बिग बॉस १९ ची फायनलिस्ट तान्या मित्तल शो संपल्यानंतरही सतत चर्चेत आहे. तिची आलिशान जीवनशैली, स्पष्टवक्तेपणा आणि आध्यात्मिक विचारांमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडेच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तान्या मित्तल (Tanya Mittal)वृंदावनला गेली होती, जिथे तिने प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये तान्या आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेमानंद महाराजांशी संवाद साधताना दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर “राधा राधा” हे भक्तिगीत ऐकू येत असून आश्रमाची शांत आणि आध्यात्मिक झलक पाहायला मिळते. तान्याने या व्हिडिओसोबत एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. तिने नमूद केले की, आपला भाऊ, वहिनी, कुटुंबातील सदस्य आणि लाडक्या भाच्यांसोबत प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद मिळाल्याचा तिला आनंद झाला. तिने कुटुंबातील संस्कार आणि मूल्यांवरही भर दिला आहे.
या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तान्याच्या विचारांचे कौतुक केले आहे. अनेकांनी “संपत्ती आणि प्रसिद्धीपेक्षा मूल्ये महत्त्वाची” असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी तिच्या आध्यात्मिक प्रवासाचे स्वागत केले आहे.
दरम्यान, बिग बॉस १९ दरम्यान तान्या मित्तलने तिच्या आलिशान घराबाबत केलेले दावेही चर्चेचा विषय ठरले होते. घरात वेगवेगळ्या मजल्यांवर अन्न पोहोचवणारी लिफ्ट असल्याच्या तिच्या वक्तव्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र अलीकडील रिपोर्ट्स आणि व्हिडिओ फुटेजमधून स्पष्ट झाले आहे की तान्या ग्वाल्हेरमधील अतिशय श्रीमंत कुटुंबातून येते आणि तिचे दावे खरे ठरले आहेत.
तान्या मित्तल ही एक भारतीय मॉडेल, उद्योजिका, आध्यात्मिक वक्त्या आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. २०१८ मध्ये तिने ‘मिस एशिया टुरिझम’ हा किताब जिंकला होता. बिग बॉस १९ मध्ये टॉप ५ फायनलिस्ट म्हणून पोहोचत तिने मोठी लोकप्रियता मिळवली असून, शो संपल्यानंतरही ती सतत चर्चेत राहात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
आर्यन खानला पहिला पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरीने व्यक्त केला आनंद, प्रेक्षकांचे मानले आभार










