Thursday, April 24, 2025
Home वेबसिरीज ‘तांडव’ वेबसिरीजच्या कलाकार व दिग्दर्शकाची जीभ कापून आणणाऱ्याला ‘ही’ संघटना देणार १ कोटी

‘तांडव’ वेबसिरीजच्या कलाकार व दिग्दर्शकाची जीभ कापून आणणाऱ्याला ‘ही’ संघटना देणार १ कोटी

जशी ‘तांडव’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली तशी पुढच्या काही तासातच ही सिरीज वादामध्ये अडकली आहे. ह्या सिरीजचा वाद हा दिवसागणिक वाढत असून सर्वच स्तरातून या सिरिजला प्रचंड विरोध होत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये हिंदू देवीदेवतांचा अपमान आणि जातीवादी भावना दुखावल्या गेल्याचे सांगत या सिरिजला विरोध होत आहे.

संपूर्ण देशात या वेबसिरीज विरोधात अनेक आंदोलनं, मोर्चे निघत आहे. तसेच या सिरिजविरोधात अनेक तक्रारी देखील पोलीस स्थानकात नोंदवण्यात आल्या. लोकांचा वाढत रोष बघता निर्माता, दिग्दर्शकांनी याबद्दल माफी देखील मागितली आणि आक्षेपार्ह्य सीन काढून टाकत आवश्यक ते बदल करण्याचे आश्वासन देखील सिरीजच्या टीमकडून दिले गेले. मात्र याचा काहीही फायदा झाला नाहीये.

आता या वादात करणी सेनेने उडी घेतली आहे. महाराष्ट्र करणी सेनेने या वेबसिरीजबाबत एक वेगळेच वक्तव्य केले आहे. या वेबसिरीजमधील कलाकार आणि दिग्दर्शकांची जीभ छाटून आणणाऱ्याला व्यक्तीला करणी सेनेकडून एक कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले गेले आहेत. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी हिंदू देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही आणि जो कोणी ‘तांडव’ मध्ये काम केलेल्यांची जीभ छाटून आणेल त्याला हे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे.

या सिरीजच्या पहिल्याच भागात अभिनेता जीशान अय्यूब हा भगवान शंकराच्या वेशभूषेत एक नाटक सादर करताना दाखवण्यात आले आहे. यातच तो काही विवादित संवाद म्हणतो. ह्याच संवादांना लोकांनी विरोध केला आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते राम कदम यांनीही या सीरिजला जोरदार विरोध केला असून शंकरांची मस्करी केलेला भाग हटवण्याची मागणी केली, शिवाय अभिनेता जिशान अयूब आणि निर्माता, दिग्दर्शकांनी याबाबत माफी मागावी असेही सांगण्यात आले होते.
तांडव ही वेबसिरिज एक पॉलिटिकल ड्रामा असून यात सैफ अली खानसोबतच डिंपल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही वेबसिरिज अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केली तर अली अब्बास जफर आणि हिमांशू किशन मेहरा यांच्यासोबत या वेबसिरिजची निर्मिती केली आहे.

हे देखील वाचा