Wednesday, July 3, 2024

आई- वडिलांच्या विरोधात कोर्टात पोहचला थलापथी विजय; पालकांसह ११ जणांविरोधात दाखल केली तक्रार

सिनेसृष्टीमध्ये वाद-विवाद सामान्य मानले जातात. महत्त्वाचे म्हणजे, सामान्य लोकांप्रमाणे कलाकारही आपल्या कुटूंबीयांसोबत असलेल्या वादामुळे चर्चेत येत असतात. याच दरम्यान दक्षिणी सुपरस्टार विजय थलापथी चांगलाच चर्चेत आला आहे. थलापथी विजय अनेकदा त्याच्या चित्रपट आणि अभिनयाबद्दल चर्चेत असतो. पण, यावेळी तो त्याच्या चित्रपटामुळे नव्हे, तर त्याच्या कौटुंबिक मतभेदांमुळे चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या पालकांसह एकुण ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यासाठी अभिनेत्याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

का केला आई-वडिलांवर गुन्हा दाखल?
माध्यमातील वृत्तानुसार, विजयने ११ लोकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विजयचे वडील आणि दिग्दर्शक एस के चंद्रशेखर यांनी काही काळापूर्वी एक राजकीय पक्ष सुरू केला होता, ज्याचे नाव ‘ऑल इंडिया थलापथी विजय मक्कल इयक्ककम’ आहे. असे सांगितले जात आहे की, निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अभिनेत्याच्या वडिलांचे नाव निवडणूक पक्षात सरचिटणीस म्हणून नोंदवले गेले आहे. तर त्याची आई शोभा चंद्रशेखर याची कोषाध्यक्ष आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुनावणी २७ सप्टेंबरला होईल. (thalapathy vijay files case against his parents know the reason)

‘माझा पक्षाशी कोणताही संबंध नाही’
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विजयने ‘पक्षाशी माझा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कसलाच संबंध नाही’ असे विधान केले होते. यासोबतच त्याने आपल्या चाहत्यांना आवाहनही केले होते की, त्यांनी फक्त त्याच्या नावासाठी या पार्टीत सामील होऊ नये. जर कोणी त्याचे नाव, फोटो किंवा फॅन क्लब वापरत असेल, तर तो त्याच्याविरुद्ध आवश्यक पाऊल उचलेल. यानंतर, आता असे म्हटले जात आहे की, अभिनेत्याने त्याच्या पालकांसह ११ लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

थलापथी विजयबद्दल बोलायचे झाले, तर तो मोठ्या कलाकारांपैकी एक आहे. चाहते त्याला त्याच्या चित्रपटांमधील वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखतात. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्याची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अभिनेत्याने १९९२ मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याचा पहिला चित्रपट ‘नालया थिरपू’ होता. या चित्रपटावेळी तो फक्त १८ वर्षांचा होता. यानंतर त्याने सिनेमा जगताला एकापेक्षा एक चित्रपट दिले.

 

 

हे देखील वाचा