Tuesday, March 24, 2026
Home मराठी दु:खद! ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन; कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

दु:खद! ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन; कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

कोरोना व्हायरसने सर्वांना अक्षरश: हैराण करून सोडलं आहे. दररोज वाईट बातम्या ऐकायला मिळत आहेत. दिग्गज कलाकारांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे. अशातच आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे बुधवारी (१९ मे) कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अवघ्या टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कलर्स मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘जीव झाला येडापिसा’मध्ये भावे यांची भूमिका निभावली होती. त्यानंतर आता अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतील कलाकार आता पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त करत आहेत. अभिनेत्री सुमेधा दातारने आपल्या इंस्टाग्रामवर हेमंत यांचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “भावपूर्ण श्रद्धांजली” असं लिहायला मनच धजत नाहीये
हे दिलखुलास हास्य ,ही एव्हरग्रीन पर्सनॅलिटी सतत हसतमुख व्यक्तिमत्त्व कसे आहात विचारलं की स्टायलित उत्तर एकच …”ऐश” माझ्या आयुष्यातील पहिलं प्रोफेशनल रेकॉर्डिंग मी हेमंत जोशींबरोबर केलं, तिथपासून जीव झाला येडापिसा पर्यंतचा प्रवास… आणि काल अचानक भावे गेले … किती वेळ, अजूनही पटतच नाहीये जिथे कुठे असाल तिथे तुमच्या भाषेत “ऐश” करा.”

याव्यतिरिक्त अभिनेता सुप्रीत निकम यानेही एक भावुक पोस्ट लिहिली आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, “काय लिहू आणि कसं लिहू सुचेना.. हेमंत काका नुकताच “जीव झाला येडपिसा” मधून तुम्ही घराघरात पोहोचला होता. लोक तुम्हाला जोशी कमी आणि जीव झाला मधले भावे म्हणून ओळखायला लागले होते. तुमच्या किती आठवणी सांगू तितकं कमी आहे. मला आठवतो तो जळगाव ते सांगलीचा लांबचा प्रवास. त्या प्रवासात तुम्ही माझ्या सोबत नसता तर कदाचित डिप्रेशन मध्ये गेलो असतो मी. एकाच सिनेमात काम करताना एका निर्मात्याने माझे पैसे बुडवल्याने प्रचंड निराश आणि खचलेला मी आणि मला सावरणारे आणि धीर देणारे तुम्ही. तुमचं ते वाक्य कायमच लक्षात राहील “तुझे ७० हजार बुडाले पण ७० लाखांचा अनुभव घेतलास तू, स्वामी असा अनुभव प्रत्येकाला देत नसतात, डोकं शांत ठेव आणि ऐश कर” आज तुमच्या रूपाने मी माझा एक मित्र हो मित्रच गमावला. कारण वडीलधारी असूनही तुम्ही जवळच्या मित्रा पेक्षा कमी न्हवता. काका तुम्ही नेहमी तक्रार करायचात की मी फोन करत नाही.. आता कुणाला फोन करू..? शेवटचा भेटायचं ही राहून गेलं हेमंत काका. भावपूर्ण श्रद्धांजली हेमंत काका.” यासोबतच त्याने रडणाऱ्या ईमोजीचाही समावेश केला आहे.

https://www.facebook.com/supreetnikam/posts/5545675365503840

हेमंत जोशी यांनी आतापर्यंत नाटक, सिनेमा आणि मालिकेत काम केले होते. चित्रपटांबाबत बोलायचं झालं, तर त्यांनी ‘गणप्या गावडे’, ‘तेंडल्या’, ‘लायब्ररी’ आणि ‘बालगंधर्व’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्यांचा ‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेतील सहकलाकार असलेला रोहित हळदीकर याने शोक व्यक्त करत ही काळीज तोडणारी बातमी दिली. त्यांनी साकारलेली ही भूमिका फार गाजली होती.

हे देखील वाचा