मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट येतात आणि जातात पण काही चित्रपट असे असतात जे आयुष्यभरासाठी मनात घर करून जातात यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘मी सिंधुताई सपकाळ’ एका आदर्श समाज सेविकेवर हा चित्रपट आला होता. त्यांची जीवनकथा या चित्रपटातून दाखवली होती. चित्रपटात हे पात्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने निभावले आहे. अशातच या अनाथांच्या माईची म्हणजेच सिंधुताई सपकाळ यांची मंगळवारी (४ जानेवारी) रोजी प्राणज्योत मावळली आहे. त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अशातच त्यांच्या जीवनावर आधारित असेल्या चित्रपटात त्यांची भूमिका निभवणाऱ्या तेजस्विनीने त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करून एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
तेजस्विनीने इंस्टाग्रामवर सिंधुताई यांचे आणि चित्रपटात भूमिका साकारलेले तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस ?पोस्ट नाही केलं ? पटकन पारखतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला ? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो ?माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या फोनवरुन बातमीची खात्री झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता. प्रतिक्रियेसाठी काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले, कारण ती वेळ खरंच नाजूक होती.” (tejaswini pandit share emotional post on sindhutai sapkal death)
तिने पुढे लिहिले की, “माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही, पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि यात त्यांचा हातभार आहे याच त्यांना भानही नसतं. चित्रपटानंतर काहीवेळा त्यांना भेटण्याचा योग आला. कधीच कुणाला नावाने हाक न मारता ‘बाळा’ म्हणणार्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस ! अभिनेत्री म्हणून” एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले.
तिने लिहिले की, “अभिमान वाटतो की, ज्या कलाक्षेत्रात मी काम करते, त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारीचा का असेना पण मला वाटा उचलता आला आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीनवर जगू शकले. त्यातून बरेच काही शिकू शकले याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच ! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई. महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला. ! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील.”
अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “लोकहो एक विनंती. घाई घाईने RIP लिहिण्याच्या या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे. त्यांना वेळ द्या. तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही, पण ईश्वरचरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदनच्या कुटुंबाला या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो.ओम शांती. माई. – तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई.”
तेजस्विनीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. अनेकजण या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक कलाकार देखील या पोस्टवर कमेंट करत आहेत. या पोस्टवर स्पृहा जोशी, अमृता खानविलकर, कुशल बद्रिके, सोनाली खरे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा :
लांबचा पल्ला पार करून चाहत्यांनी गाठले कार्तिक आर्यनचे घर, व्हिडिओ शेअर करत अभिनेता म्हणाला…
नशेत धुंद आर्यन खानने विमानतळावरच केली लघूशंका? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओतील सत्य
मायरा वैकुळने ‘केळेवाली’ गाण्यावर केला असा डान्स की, सोनाली कुलकर्णीने देखील केली भन्नाट कमेंट