बॉलिवूडचा हँडसम गडी वरूण धवनचा नवा सिनेमा येत्या काही दिवसात ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमाच्या प्रमोशन मध्ये सध्या तो व्यस्त आहे. अशा व्यस्त कार्यक्रमातही त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा करायचा आहे. तसा एक व्हिडिओच त्याने ट्विटरवर अपलोड केला आहे.
करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर मधून पदार्पण केलेला वरुण धवन हा फार कमी वेळेत प्रसिद्ध झाला. त्याच्या पुढील अनेक सिनेमांमुळे त्याचे लाखोंमध्ये चाहते वाढले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी नेमीच वरूण हा काही ना काही सरप्राइझेस घेऊन येतच असतो.
सध्या वरुण आणि सारा अली खानचा ‘कुली नंबर १’ हा सिनेमा अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्म वर येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा त्याचे वडील डेव्हिड धवन यांनीच दिग्दर्शित केला आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा नव्वदीच्या दशकात आलेल्या गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ चा रिमेक आहे आणि तो सुद्धा डेव्हिड धवन यांनीच दिग्दर्शित केला होता. त्यामुळे वरुण जिथे शक्य असेल तिथे सिनेमाचं प्रमोशन करत आहे.
या प्रमोशनच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून वरूण ने एक व्हिडिओ बनवून ट्विटर वर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल काहीतरी घोषणा करणार असल्याचं म्हणतोय. वरूण म्हणतो, “आयुष्यात खूप झाली आता लपवा लपवी! आणि मी हे आणखीन जास्त काळ नाही लपवू शकत…अफवा इतक्या साऱ्या असतात की आपण नेहमी त्यांचं स्पष्टीकरण नाही देऊ शकत. आणि म्हणून मी एक निर्णय घेतला आहे की आज मी सर्वांची तुमच्या वहिनीशी भेट घालून देणार आहे.”
वरूण च्या या व्हिडिओमुळे त्याचे चाहते मोठ्या संभ्रमात पडले आहेत. उद्या नक्की वरून कुणाशी भेट घालून देणार आहे. नताशा दलाल सोबत त्याच्या लग्नाची घोषणा तर करणार नाही ना…? नताशा दलाल आणि वरूण धवन गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.
पण जरा थांबा हा देखील त्याच्या आगामी ‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या प्रमोशनचाच भाग आहे. उद्या खरं तर त्याच्या नव्या सिनेमातील ‘तेरी भाभी’ हे गाणं युट्युबवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे काही वेळासाठी का होईना पण वरूण ने त्याच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला होता हे आपल्याला मान्य करावंच लागेल.