Wednesday, July 3, 2024

‘आता हा गंध मनात ठेवून…’, सुव्रत जोशीच्या कलाकृतीची निवृत्ती, पोस्ट शेअर करत दिली माहिती

सोशल मीडिया आल्यामुळे आपले विचार, मतं मांडणे खूपच सोपे झाले आहे. सामान्य लोकांपासून कलाकारांपर्यंत सर्वच मनमोकळ्यापणाने त्यांचे विचार या माध्यमातून मांडत व्यक्त होतात. मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय उत्तम अभिनेता म्हणून ओळख असलेल्या सुव्रत जोशीने आतापर्यंत विविध मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. सुव्रत नेहमीच त्याच्या कामातील वैविध्यतेसाठी ओळखला जातो. सध्या सुव्रत आणि त्याची एक पोस्ट खूपच चर्चेत आली आहे. सुव्रतचे अतिशय गाजलेले किंबहुना गाजत असलेले नाटक म्हणजे ‘अमर फोटो स्टुडिओ’ आता हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर सुव्रतने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत नाटकाबद्दल माहिती देत कलाकारांचे आभार मानले आहे. याशिवाय हे नाटक कसे सुरु झाले याबद्दल देखील लिहिले आहे.

सुव्रतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “२०१६ साली सखी,अमेय आणि मी एकत्र येऊन “कलाकारखाना” आणि “अमर फोटो स्टुडिओ” चे बीज पेरले. हेतू होता मराठी व्यावसायिक रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात आपल्याला हवा तसा कलात्मक अनुभव देणारी नाटके निर्माण करणे. त्या प्रवाहाचा विस्तार आपल्या पध्दतीने, आपल्या कुवतीनुसार थोडा वाढवणे,त्याला नवे वळण देणे,किंवा नवनवे कालवे काढणे! त्यामुळे नवा,तरुण प्रेक्षकवर्ग कदाचीत रंगभूमीकडे पाय वळवेल आणि “मराठी नाटक” नावाच्या या गोड नदीचे पाणी चाखायची चटक त्याच्याही जिभेला लागेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sula (@suvratjoshi)

पुढे तो लिहितो, “अमर फोटो स्टुडिओ” चे बीज आम्ही रोवले पण मनस्विनी या तरुण, अस्सल प्रतिभावान लेखिकेच्या लेखणीचे खत त्याला मिळाले. निपुण धर्माधिकारी हा बारा रंगभूमींचे पाणी प्यायलेला दिग्दर्शक याला आवश्यक असलेला कल्पनाशक्तीचा ओलावा घेऊन आला. बीजाचे रोप झाले पण त्याचे झाड व्हायचे तर या नाजूक अवस्थेत सावली पुरवणारा भक्कम आधारवड हवा होता त्यासाठी सुनील बर्वे दादा हा त्याच्या सुबक आणि सुपीक व्यक्तिमत्वासहित या रोपावर स्वतःची उंच सावली धरून,भक्कम पाय रोवून शेजारी उभा राहिला. पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर या तयारीच्या कलाकारांनी त्यांचा वेळ आणि ऊर्जा देवून याच्या रंगात आणि गंधामध्ये वैविध्य आणले. पुढे पर्ण पेठे आणि साईनाथ गनुवाड हे तयारीचे कलाकार असे काही मिसळून गेले की आधीच्या फांद्या गेल्या तरी वृक्ष नव्याने डवरला. आणि मग मराठी नाट्य रसिकांनी या रोपाला प्रेमाची उब दिली, टाळ्यांचा – हशांचा सूर्यप्रकाश देऊ केला आणि योग्य प्रमाणात कौतुकाची वर्षा देखील केली. हे रोप खरोखरच चढत चढत त्याचा वृक्ष झाला आणि त्याला बहर आला. याखाली जमून गेली काही वर्षे प्रेक्षकांनी आनंदफुले वेचली. कित्येक लोक पुन्हा पुन्हा याच्या सावलीत येऊन आयुष्यातील ताण विसरून, विसावून गेले. तरुण लोक याच्या फांद्यावर पुन्हा पुन्हा येऊन, बागडून – खिदळून गेले. समीक्षक आणि पुरस्कार यांनी या वृक्षाला कुंपण दिले. ही फळे खाऊन आम्हीही तृप्त झालो.”

शेवट सुव्रतने लिहिले, “आता हा गंध मनात ठेवून…त्याचा रसरशीतपणा आतमध्ये साठवून “अमर फोटो स्टुडिओ” या कल्पवृक्षाला आम्ही निवृत्ती देत आहोत. अनेकदा असे कलेचे बहरलेले वृक्ष, ऋतू संपून जातो तरी बळजबरीने तगवून ठेवले जातात… केवळ हव्यासापोटी. आतून बाहेरून ते वठून जातात, निष्पर्ण होतात. त्यामुळे डवरलेल्या अवस्थेत त्याचा निरोप घेणे इष्ट. बहर असताना निरोप दिला तर गोष्टी मरत नाहीत तर त्या “अमर” होतात..तुम्ही सगळे एकदा शेवटचे याचा बहर झेलायला या… अगत्याचे निमंत्रण आहे.”

सध्या सुव्रतची ही पोस्ट गाजत असून, नाटक बंद होणार यामुळे अनेक नाट्यप्रेमींची निराशा झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शार्क टँक इंडिया’ची जज आहे ‘एवढ्या’ कोटींची मालकीण; वर्षाकाठी कमावते पैसाच पैसा

‘अवतार 2’ने मारलं भारतीय बॉक्स ऑफिसचं मैदान, नुकत्याच हिट झालेल्या सिनेमाला पछाडत कमावले ‘एवढे’ कोटी

हे देखील वाचा