Monday, July 1, 2024

लाल महालात लावणीवर रिल्स बनवणाऱ्या वैष्णवीकडून माफीचा Video, म्हणाली ‘मी पण शिवप्रेमी आणि जिजाऊंची भक्त’

प्रसिद्ध डान्सर वैष्णवी पाटीलला (Vaishnavi Patil)  पुण्यामधील ऐतिहासिक वास्तू असलेल्या  लाल महालात केलेले रिल चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. या  लावणी डान्सवरुन आता तिच्यावर चौफेर टिका होताना दिसत आहे. या व्हायरल डान्समुळे राज्यभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात तिच्यावर फरसखाना पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणावर आता वैष्णवी पाटीलने प्रतिक्रिया दिली असून तिने व्हिडिओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. काय म्हणाली ती या व्हिडिओमध्ये चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, वैष्णवी पाटील ही एक प्रसिद्ध डान्सर म्हणून सर्वत्र लोकप्रिय आहे. आपले नवनवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच १६ एप्रिल रोजी तिने पुण्यामधील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महालामध्ये ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) चित्रपटातील गाण्यावर डान्स केला होता. ज्याचा व्हिडिओ तिच्या मित्रांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर शिवप्रेमींनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला होता. तिच्या या व्हिडिओमुळे तिच्यावर चौफेर टिका करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणावर आता वैष्णवीने माफीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये वैष्णवीने “पुण्याच्या लाल महालामध्ये गाणे करताना माझ्या मनात कोणताही वाईट विचार नव्हता.गाणे चांगले असल्याने ते मी शूट केले. यावेळी कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. हे गाणे लाल महालात शूट करणे ही माझी चूक होती. ती मी मान्य करते. याबद्दल मी सर्व शिवप्रेमींची माफी मागते. ही सगळी जनता माझ्यावर प्रेम करते. माझ्या कलेवर प्रेम करते.या सर्वांची मी माफी मागते,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा