Wednesday, July 3, 2024

गणरायाचे धूमधडाक्यात आगमन! छोट्या पडद्यावरील कलाकारांनी ‘अशा’प्रकारे केले बाप्पाचे स्वागत

गणपती बाप्पाचे अनेक कलाकारांच्या घरी आगमन झाले आहे. साल २०१९ पासून कोरोना महामारीमुळे सर्वच सणांवर निर्बंध लावले होते. त्यामुळे अनेक कलाकार त्यांच्या जीवनातील महत्वाचे आणि प्रेरणेचे स्थान असलेल्या गणरायाच्या आगमनामध्ये मौज मज्जा करू शकले नाही. परंतु यंदा ठाकरे सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे अनेक कलाकार आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि जोशात करत आहेत. बॉलिवूडमधील मोठ मोठ्या कलाकारांनी शुक्रवारी (१० सप्टेंबर) बाप्पाचे धूम धडाक्यात स्वागत केले. अशात छोट्या पडद्यावरील कलाकार देखील बाप्पाच्या सेवेत सज्ज झाले आहेत. पाहुया यातील काही कलाकारांच्या घरी विराजमान झालेले बाप्पा.

ऋत्विक धनजानी
हिंदी भाषिक मालिकांमधील अभिनेता ऋत्विक धनजानीच्या घरी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यंदा त्याने आपल्या घरी इकोफ्रेंडली बाप्पाची स्थापना केली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये तो बाल गणेशाची मूर्ती स्वतः घडवत असताना दिसत आहे. त्याने आपल्या बाप्पाला सोनेरी रंगाच्या दागिन्यांनी सजवले आहे.

तसेच त्याने पोस्ट केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो बाप्पाची आराधना करताना दिसत आहे. बाप्पाच्या आगमनाने त्याच्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न झाले आहे.

राहुल वैद्य- दिशा परमार
‘म्युझिक की पाठशाला’ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक राहुल वैद्यच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. राहुलचे नुकतेच दिशा परमार बरोबर लग्न झाले. या नवविवाहित जोडप्याचा हा पहिला गणेशोत्व असल्याने दोघेही खूप खुश आहेत. आपल्या लाडक्या गणरायाच्या सजावटीसाठी त्यांनी लाल रंगाच्या गुलाबांचा खूप वापर केला आहे. तसेच यावेळी दोघांनी सारख्या रंगाचा पोशाख परिधान करत त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विघ्नहर्ता या दोघांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. नुकतेच लग्न झाल्याने हे दोघेही खूप आनंदात आहेत. तसेच बाप्पाच्या सेवेस सज्ज झाले आहेत.

माधुरी दीक्षित
अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील गणरायाच्या सेवेमध्ये मग्न झालेली आहे. ‘डान्स दीवाने ३’च्या सेटवर गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवावर लावलेले निर्बंध लक्षात घेत इथे साध्या पद्धतीने हा सण साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये माधुरी मराठमोळा साज शृंगार करून गणपतीची पूजा करताना दिसत आहे. तसेच सेटवर कुठल्याही प्रकारची गर्दी न करता येथील सर्व कलाकार गणरायाची पूजा करत आहेत. कोरोनाचा फटका कलाकारांना देखील बसला होता. शूटिंग बंद असल्याने त्यांच्याही रोजगाराचा प्रश्न समोर होता. परंतु आता विघ्नहर्त्याने सर्वांचे म्हणणे ऐकले असून यंदा सेटवर देखील बाप्पाची स्थापना करणे शक्य झाले आहे.

कृष्णा अभिषेक- कश्मिरा शाह
‘कपिल शर्मा’ शोमधील कृष्णा अभिषेकने देखील आपली पत्नी कश्मिरासह गणरायाला घरी आणले आहे. सोशल मीडियावर कश्मिराने बाप्पाला घरी घेऊन जातानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. पांढरी शुभ्र रंगाची गणरायाची मूर्ती त्याने घेतली आहे. कृष्णा अभिषेकचे त्याचा मामा गोविंदाबरोबर अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. बुद्धीची देवता असलेल्या गणरायाकडून यंदा, तरी या दोघांना मतभेद मिटवण्याची बुद्धी सुचणार का? अशी चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे. तसे पहिले, तर दोघेही मामा भाचे बाप्पाची मनोभावे आराधना करत आहेत.

शेफाली जरीवाला
‘नच बलिये’ या शोच्या ५व्या आणि ७ व्या पर्वामध्ये आपल्या डान्सने सर्वांना वेड लावलेली शेफाली देखील पती पराग त्यागीसह बाप्पाला घरी आणताना दिसली. या व्हिडिओमध्ये बाप्पाला तिनेच घरी आणल्याचे दिसत आहे. त्यांनतर परागने गणरायाची स्थापना आपल्या घरी केली.

बाप्पाच्या आगमनाने हे दोघेही खूप खुश दिसत आहेत. देव खंडेरायाचा अवतार असलेली गणेशाची मूर्ती यंदा त्यांनी आपल्या घरी आणली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?

हे देखील वाचा