Saturday, June 29, 2024

‘हा’ भारतीय लघुपट करणार यंदाची ऑस्करवारी, प्रत्येक भारतीयासाठी ठरणार अभिमानाची गोष्ट

मंडळी गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय सिनेसृष्टी ऑस्कर जिंकण्याचं स्वप्नं पाहत आहे. गेल्या अनेक वर्षात भारताने अनेक चित्रपट ऑस्करच्या प्रवेशासाठी पाठवले परंतु त्यापैकी फक्त तीनच चित्रपटांना नॉमिनेशन आजतागायत मिळू शकलं आहे. मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान! दरवर्षी अनेक सुंदर चित्रपट, उत्तमोत्तम कथा घेऊन प्रदर्शित होतात. दरवर्षी यातील एका सर्वोत्तम चित्रपटाची भारतातर्फे अधिकृतरीत्या अकादमी पुरस्कारांसाठी पाठवणी केली जाते. यासोबतच प्रत्येक भारतीयाच्या ऑस्कर जिंकण्याच्या आशा पल्लवित होतात. परंतु आपले सिनेमे नॉमिनेशन मिळवण्याच्या स्पर्धेतच मागे पडतात आणि नेहमीप्रमाणे आपल्या हाती निराशा लागते. असं असलं तरी यावर्षी जलीकट्टू हा सिनेमा ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवला गेला तर विद्या बालन हिच्या नटखट या लघुपटाची देखील ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. चला तर मग या नटखटची आजपर्यंतची कामगिरी पाहुयात!

विद्या बालन स्टारर लघुपट नटखट अकादमी पुरस्कार (ऑस्कर)- २०२१ च्या स्पर्धेत सहभागी झाला आहे. चित्रपट निर्माती कंपनी रॉनी स्क्रूवाला व्हिडिओ प्रोडक्शनने आपल्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलं आहे कि, ‘आम्ही नटखट हा लघुपट पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आणि हा संदेश देण्यासाठी बनवला आहे कि, बदल हा आपल्या घरापासून सुरू होत असतो. ऑस्कर-२०२१ च्या लघुपट विभागाच्या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आम्ही उत्साहित आहोत.’

ऑस्करच्या स्पर्धेत या चित्रपटाचा समावेश झाल्याबद्दल विद्या बालनने आनंद व्यक्त केला आणि सांगितलं की, ‘या वर्षात आमचा लघुपट ऑस्करसाठी पात्र ठरल्याने आम्हाला आनंद झाला. हा लघुपट माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. या लघुपटाने मला अभिनेत्री आणि निर्माती अशा दुहेरी भूमिका साकारण्याची संधी दिली आहे.’

त्याचवेळी चित्रपटाचे दिग्दर्शक शान व्यास म्हणाले की, ‘चित्रपट ऑस्कर शर्यतीत सामील झाल्याने मला खूप आनंद झाला आहे. हा लघुपट शॉर्टलिस्ट झाल्यास आपल्या सिनेमाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोण बदलेल आणि कल देखील वाढेल.’

लघुपटाची कथा एका आईच्या भोवती फिरत आहे. तिचा शाळकरी मुलगा सोनू कुटुंबातील इतर पुरुषांप्रमाणेच स्त्रियांकडे चुकीच्या नजरेने आणि अपमानाने पाहतो हे तिच्या लक्षात येतं. विद्या बालनने ३३ मिनिटांच्या या लघुपटाद्वारे निर्माती म्हणून पदार्पण केलं आहे. या चित्रपटात तिने एका गृहिणीची भूमिका साकारली, जिचं घर पुरुष चालवित असतात. या चित्रपटामध्ये सुंदर पद्धतीने आई-मुलाच्या नात्याचे चित्रण केलं आहे.

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळातही नटखटने आपला प्रवास सुरूच ठेवला आणि जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्याचं स्क्रिनिंग केलं गेलं. या लघुपटाचा जागतिक प्रीमियर ट्रीबेकाच्या वी आर वन: ए ग्लोबल चित्रपट महोत्सव येथे २ जून २०२० रोजी झाला. त्यानंतर इंडियन चित्रपट महोत्सव स्टटगार्टमध्ये १५ ते २० जुलै २०२० दरम्यान हा लघुपट दाखवला गेला.

या लघुपटाने जर्मन स्टार ऑफ इंडिया पुरस्कार जिंकला आहे. लंडन इंडियन चित्रपट महोत्सव, दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव, ऑरलँडो / फ्लोरिडा चित्रपट महोत्सव इत्यादी महोत्सवांमध्ये या लघुपटला आमंत्रित केलं गेलं होतं. मेलबर्न येथे भारतीय चित्रपट महोत्सवातदेखील १६ ते २३ ऑक्टोबर २०२० दरम्यान या लघुपटाचं स्क्रिनिंग झालं होतं. चित्रपटाने बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल हा पुरस्कार जिंकला. आता हा लघुपट ऑस्कर जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हे देखील वाचा