत त्याच्या बहिणींमध्ये सर्वात लहान होता. २००२ साली सुशांतच्या आईच्या मृत्यूनंतर राजपूत कुटुंब दिल्लीला आले. तिथेच सुशांतने त्याचे उर्वरित शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्याने दिल्ली विद्यापीठातच इंजिनीयरिंगसाठी प्रवेश घेतला. सोबतच त्याने श्यामक डावरचा डान्स ग्रुप जॉइन केला. श्यामकसोबत डान्स शिकत असतानाच सुशांतने देश-विदेशात अनेक शोज केले. सोबतच अनेक चित्रपटात बॅकग्राउंड डान्सरचेही काम केले. २००६ मध्ये सुशांतने ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये परफॉर्म केले होते. त्याने ऐश्वर्या राय बच्चनसोबत ज्युनिअर डान्सर म्हणून डान्स केला होता. या डान्समध्ये त्याने ऐश्वर्याला उचलून घेतले होते. एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते की, “हा शो झाल्यानंतर मी कॉलेजमध्ये खूप फेमस झालो. डान्समध्ये मी ऐश्वर्या रायला उचलल्यामुळे कॉलेजमध्ये खूप स्टाइल देखील मारायचो.”

अशी मिळाली ‘किस देश मैं मेरा दिल’ मालिका

सुशांतने डान्ससोबतच अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यास देखील सुरुवात केली. कॉलेजमध्ये सुशांतची एआयईईईमध्ये ऑल इंडियामध्ये ७ वी रँक आली होती. मात्र अभिनयाच्या आवडीमुळे आणि याच क्षेत्रात करियर करण्याच्या दृष्टीने त्याने शिक्षण अर्धवट सोडले. इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षाला असताना त्याने अभ्यास अर्धवट सोडला आणि अभिनयात करिअर बनवण्यासाठी तो मुंबईत आला. पुढे त्याने नादिरा बब्बर यांच्या ग्रुपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत थिएटरदेखील केले. मुंबईत आल्यावर तो पृथ्वी थिएटरमध्ये काम करू लागला. यातच त्याला बालाजी टेलिफिल्म्सचा ‘किस देश मैं मेरा दिल’ हा शो मिळाला. या शो मध्ये त्याने दुसरी महत्वाची भूमिका साकारली होती. मात्र ही भूमिका काही कालावधीनंतर शो मधून काढून टाकण्यात आली.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेने मिळवून दिली खरी ओळख

या भूमिकेला आणि सुशांतला मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेनंतर एकता कपूरने सुशांतला तिच्या दुसऱ्या आणि मोठ्या अशा ‘पवित्र रिश्ता’ मालिकेसाठी साइन केले. या मालिकेने सुशांतच्या लोकप्रियतेत अधिक भर घालत त्याला घराघरात पोहचवले. ती मालिका, यातली सुशांतची भूमिका आणि सुशांत आणि अंकिता लोखंडेची जोडी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. याच मालिकेच्या निमित्ताने सुशांतच्या खऱ्या आयुष्यात अंकिता लोखंडेची एन्ट्री झाली. रिल आणि रियल लाइफ मधील ही जोडी प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळवत होती. मात्र सुशांतला एवढ्यावरच थांबायचे नव्हते, त्याला अजून काहीतरी चांगले आणि मोठे करायचे होते. म्हणून त्याने परदेशात जाऊन फिल्म मेकिंगचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने ‘पवित्र रिश्ता’ मालिका देखील सोडली. याच दरम्यान सुशांतने ‘राज २’ सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. (sushant singh rajput first death anniversary tv star to bollywood actor sushant singh rajput journey)

‘काय पो छे’ द्वारे बॉलिवूडमध्ये दमदार एंंट्री

‘पवित्र रिश्ता’ मालिका सुरु असताना त्याने कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांच्या सांगण्यावरून एक ऑडिशन दिली होती. याच ऑडिशनमुळे सुशांतला परदेशात फिल्म मेकिंगचा कोर्स करायला जायच्या आधी अभिषेक कपूर यांच्या ‘काय पो छे’ सिनेमात मुख्य भूमिका मिळाली. सुशांतने चित्रपटासाठी फिल्म मेकिंगचा कोर्स करण्याचे पुढे ढकलले. या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये यशस्वी आणि दमदार पदार्पण केले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आणि केवळ मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने त्याचे एक वेगळे स्थान या मनोरंजन क्षेत्रात निर्माण केले. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच त्याने राजकुमार हिरानी यांचा ‘पीके’ चित्रपट साइन केला. चित्रपट करत असतानाच सुशांत आणि अंकिता ही लोकप्रिय जोडी वेगळी झाली. त्यांचे ब्रेकअप झाले आणि दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

‘एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’

सुशांतने यशराज सोबत तीन चित्रपटांचा करार केला. ज्यात ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी’ आणि ‘पाणी’ मात्र शेखर कपूर यांचा ‘पाणी’ हा सिनेमा काही कारणामुळे रखडला. पुढे काही महिन्यांनी सुशांत आणि यशराजचा करार देखील संपला. यावेळेसच सुशांतने भारतीय क्रिकेटचा माजी कप्तान असलेल्या महेंद्र सिंग धोनी’चा जीवनपट असलेल्या ‘एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’. सिनेमात मुख्य भूमिका मिळवली. हा सिनेमा आणि यातील सुशांतचा अभिनय तुफान गाजला. याच सिनेमातून सुशांतने त्याच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर आणले. हा सिनेमा बघताना हा विचार प्रत्येकालाच वाटला असेल की, आपण खरा धोनीच पडद्यावर बघतोय किंवा या भूमिकेसाठी सुशांतशिवाय दुसरा कोणताच पर्याय योग्य ठरला नसता.

