Thursday, February 6, 2025
Home मराठी ‘या’ अभिनेत्रीने आईसाठी लिहिली भावुक पोस्ट म्हणाली, “वडिलांच्या निधनानंतर सहज शब्दात समजावला ‘मृत्यू'”

‘या’ अभिनेत्रीने आईसाठी लिहिली भावुक पोस्ट म्हणाली, “वडिलांच्या निधनानंतर सहज शब्दात समजावला ‘मृत्यू'”

संपूर्ण जगभरात नुकताच मदर्स डे साजरा करण्यात आला. आपल्या आईप्रती असणाऱ्या भावना मदर्स डेला व्यक्त करत, आपल्या मनातील कृतज्ञता तिच्यासमोर व्यक्त करण्याचा दिवस. त्या दिवशी आमपासून खासपर्यंत सर्वानीच मोठ्या आनंदाने आपल्या आईसोबतचे फोटो, आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावनां वाट मोकळी करून दिली. देव सगळीकडे एकाच वेळी राहू शकत नाही म्हणून त्याने आई बनवली असे नेहमीच म्हटले जाते. हे नक्कीच खरे आहे हे आईला पाहून समजते. आपल्या लेकरासाठी ती कोणत्याही देवापेक्षा नक्कीच कमी नसते.

मनोरंजन विश्वात आज आपल्याला अनेक माय लेकीच्या जोड्या पाहायला मिळतात. यातलीच एक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री शुभांगी गोखले आणि सखी गोखले यांची. आपल्या वडिलांच्या निधनानंतर आईने सखीला कसे वाढवले, तिची आई तिच्यासाठी काय आणि किती महत्वाची आहे, या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल सखीने भरभरून लिहिले, आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

सखीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “झी’च्या टीमने जेव्हा माझ्याकडे त्यांनी बनविलेला हा सुंदर चित्रपट पाठविला, तेव्हा लहानपणापासून माझ्या अम्माने मला सांगितलेल्या अनेक गोष्टींनी माझ्या मनात गर्दी केली. माझी आई उत्कृष्ट कथाकार आणि नकलाकार आहे. ती तुम्हाला तासन् तास खुर्चीवर खिळवून ठेऊ शकते. तिच्या गोष्टी कधी संपतच नाहीत. त्या ऐकताना हसून हसून तुमच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागते.

माझ्या या मताशी सहमत होणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत. पण या सर्वांतून माझ्या मनात एक अनुभव अगदी ताजा राहिला आहे. तो म्हणजे जेव्हा तिने मला प्रथमच मृत्यू या संकल्पनेची ओळख करून दिली. ही गोष्ट कदाचित इतरांच्या मनात भयानक भावना निर्माण करू शकते. पण लहानपणी आपण प्रथम केव्हा मृत्यू या संकल्पनेबद्दल ऐकलं, हे आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल. मृत्यूच्या संकल्पनेबरोबरच आपल्या मनात भीती या संकल्पनेचाही जन्म होत असतो. माझे बाबा मला सोडून गेले, तो काळ मला स्पष्टपणे आठवतो. एक लहान मूल म्हणून त्यांचा मृत्यू हा मला गोंधळात टाकणारा होता.

त्यावेळी त्यांच्या मृत्यूची बातमी सहा वर्षांच्या एका मुलीला सांगताना अम्मा म्हणाली, “आपल्यात वावरणारी काही माणसं ही परमेश्वराची मुलं असतात. ती खास आणि सुंदर असतात. त्यांना आपल्यासाठी एक भेट म्हणून देवाने पाठविलेलं असतं. पण देवालाच जेव्हा एकाकी वाटतं, तेव्हा तो या मुलांना आपल्याकडे बोलावून घेतो. कारण त्याला त्या मुलांचा सहवास हवा असतो. त्यामुळे अशा सुंदर मुलांचा जो काही थोडाफार सहवास आपल्याला लाभला, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानायला हवेत. आपण त्यांचं स्मरण करून त्यांचा सहवास साजरा केला पाहिजे.”

आता जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा तिने मला मृत्यूबद्दल किती सहजतेने समजावलं, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतं. मला नेमकं काय ऐकायचं आहे, हे तिला कसं समजलं? तिने सांगितलेली ती केवळ एक कथा नव्हती, तर ती माझ्या मनाची घडण करत होती. ही घडण कशी झाली, त्याचा मी आजही शोध घेत असते. आई ही एक जादुगार असते. मला असं जीवन दिल्याबद्दल आणि त्यात तुझी जादू जोडल्याबद्दल मी तुझे आभार मानते, अम्मा! आय लव्ह यू. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”.

या सुंदर पोस्टसोबत सखीने तिचा आणि आईचा एक सुरेख फोटो देखील पोस्ट केला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्या दोघींचे आणि त्यांच्या नात्याचे, कौतुक केले आहे. दरम्यान सखी देखील उत्तम अभिनेत्री असून, सध्या ती परदेशात शिक्षण घेत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! लोकप्रिय गायिकेची आत्महत्या, हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

बॉलिवूडनंतर ‘हा’ मराठमोळा अभिनेता साऊथ इंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज! पोस्टमधून दिली पहिल्या दाक्षिणात्य सिनेमाची माहिती

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा