Saturday, June 29, 2024

‘पोरगं मजेतय’चे शूटिंग संपले, लॉकडाऊनमधील पहिला चित्रपट पूर्ण

लॉकडाऊनमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने आणि शशांक शेंडे यांचे बहुरूपी प्रोडक्शन तसेच विजय शिंदे यांचे नाईंटीनाईन प्रोडक्शन यांच्या ‘पोरगं मजेतय’ या नवीन चित्रपटाची घोषणा झाली. त्यानंतर आता लॉकडाऊनमध्येच या चित्रपटाची शूटींगसुद्धा पूर्ण झाले आहे.

लॉकडाऊनमध्ये शूट पूर्ण करणारा ‘पोरगं मजेतय’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक मकरंद माने यांनी याआधी यंग्राड, रिंगण आणि कागर या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

शूटिंग पूर्ण झाल्याबद्दल माहिती देताना चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे यांनी एक चित्रपट निर्माता या दृष्टीने सांगितले, “चित्रपट करताना मुळातच शेकडो अडचणींवर मात करावी लागते. त्यातच कोरोनाच्या संकटाने सबंध जगाचीच गती बिघडवून टाकल्यावर निर्माता म्हणून माझ्यासमोर सोपा पर्याय होता की शुटींग पुढे ढकलायचं. पण मी विचार केला की, कलाकारांना व तंत्रज्ञांना आत्ता या क्षणी सगळ्यात जास्त गरज आहे ती पैशांची नव्हे, तर स्वाभिमानाच्या रोजीरोटीची.”

“आपलं घर चालतंय या मानसिक समाधानाची. हे एकदा मनाशी पक्कं ठरल्यावर मी व माझ्या टीमने कंबर कसली आणि शासनाने सांगितलेल्या एकूण एक सुरक्षेच्या उपायांवर टिकमार्क करत आम्ही कामाला भिडलो,” असे पुढे बोलताना शिंदे म्हणाले.

“आपलं लोकेशन, आसपासचा परिसर यांच्या स्वच्छतेवर भर दिला, कलाकार व तंत्रज्ञांच्या सुरक्षेला अतोनात महत्त्व दिलं. त्यासाठी आम्ही खूप साऱ्या अभिनव उपायांचाही अवलंब केला. खूप ठिकाणी स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात आलं. मजा तर सगळेच चित्रपट करताना येते, पण ‘पोरगं मजेतंय’ करताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आगळं वेगळंच समाधान झळकत होतं. या चित्रपटाने शिकवलं की, हिंमत असेल तर अडचणींवर मात करून खूप काही साधता येतं. ‘पोरगं मजेतंय’ने अनुभवातून शिकवलेला धडा आयुष्यभर बळ देत राहिल,” असे शूटिंगबद्दल बोलताना शिंदे म्हणाले.

चित्रपटाच्या शूटिंग प्रक्रियेबद्दल दिग्दर्शक मकरंद माने यांना विचारले असता त्यांनी सांगितले, “कोरोना काळात शूटिंग करणं खूप धोक्याचं आहे, हे अगदीच मान्य आहे. पण जर का आपण सर्वांनी मिळून स्वतः ची तसेच आजूबाजूला असणाऱ्या सर्व व्यक्तींची योग्य ती काळजी घेतली, तर कोणाला कसलाही त्रास न होता आपण वेळेत सर्व कामे करू शकतो. हा आत्मविश्वास ‘पोरगं मजेतय’ च्या शूटिंगदरम्यान निश्चितच आम्हाला मिळाला.”

“यादरम्यान सर्व टीमची काळजी तर घ्यायची होतीच शिवाय ज्या गावात शूटिंग करतोय ते गाव, आजूबाजूचा परिसर सुरक्षित राहिला पाहिजे हे जास्त महत्वाचं होत आणि कोणाला कसलाही आजार न होता आम्ही संपूर्ण शूटिंग अगदी नियमपूर्वक पार पाडले,” असेही त्यांनी पुढे बोलताना म्हटले.

हे देखील वाचा