राहत्या घरी घेतला गळफास

या सिनेमानंतर सुशांतचे ‘केदारनाथ’, ‘राबता’, ‘सोनचिडीया’, ‘छिछोरे’ हे सिनेमे प्रदर्शित झाले. यातल्या ‘छिछोरे’
सिनेमाला तुफान यश मिळाले सोबतच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. सुशांतला रामलीला, फितूर, अंधाधुन, हाफ गर्लफ्रेंड आदी सिनेमे देखील ऑफर झाले होते. मात्र काही कारणास्तव हे सिनेमे त्याने केले नाही. सुशांतचे करियर अतिशय चांगल्या वळवणार असताना अचानक सुशांतच्या निधनाची बातमी येऊन धडकली आणि इंडस्ट्रीसह, त्याचे फॅन्स, कुटुंब आणि मित्र परिवाराला देखील मोठा धक्का बसला. १४ जून २०२० रोजी सुशांत राहत असलेल्या घराच्या बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता.

गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सापडली संशयाच्या चौकटीत

आज सुशांतच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर देखील त्याचा मृत्य आत्महत्या की हत्या हे शोधून काढण्यात कोणालाच यश आले नाहीये. सुशांतच्या मृत्यूचा तपास करताना ड्रग्स, बॉलिवूडची लॉबी, घराणेशाही, गटबाजी, मानसिक तणाव इतर अनेक मुद्दे समोर आले. मात्र जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचे कारण आणि हत्या झाली तर का आणि कोणी केली याचा शोध लागला नाही. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी अभिनेत्री आणि त्याची गर्लफ्रेंड असलेल्या रिया चक्रवर्तीला संशयाच्या चौकटीत उभे केले होते. तिला या प्रकरणी अटक देखील झाली होती, मात्र सध्या रिया जामिनावर बाहेर आहे.

सुशांतला एक अंतराळवीर व्हायचे होते

सुशांत अतिशय हुशार अभिनेता होता. तो गेल्यानंतर त्याच्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हा त्यात दिसणाऱ्या सुशांतच्या घरात अनेक पुस्तके दिसत होती. त्याचा वाचनाची खूप आवड होती. सोबतच त्याच्या घरातल्या लिविंग रूममध्ये एक टेलीस्कोप देखील ठेवला होता. याच टेलीस्कोपमधून सुशांत अंतराळाचे निरीक्षण करायचा. त्याचं घरात नासाची अनेक चित्रे देखील लावली होती. तो स्वतः नासामध्ये जाऊन आला होता. सुशांतला एक अंतराळवीर व्हायचे होते, नंतर त्याला एयरफोर्समध्ये जायचे होते. मात्र त्याने शिक्षण इंजिनीयरिंगचे घेतले आणि शेवटी तो सिनेमात आला.

गावी जाऊन केला आईचा नवस पूर्ण

सुशांत अतिशय धार्मिक होता. कर्मासोबतच त्याचा देवावर देखील खूप विश्वास होता. तो शंकराचा मोठा भक्त होता. अनेकदा तो सोशल मीडियावर शंकराचे फोटो पोस्ट करायचा. सोबतच शंकराची पूजा करत असलेले व्हिडिओ देखील त्याचे व्हायरल झाले होते. ‘छिछोरे’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुशांत त्याच्या गावी पोहचला होता. १७ वर्षांनी तो बिहारच्या त्याच्या मूळ गावी गेला होता. तिथे जाऊन त्याने त्याच्या आईची इच्छा पूर्ण केली होती. त्या गावी सुशांतच्या आईने मुलगा चांगला राहू दे, यश मिळू दे असे नवस बोलले होते. तेच फेडण्यासाठी तो गावी गेला आणि आईचा नवस पूर्ण केला होता.

सुशांत एका सिनेमासाठी ५/६ कोटी रुपये घ्यायचा. त्याच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर त्याच्या कडे ५९ कोटी रुपयांची संपत्ती होती. सोबतच त्याला गाड्यांची देखील खूप आवड होती त्याच्याकडे Maserati Quattroporto, Land rover, Range Rover ,BMW K1300R आदी अनेक महागड्या गाड्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला प्रेग्नेंट राहायला आवडते का?’, म्हणणाऱ्या युजरची अभिनेत्रीने केली बोलती बंद; म्हणाली, ‘आता बास…’

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss