Friday, July 5, 2024

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

आज मराठी मनोरंजनविश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटांमधील दिग्गज आणि जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अल्पशा आजाराने अखेरचा श्वास घेतला. १८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर दुपारी १२ वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

भालचंद्र कुलकर्णी यांनी कोल्हापूर येथे एका खासगी शाळेत शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम केले होते. सोबतच त्यांनी माहेरची साडी, शुभ बोल नाऱ्या, शिवरायांची सून, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, जावयाची जात, पिंजरा अशा तब्बल ३०० पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. शिवाय ज्या हिंदी चित्रपटांचे कोल्हापुरात चित्रीकरण व्हायचे अशा हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. रा. छत्रपती शाहू मालिकेसह अनेक टीव्ही अनेक मालिकेतही ते झळकले होते.

भालचंद्र कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्व म्हणजे अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारश्रेणी असे होते. त्यांनी चित्रपटांमध्ये सासरे, पती, वडील अशा भूमिकांपासून ते नकारात्मक भूमिकांपर्यंत सर्वच प्रकारच्या भूमिका केल्या. त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने रेखाटली. कुलकर्णी यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सचिव म्हणून काही वर्षे आणि अनेक वर्षे संचालक म्हणून काम देखील सांभाळले होते.

भालचंद्र कुलकर्णी यांना महामंडळाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच चित्र भूषण पुरस्कारही देण्यात आला होता. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने,‘ब्रँड कोल्हापूरच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
…आणि शशी कपूर यांनी पूनम ढिल्लोच्या खाडकन वाजवली कानाखाली, उपस्थित लोकं फक्त पाहतच राहिले
कॉमेडियनच नाही, तर डान्सर म्हणूनही कमवलंय बरंच नाव, जावेद जाफरींबद्दल खास गोष्टी एकाच क्लिकवर

हे देखील वाचा