मराठी मनोरंजनसृष्टी आज तिच्यात असणाऱ्या नाविन्यामुळे, दर्जेदार सिनेमांमुळे आणि प्रतिभासंपन्न कलाकारांमुळे ओळखली जाते. कोणत्याही साच्यात न अडकता नवनवीन विषयांवर चित्रपट तयार करण्याचा हातखंडा कदाचित मराठी चित्रपटांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही भाषेच्या चित्रपटांमध्ये तरी नाही. याच मराठी मनोरंजनविश्वाने असंख्य दर्जेदार कलाकार दिले, ज्यांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांना त्या- त्या भूमिका जिवंत पडद्यावर दाखवल्या. मराठीमधील असेच दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते म्हणजे विजय चव्हाण. आपल्या अस्सल विनोदांमधून रसिकांना खळखळून हसवण्याची महारथ असणारे विजय चव्हाण म्हणजे विनोदी भूमिकांचे विद्यापीठच जणू. ‘मोरूची मावशी’ नाटकापासून ते अगदी ‘जत्रा’ चित्रपटापर्यंत असंख्य कलाकृतींमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाची ताकद प्रेक्षकांसमोर आणली. 24 ऑगस्ट याच महान अभिनेत्याचा स्मृतिदिन आहे.
जवळपास 350-400पेक्षा अधिक हिंदी- मराठी चित्रपटांमध्ये आणि असंख्य नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांचा कॉमिक टायमिंग अतिशय अचूक होता. त्यांचा जिवंत अभिनय पाहून विजय चव्हाण यांना मराठीमधील अनुपम खेर म्हटले जायचे. त्यांनी बहुतकरून विनोदीच भूमिका त्यांच्या कारकिर्दीत साकारल्या. विजय चव्हाण यांचा जन्म 2 मे,1955 मध्ये मुंबईतील लालबागमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. अभिनयाची आवड त्यांना इथूनच लागली.
विजय चव्हाण हे त्यावेळी होणाऱ्या प्रत्येक नाटकाच्या तालमीला हजर असायचे. एकदा एकांकिकेच्या वेळी नाटकातला एक स्पर्धक गैरहजर राहिला, तेव्हा जेष्ठ अभिनेते विजय कदम यांनी विजय चव्हाण यांना त्या स्पर्धकाची भूमिका देऊ केली. अशा पद्धतीने विजय कदम यांनी विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका मिळवून दिली. विजय कदम यांनी विजय चव्हाण आणि अजून एका मित्राला सोबत घेत ‘रंगतरंग’ या नाट्यसंस्थेची सुरूवात केली.
‘मोरूची मावशी’ हे नाटक म्हणजे मिठाविना अन्न. मराठी नाटकांमधील अजरामर आणि अमाप लोकप्रियता मिळवलेले नाटक आहे. तसेच या नाटकातील सर्वच कलाकारांच्या आणि विशेष करून विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी ही स्त्री भूमिका अप्रतिम रंगवली. तुम्हाला माहित आहे का? हे नाटक विजय चव्हाण यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. सरावात पहिल्यांदा या नाटकासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांनाच विचारणा झाली होती. मात्र, प्रायोगिक रंगभूमीवर हे नाटक विजय चव्हाण सादर करायचे आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते.
त्यामुळे त्यांना जाणवले की, या नाटकासाठी आणि या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य आहेत. म्हणूनच लक्ष्मीकांत यांनी निर्मात्यांना विजय चव्हाणच हे नाटक व्यावसायिक मंचावर करतील असे सांगितले. या नाटकाने विजय चव्हाण यांना आणि त्यांनी साकारलेल्या स्त्री पात्राला तुफान लोकप्रियता मिळाली. या नाटकाचे जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक प्रयोग झालेत. ‘तू तू मी मी’ या नाटकात विजय चव्हाण यांनी 14 भूमिका साकारल्या होत्या. काही सेकंदात वेशभूषा बदलून ते रंगभूमीवर यायचे.
विजय चव्हाण यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मात करत यश मिळवले होते. त्यामुळे जमिनीशी नाळ जोडून कसे राहायचे, हे त्यांना उत्तम ठाऊक होते. त्यांचे राहणीमान देखील अत्यंत साधे होते. आजच्या काळात ज्याच्याशिवाय जगणे अवघड झालेल्या मोबाईलशिवायच विजय चव्हाण राहायचे. त्यांनी कधीही त्यांच्या आयुष्यात मोबाईल फोने वापरला नाही. त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी त्यांच्या लँडलाईन नंबरवर किंवा मुलाच्या फोनवर फोन करावा लागायचा. त्यांना कधीही मोबाईल वापरायला आवडलाच नाही.
त्यांच्या काही गाजलेल्या नाटकांमध्ये ‘कशात काय लफड्यात पाय’, ‘कशी मी राहू तशीच’, ‘कार्टी प्रेमात पडली’, ‘खोली नं. 5’, ‘झिलग्यांची खोली’, ‘जाऊ बाई हळू’, ‘टुरटूर’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’, ‘बाबांची गर्लफ्रेंड’, ‘मोरूची मावशी’, ‘हयवदन’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ आदी अनेक नाटकांचा तर ‘अशी असावी सासू’, ‘आली लहर केला कहर’, ‘घोळात घोळ’, ‘झपाटलेला’, ‘धुमाकूळ’, ‘जत्रा’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. विजय चव्हाण यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केले. त्यात ‘असे पाहुणे येती’, ‘माहेरची साडी’, ‘येऊ का घरात’, ‘रानफूल,’ ‘लाईफ मेंबर,’ आदी मालिकांया समावेश आहे.
अतिशय हुशार, प्रतिभावान अशा या कलाकाराने वयाच्या 63व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. ते काही काळापासूनच फुफ्फुसाच्या आजारशी लढत होते.
हेही नक्की वाचा-
–जय हो! ‘चंद्रयान-3’ मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्रींनी केला कौतुकाचा वर्षाव
–‘गदर 2’ची गाडी एकदम सुसाट! भारतातच नाही, तर ‘गदर 2’चा डंका जगभरात; अखेर केला 400कोटींचा आकडा पार