Saturday, July 6, 2024

स्वामी समर्थ मालिकेत नवीन पर्वाचा आरंभ; होणार स्वामींच्या मानसपुत्राची एन्ट्री, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

सध्या मराठी टेलिव्हिजनविश्वात अनेक अध्यात्मिक मालिका सुरु आहे. त्यातच सर्वात जास्त गाजणारी मालिका म्हणजे ‘जय जय स्वामी समर्थ’. या मालिकेने मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षकांवर आपले मोठे गारुड घातले आहे. मालिकेतून उलगडणारा स्वामींचा प्रवास सगळ्याच प्रेक्षकांना आवडत असल्याने दिवसेंदिवस या मालिकेच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडत आहे. आजवर आपण स्वामींचे अनेक चमत्कार, अनेक अध्याय या मालिकेतून पाहिले. काही माहित होते, तर काही नाही. आता लवकरच मालिकेत एक नवीन अध्याय सुरु होत आहे. यात स्वामींच्या मुलाची एन्ट्री होणार आहे. स्वामीसुत अर्थात स्वामींचा मानसपुत्र लवकरच मालिकेत दिसणार आहे.

आता ही नवीन भूमिका कोण साकारणार असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. ही नवीन भूमिका साकारणार आहे टीव्ही इंडस्ट्रीमधील ओळखीचा चेहरा आणि बिग बॉसमध्ये दिसलेला अभिनेता विकास पाटील. लवकरच विकास या नवीन आणि हटके भूमिकेत मालिकेत दिसेल. विकास प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. बिग बॉसमुळे त्याच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडणार आहे. आता या भूमिकेमुळे तर त्याला अजून एक वेगळी ओळख मिळणार आहे.

या भूमिकेबद्दल विकासने त्याचे मनोगत व्यक्त केले. तो म्हणाला, “ही खूप महत्वाची भूमिका आहे. कारण स्वामींनी त्यांना त्यांचा मानसपुत्र मानले होते. तुम्हाला मालिका पाहताना लक्षात येईलच त्यांचा स्वामींवर विश्वास नव्हता. मात्र नंतर हळूहळू स्वामींनी त्यांना आपल्या जवळ केले आणि त्यांचे आयुष्य बदलून टाकले. मी या भूमिकेसाठी खुपच उत्सुक आहे. मी स्वतः एक स्वामी भक्त असून मला ही महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. स्वामींचा आशीर्वाद आहेच म्हणून हे घडून आले. स्वामींनीच माझी निवड केली असल्याने मी खूपच खुश आहे.”

पुढे विकास म्हणाला, “खूप आव्हानात्मक आहे आधीचे हरिभाऊ आणि त्यानंतर स्वामीसुत… खूप साऱ्या गोष्टींचा विचार मी केला काळ वेगळा आहे त्यामुळे भाषेचा लहेजा, पोशाख असेल… खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर, प्रेक्षक यावेळेस देखील भरभरून प्रेम करतील अशी मला आशा आहे .”

आता मालिकेमध्ये सुरु होणारे हे नवीन पर्व पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक कमालीचे उत्सुक असून, विकासाला या नवीन भूमिकेत पाहण्याची संधी त्याच्या फॅन्सला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दिल तुम्हारा हो गया” या ‘अनलॉक जिंदगी’मधील गाण्यातून व्यक्त होणार मनातील ‘त्या’ हळुवार भावना
मराठमोळ्या तोऱ्यात रिंकू राजगुरूने चालवली गाडी, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा