दुःखद: टिकटॉक स्टार समीर गायकवाडने गळफास घेत केली आत्महत्या


सध्या आत्महत्या हा शब्द इतका सोपा आणि सतत ऐकून ऐकून खूपच परिचयाचा झाला आहे. रोज अनेक आत्महत्येच्या बातम्या कानी येतात. कलाकारांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांसाठीच हा खूपच सोपा पर्याय आहे की काय असे वाटायला लागले आहे. नवीन वर्षाच्या या दोन महिन्यांमध्ये अनेक कलाकारांनी हा पर्याय निवडत स्वतःचे आयुष्य संपवले. काहीच दिवसांपूर्वी एका परदेशी टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याची बातमी आली होती. आता पुन्हा अशाच एका लोकप्रिय स्टारने आत्महत्या केली आहे.

मराठी नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणारा आणि इंस्टाग्रामवर हजारो फॉलोवर्स असणाऱ्या समीर गायकवाड या २२ वर्षीय टिकटॉक स्टारने रविवारी पुण्यातील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवर समीर हा एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा होता. मागच्या काही दिवसांमध्ये तो इन्स्टाग्रामवर खूपच लोकप्रिय झाला होता. त्याने व्हिडीओंच्या माध्यमातून सर्वांनाच हटके स्टाइलमध्ये अतिशय चांगले संदेश देण्याच्या वेगळेपणामुळे त्याने कमी वेळात जास्त लोकप्रियता मिळवली.

समीरच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चाह्त्यांना खुप मोठा धक्का बसला आहे. समीरचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र दुर्दैवाने उपाचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. समीर गायकवाडने घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेत ही आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाइट नोट सापडलेली नाही.

समीरच्या आत्महत्येचे नेमके कारण जरी कळू शकलेले नसले तरी, प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, समीरने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

समीर गायकवाड हा पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता. म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ तयार करणारा समीर हा ब्लॉगर म्हणून तरुणांमध्ये तुफान प्रसिद्ध होता. तसेच एक टिकटॉक स्टार म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय होता. मात्र समीरने उचललेल्या पाऊलामुळे त्याच्या कुटुंबियांसोबतच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी समीरने इन्स्टाग्रामवर टायचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हाच व्हिडिओ त्याचा शेवटचा व्हिडिओ ठरला.

 

हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. समीरच्या मृत्यूनंतर त्याच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.