Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘घर बंदूक बिरयानी’चा धमाकेदार ट्रेलर आला समाेर, नागराज मंजुळे यांना नवीन अवतारात पाहून व्हाल थक्क

सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित ‘घर बंदूक बिरयानी‘. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने नेहमीच मराठी सिनेसृष्टीला हटके चित्रपट दिले आहेत. एका सर्वसाधारण विषयाला अनन्यसाधारण बनवणे, ही यांची खासियत आहे. हीच खासियत जपत आता लवकरच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आणि ही उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील याच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘आशेच्या भांगेची नशा भारी’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसत आहे. यात एका तरुणाचाही सहभाग दिसत आहे. आता यांच्यात नक्की कशावरून ही चकमक सुरु आहे आणि घर, बंदूक आणि बिरयानीचा याच्याशी नेमका काय संबंध, याचे उत्तर प्रेक्षकांना 7 एप्रिल रोजी मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे. आकाशची रोमँटिक इमेजही तरुणांना भावणारी आहे. ट्रेलरमधील लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे पार्श्वसंगीत आणि अभूतपूर्व ॲक्शन. ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचे कळत असले तरी यात कौटुंबिक कथाही दडली आहे. यात प्रेमकहाणीही बहरत आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील गाणी. ही गाणी भन्नाट लोकप्रिय होतात. या चित्रपटातील तीन गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली असून या गाण्यांनीही अल्पावधीतच धुमाकूळ घातला आहे.लाखोंच्या वर व्ह्यूज मिळालेल्या या गाण्यांना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास यश मिळाले आहे. वैभव देशमुख यांचे बोल लाभलेल्या या गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

चित्रपटाबद्दल निर्माते नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात, ”अतिशय भव्य स्वरूपात हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दिसताना खूप ओळखीचा विषय दिसत असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. मी पडद्यामागे आणि पडद्यावरही काम केले आहे. अनेकांना प्रश्न होता की या चित्रपटाचे नाव असे काय? तर या चित्रपटाचे नाव अतिशय समर्पक असून ते चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळेल. यात काही मुरलेले कलाकार आहेत काही नवोदित आहेत मात्र सगळ्याच कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.”

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ” नागराज मंजुळे यांची कलाकृती ही नेहमीच अनोखी असते. पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत. बिर्याणीमध्ये जसे विविध जिन्नस असतात, ज्यांची काही खासियत असते, जी बिरयानीला अधिकच स्वादिष्ट बनवते . तशीच ही बिरयानी आहे. प्रत्येक कलाकाराचे वैशिष्टय आहे. नागराज मंजुळे यांनी प्रत्येक कलाकार तशाच पद्धतीने निवडला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून हे प्रतिभावान कलाकार एकत्र आणले आहेत. त्यामुळेच आमची ही जबाबदारी आहे की, हा चित्रपट महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचावा, जेणे करून हे टॅलेंन्टही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. हा चित्रपट प्रेक्षकांचे परिपूर्ण मनोरंजन करण्यात यशस्वी होईल आणि बॉक्स ऑफिसवर आपले अव्वल स्थान प्राप्त करेल, याची खात्री आहे.” असे त्यांचे म्हणणे आहे.(The trailer of ‘Ghar Banduk Biryani’ caught fire, Nagraj Manjule was thrilled to see his new avatar)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘असं’ जुळलं विनोदी अभिनेता राजपाल यादवचं राधाशी नातं, पहिल्या भेटीचा किस्सा केला शेअर

‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

हे देखील वाचा