Saturday, July 26, 2025
Home बॉलीवूड आधी मालिकेत अन् मग पिच्चरमध्ये स्टार झालेले कलाकार, ‘या’ दिग्गजांचा आहे समावेश

आधी मालिकेत अन् मग पिच्चरमध्ये स्टार झालेले कलाकार, ‘या’ दिग्गजांचा आहे समावेश

घराघरात रोज काय पाहिलं जात असेल तर दैनंदिन मालिका. घरातील सर्वच नाही, पण कोणी ना कोणीतरी आपल्या आवडीच्या मालिका दररोज पाहत असतंच बरोबर ना. हा अनुभव तुम्ही रोजच घेत असाल, अगदी कधी कधी त्या मालिकांना नावंही ठेवत असाल, तर कधी कधी अगदी आवडीने पाहातही असाल. अशाच मालिकांमधून अनेक ऍक्टर्स त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात, अभिनयाचा अनुभव घेत असतात आणि मग चित्रपटांत, वेबसिरिजमध्ये कामं मिळवण्याचाही प्रयत्न करतात. याला महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपट, वेबसिरिज यातून मिळणारी प्रसिद्धी मोठी असते आणि एका ठराविक काळात अधिक पैसे आणि मोठं यश मिळते. त्यामुळे मालिकांबरोबरच चित्रपटांत आणि वेबसिरिजमध्ये अनेकजण काम करताना दिसतात. काही कलाकार असेही आहेत, ज्यांनी अभिनय करियरच्या सुरुवातीला मालिकांमध्ये कामं केली आणि नंतर मोठ्या पडद्यावर झळकत स्टार झाले.  आशाच कलाकारांबद्दल जाणून घेऊया…

मंडळी २०१० च्या दशकातील मालिका आठवत असेल, तर कसम से ही मालिकाही लक्षात असेलच, तीन बहिणींची कथा सांगणाऱ्या या मालिकेने एका अभिनेत्रीला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. ती अभिनेत्री म्हणजे प्राची देसाई. बानी हे पात्र तिने घराघरात पोहचवलं होतं. तिने कसोटी जिंदगी की या मालिकेतही छोटी भूमिका केलेली. तसेच २००७ मध्ये ती झलक दिखला जा या शोमध्येही दिसली होती. यामुळे तिला चांगली ओळख मिळाली आणि तिने सिनेसृष्टीतही पाऊल टाकले. रॉक ऑन हा तिचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये कामं केली.

केवळ प्राचीच नाही, तर अनेक मोठे कलाकारही या यादीत आहे बरं का. बॉलिवूड किंग शाहरुख खानही अशा कलाकारांमध्ये येतो ज्यांनी मालिकांमधून अभिनय करियरला सुरुवात केली होती. त्याने ८० च्या दशकात अनेक मालिकांमध्ये कामं केली. यात फौजी, दिल दरिया, सर्कस अशा मालिकांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. पण हा अनुभव मिळाल्यानंतर शाहरुखने चित्रपटांसाठी आपले नशीब आजमवायला सुरुवात केली आणि त्याच्या मेहनतीने त्याला साथ दिली. त्याने दिवाना या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले, त्याला या चित्रपटातील कामासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर मात्र शाहरुखने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

बॉलिवूडमध्ये एखाद्या अभिनेत्रीचे सौंदर्य केवळ नाजून बांध्यात नसतं तर अभिनयातही दिसायला हवं, हे आपल्या कामातून दाखवणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. परिणीता या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवणारी विद्या बालननेही मालिकांमध्ये काम केलं आहे. तिची सर्वाधिक गाजलेली मालिका म्हणजे हम पांच. त्यात तिने राधिकाची भूमिका केली होती. पण त्यानंतर तिने चित्रपटांत काम करण्यासाठी प्रयत्न केले आणि तिला यशही मिळाले.

इरफान खान हे नाव घेतल्यावर अनेक क्लासिक चित्रपट पटकन डोळ्यांसमोर येतात. त्याने जवळपास ३ दशके अभिनय क्षेत्रात घालवली. इतकंच नाही त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. त्याने सलाम बॉम्बे या चित्रपटातून पदार्पण केले होते. पण त्याआधी त्याने टीव्हीवरील अनेक मालिकांमध्येही कामं केली. यात चाणाक्य, भारत एक खोज, सारा जहां हमारा, चंद्रकांता, बनेगी अपनी बात, अनूगुंज अशा काही मालिकांचा समावेश आहे.

पवित्र रिश्ता या सिरियलने बॉलिवूडला मोठा स्टार दिला. तो स्टार म्हणजे सुशांत सिंग राजपूत. त्याने पवित्र रिश्ता मालिकेत मानवचे पात्र साकारले होते. यातून तो घराघरात पोहचलेला. त्यातूनच त्याला मोठी ओळखही मिळाली. या मालिकेपूर्वी त्याने किस देश मै है मेरा दिल या मालिकेतही काम केले होते. तसेच तो काही रिऍलिटी शोमध्येही दिसला होता. त्याच्या या कामाचा अनुभव त्याला कामी आला आणि त्याने काय पो छे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढेही त्याने अनेक हिट चित्रपट दिले. त्याचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी. पण हा गुणी अभिनेता अकालीच सर्वांना सोडून निघून गेला २०२० मध्ये त्याचे निधन झाले.

शरद केळकर हे नाव गेल्या काही महिन्यांत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणा असं सांगणारा त्याचा एक व्हिडिओही बराच व्हायरल झालेला. तसेच त्याने बाहुबलीच्या हिंदी व्हर्जनमध्ये प्रभासला आवाज दिला होता. त्यामुळेही त्याची बरीच चर्चा झालेली. शरद केळकर हा मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील जानेमाने नाव आहे. पण त्यानेही करियरची सुरुवातीची वर्षे मालिकांमध्ये कामं केली. त्याने आक्रोश, सात फेरे: सलोनी का सफर, बैरी पिया आशा मालिकांमध्ये कामं केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा