प्रभास सध्या त्याच्या बहुचर्चित चित्रपट ‘द राजा साब’मुळे सातत्याने चर्चेत आहे. 9 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली होती. पहिल्याच दिवशी चित्रपटाने जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले. मात्र ही घोडदौड फार काळ टिकू शकली नाही. दुसऱ्याच दिवसापासून चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळाली आणि आता आठव्या दिवसाचे आकडे समोर आल्यानंतर ‘द राजा साब’ची अवस्था बॉक्स ऑफिसवर बिकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘द राजा साब’ने पहिल्या आठवड्यात भारतात सुमारे 130 कोटींची कमाई केली असून वर्ल्डवाइड कलेक्शन 180 कोटींच्या आसपास आहे. आठव्या दिवशी मात्र चित्रपटाने केवळ 3.50 कोटी रुपये कमावले. यामुळे भारतातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 133.99 कोटींवर पोहोचले आहे. 200 कोटींच्या टप्प्यापासून चित्रपट अजूनही बऱ्याच अंतरावर आहे.
चित्रपटाने पहिल्या दिवशी 53.75 कोटींची दमदार कमाई केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी हा आकडा थेट 26 कोटींवर घसरला. तिसऱ्या दिवशी 19.1 कोटी, चौथ्या दिवशी 6.6 कोटी, पाचव्या दिवशी 4.8 कोटी, सहाव्या दिवशी 5.35 कोटी आणि सातव्या दिवशी 5.5 कोटी इतकी कमाई झाली. आठव्या दिवशी पुन्हा मोठी घसरण होत केवळ 3.50 कोटींवर चित्रपटाची कमाई स्थिरावली.
आता सर्वांचे लक्ष चित्रपटाच्या दुसऱ्या शनिवार-रविवारच्या कमाईकडे लागले आहे. प्रभासच्या याआधीच्या ‘आदिपुरुष’ आणि ‘साहो’ या चित्रपटांनाही बॉक्स ऑफिसवर अपयश आले होते, मात्र त्यांची कमाई ‘द राजा साब’पेक्षा चांगली होती. मारुती दिग्दर्शित या हॉरर-कॉमेडी चित्रपटात प्रभाससोबत (Prabhas)संजय दत्त, मालविका मोहनन, निधी अग्रवाल, बोमन इराणी, रिद्धी कुमार आणि झरीन वहाब यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता वीकेंडवर चित्रपटाला दिलासा मिळतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










