Saturday, June 29, 2024

अरे व्वा! तब्बल १२ वर्षांनंतर ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री करणार रजनीकांत यांच्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स?

हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारे सुपरस्टार रजनीकांत यांच्या अभिनयाचे चाहते जगभरात आहेत. त्यांच्या सिनेमाची घोषणा जरी झाली, तरी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. अशातच मागील काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्यासोबत आगामी सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमाचे शीर्षक हे अद्याप तरी ‘थलायवर १६९’ असे आहे. १० फेब्रुवारी रोजी निर्मात्यांनी एक व्हिडिओ प्रदर्शित करत या प्रोजेक्टची माहिती दिली होती. या व्हिडिओत रजनीकांत आणि नेल्सन दिलीप कुमारसोबतच म्युझिक कंपोजर अनिरुद्ध रवीचंदरही दिसले. अनिरुद्ध रवीचंदर सिनेमाचे गाणे कंपोज करत आहेत.

निर्मात्यांनी रजनीकांत (Rajinikanth) यांच्या या सिनेमाच्या इतर कास्टबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र, ताज्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्यासोबत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) दिसणार आहे. असे म्हणले जात आहे की, निर्माते ऐश्वर्याला सिनेमात घेण्यासाठी उत्सुक आहेत. तरीही, अंतिम निर्णय हा अभिनेत्रीचाच असेल आणि ती जर सहमत असेल, तर सिनेमात रजनीकांत आणि तिची जोडी पुन्हा एकदा झळकेल.

रजनीकांत आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी २०१० साली आलेल्या ‘रोबोट’ या सिनेमात एकत्र काम केले होते. प्रेक्षकांना हा सिनेमा खूपच आवडला होता. जर रजनीकांत आणि ऐश्वर्या दोघेही ‘थलायवर १६९’ सिनेमात दिसले, तर ते १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतील.

रजनीकांत शेवटचे ‘अन्नाथे’ या सिनेमात झळकले होते. हा सिनेमा २०२१मध्ये दिवाळीदरम्यान प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेत्री नयनतारा आणि कीर्ती सुरेश यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. ‘अन्नाथे’ या सिनेमाने एकूण २०० हून अधिक कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘अन्नाथे’ हा सिनेमा सन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनला होता. विशेष म्हणजे सन पिक्चर्स देखील ‘थलायवर १६९’ हा सिनेमा बनवत आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा