Thursday, January 22, 2026
Home बॉलीवूड प्रभावी अभिनेत्री असणाऱ्या टिस्का चोप्राने अनेक शॉर्ट फिल्म्सचे लिखाण करत स्वतःला सिद्ध केले उत्तम लेखिका

प्रभावी अभिनेत्री असणाऱ्या टिस्का चोप्राने अनेक शॉर्ट फिल्म्सचे लिखाण करत स्वतःला सिद्ध केले उत्तम लेखिका

बॉलिवूडमध्ये असे कलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटांमध्ये कमी काम केले मात्र ते कायम लक्षात राहील असे केले. याशिवाय शॉर्ट फिल्मसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनय केलेले कलाकार देखील बॉलिवूडच्या अनेक कमर्शियल चित्रपटांमध्ये दिसतात. याशिवाय असे काही कलाकार आहेत, जे मोजक्याच मात्र दर्जेदार चित्रपट करायला जास्त प्राधान्य देतात. असे कलाकार खूपच कमी कमर्शियल सिनेमे करतात किंवा करतही नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे टिस्का चोप्रा. टिस्काने भरमसाठ सिनेमे करण्यापेक्षा आशयसंपन्न चित्रपटांना अधिक महत्व दिले. टिस्का या मनोरंजन क्षेत्रातील एक प्रभावी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज टिस्का तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी.

टिस्काचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी हिमाचल प्रदेशमधील कसौली मध्ये झाला. तिने नोएडामधून तिचे शिक्षण पूर्ण करत इंग्लिश विषयात पदवी संपादन केली. कॉलेजमध्ये असल्यापासून तिने अभिनय करायला सुरूवात केली. तिला अभिनयात रस निर्माण झाला आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने मुंबई गाठली. येथे ती नसरुद्दीन शाह आणि फिरोज अब्बास खान यांच्या नाट्यग्रुप मध्ये जाऊ लागली. इथूनच तिचा खरा अभिनय प्रवास सुरू झाला.

पुढे टिस्काला आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. आजही तिच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून हा सिनेमा ओळखला जातो. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला फिल्मफेयरचा पुरस्कार देखील मिळाला. याशिवाय तिच्या ‘किस्सा’ नावाच्या फिचर सिनेमाला २०१३ साली टोरांटो फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवले गेले होते.

यासोबतच टिस्का ‘लव्ह ब्रेकअप्स जिंदगी’, ‘रहस्य’, ‘प्लँटफॉर्म’, ‘लोकनायक’, ‘फिराक’, ‘दिल तो बच्चा हैं जी’, ‘अंकुर अरोरा मर्डर केस’ आदी अनेक चित्रपटांमध्ये दिसली. हिंदीसोबतच ती तामिळ, तेलगू, मल्याळम, पंजाबी, मराठी, इंग्लिश आदी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुख्य म्हणजे टिस्काने टेलिव्हिजन क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी करत अनेक मालिकांमध्ये काम केले तर काही शोचे सूत्रसंचालन केले. यात ‘अस्तित्व एक प्रेम कहाणी’, ‘करिश्मा का करिश्मा’, ‘कहाणी घर घर की’, ‘२४’, ‘मरियम खान’ आदी. तर ‘होस्टेजेस १’, ‘राम युग’ या वेबसिरीजमध्ये काम केले आहे.

टिस्का एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम लेखिका आणि निर्माती देखील आहे. तिने ‘चटणी’ ही शॉर्ट फिल्म लिहिली आणि यात काम देखील केले. या शॉर्ट फिल्मसाठी तिला फिल्मफेयरचा पुरस्कार देखील मिळाला. यासोबतच ती ‘छुरी’ आणि ‘रुबरु’ या शॉर्ट फिल्म्समध्ये देखील दिसली. या दोन्ही शॉर्ट फिल्म्स तिने लिहिल्या होत्या.

टिस्का चोप्राला फिल्मफेयर, बिग स्टार एंटरटेनमेंट, पीपल्स चॉइस, आयटीए आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ दिवशी रेशीमगाठीत अडकणार राजकुमार राव अन् पत्रलेखा, जाणून घ्या लग्नाची संपूर्ण माहिती

-आलिया- रणबीर अन् कॅटरिना- विकीच्या आधी राजकुमार अन् पत्रलेखा थाटणार आपला संसार; मित्रांना पाठवले निमंत्रण?

-राजकुमारच्या आईची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण; निधनानंतर अमिताभ यांनी अभिनेत्याला पाठवला होता व्हिडिओ

हे देखील वाचा