Wednesday, July 3, 2024

लाडक्या नट्टु काकांना निरोप देताना तारक मेहताची टीम झाली भावूक, जेठालालला अश्रू अनावर….

 

सोनीसब वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत नट्टु काकाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते घनश्याम नायक यांच्या दुःखद निधनाने अवघ्या हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या लाडक्या नट्टु काकांना अखेरचा निरोप देण्यासाठी तारक मेहताची संपूर्ण टीम उपस्थित झाली होती. यावेळी मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेले जेठालाल म्हणजेच अभिनेता दिलीप जोशी यांना मात्र अश्रू अनावर झाले.

तारक मेहता का उलटा चष्मा या लोकप्रिय मालिकेत काम करणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे काल (३ ऑक्टोबर) रात्री दुःखद निधन झाले. गेले वर्षभर ते कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. एप्रिल महिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, तेव्हा पासून ते अंथरुणाला खिळून होते. मात्र मध्ये मालिकेत मोजक्या भागात त्यांची झलक पाहायला मिळाली होती. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.

सोमवारी सकाळी कांदिवली ईस्ट भागात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तारक मेहता मालिकेतील सर्व सहकलाकार उपस्थित होते. यावेळी नट्टु काकांच्या लाडक्या शेठजींची भूमिका करणारे जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांना मात्र अश्रू अनावर झाले होते, अत्यंत जड अंतःकरणाने त्यांनी घनश्याम नायक यांना अखेरचा निरोप दिला.

दरम्यान घनश्याम नायक यांनी आजपर्यंत ३०० पेक्षा जास्त टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. परंतु तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेतील नट्टु काका या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. मालिकेत ते जेठालालच्या दुकानात कामाला होते. ‘शेठजी मेरी पगार बढाओ’ म्हणत सतत बंडखोरी करणारे, इंग्रजी भाषेचा अतिरेक करणारे नट्टु काका प्रेक्षकाच्या प्रचंड आवडीचे होते. त्यांच्या अशा जाण्याने संपूर्ण सिने जगतात शोककळा पसरली आहे. सर्वांच्या लाडक्या नट्टु काकांची अशी अचानक झालेली एक्झिट त्यांच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. त्यांच्याबद्दल ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही ओळ नक्कीच सार्थ ठरते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा