Friday, March 14, 2025
Home मराठी ‘चित्रपट यशस्वी होण्यामागे तुझ्या गोडव्याचा हातभार…’, म्हणत विजू माने यांनी प्राजक्ता माळीसाठी लिहिली खास पोस्ट

‘चित्रपट यशस्वी होण्यामागे तुझ्या गोडव्याचा हातभार…’, म्हणत विजू माने यांनी प्राजक्ता माळीसाठी लिहिली खास पोस्ट

पांडू‘ या चित्रपटाने आख्ख्या महाराष्ट्राला हसवले आहे. या चित्रपटात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या जोडीने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यातील प्रत्येक पात्राला एक खास ओळख आणि वजन होते. सोनाली कुलकर्णी ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. चित्रपटातील तिच्या बिनधास्त पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री आहे. चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत असली तरी देखील तिचा प्रेक्षकांवर एक सकारात्मक प्रभाव पडला आहे. ती अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

या चित्रपटात तिची भूमिका राजकारण्याची आहे. अत्यंत साध्या आणि गोड दिसणाऱ्या या अभिनेत्रीने या चित्रपटात अत्यंत कठोर भूमिका साकारली आहे. तरी देखील तिला या नवीन रूपात पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी प्रेक्षकांना हसवण्यात काहीही कसर ठेवली नाही. त्यांनी प्राजक्ताला खास या भूमिकेसाठी निवडले होते. त्यांनी आता प्राजक्तासोबत फोटो शेअर करून एक खास पोस्ट लिहिली आहे. (viju mane share a special post for prajkata mali on social media)

विजू माने यांनी प्राजक्तासोबत एक फोटो शेअर केला आहे तसेच तिचा एक सिंगल फोटो देखील शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “पांडूच्या निमित्ताने माझ्या एका मित्राचं जाहिरात शूटिंग सुरू होतं. मी सहज भेटायला म्हणून गेलो होतो. शब्बीर कॅमेराला होता आणि समोर एका मुलीचा क्लोज लागला होता. मी शब्बीरच्या कानात काहीतरी पुटपुटलो आणि शब्बीर मोठ्याने ओरडला, अरे ती स्पेशलवाली लाईट मागवा रे. लाईटमन गडबडला. शब्बीरने डोळ्याने काहीतरी खाणाखुणा केल्या. तो जाऊन लाईट घेऊन आला. तिच्यासमोर ठेवून ऑन केला. तिला सांगितले की, हा जो लाईट आहे हा लोकांच्या मनातले ओळखतो. आधी तिने काहीही असं पुणेरी थाटात म्हटलं खरं, असं कुठे असतं का? वगैरे म्हणाली. मग शब्बीरने लेन्समधून पाहिलं. तिला म्हणाला, तू भरतनाट्यम फार भारी करतेस. करेक्ट? ती हैराण होण्याची पहिली पायरी. तुझे बाबा पोलिसात आहेत. अचंबीत होण्याची पहिली पायरी. तू पुण्याहून पोलिसांच्या एका कार्यक्रमात चारशे मुलांना घेऊन सादरीकरण केलं होतं, बरोबर ?”

त्यांनी पुढे लिहिले की, “आता मात्र तिला पटलं की, खरंच असा लाईट आहे जो लोकांच्या मनातल्या ओळखतो. तिच्या चेहर्‍यावर आश्चर्य ओसंडून वाहत होतं. ती आळीपाळीने त्या लाईटकडे मग कॅमेराकडे मग शब्बीरकडे पाहत होती आणि मग थोड्या वेळाने युनिटमधील इतरांना कीव आल्यावर तिला खरं सांगितलं की, मी एका कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणा म्हणून गेलो असताना. त्यावेळेस तिने ते सादरीकरण केलं होतं. मी प्रत्येक वेळी शब्बीरच्या कानात जाऊन सांगायचो आणि मग शब्बीर लेन्समधून पाहिल्यासारखं करायचा आणि तिला तसं सांगायचा.”

त्यांनी पुढे लिहिले की, “ती निरागस मुलगी म्हणजे प्राजक्ता माळी. तिच्या हसण्यात एक प्रकारचा गोडवा आहे. जो समोरच्या माणसाचं मन प्रसन्न होण्यास पुरेसा असतो. ‘पांडू’ सिनेमाकरता मी जेव्हा तिला विचारलं, तेव्हा खरंतर तिला मुख्य भूमिकेची स्वाभाविकपणे अपेक्षा होती. पण तसं न झाल्यावरही तिने या टीमचा भाग घेण्यास प्राधान्य दिले. भूमिकेची लांबी किती आहे? यापेक्षा भूमिकेची पांडू (डेप्थ) खूप कमी अभिनेते-अभिनेत्री यांना कळते. प्राजक्ताला व्यक्तिरेखेची डेप्थ कळलीच आहे, पण तिला त्या व्यक्तिरेखेचं भविष्य देखील कळलं. पांडूच्या निमित्ताने व्यवसायिक चित्रपटासाठी म्हणून हिच्यासोबत पहिल्यांदा काम केलं. अर्थातच ही सुरुवात आहे असे मी म्हणेन. ‘पांडू ‘चित्रपट यशस्वी होण्यामागे तुझ्या गोडव्याचा हातभार आहे हे निश्चित. थँक यू फोर बीईंग पार्ट ऑफ टीम पांडू.”

त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. अनेकजण या पोस्टवर कमेंट करून प्राजक्ता माळीच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा :

नीना गुप्ता यांनी नवीन वर्षात मुलगी मसाबासाठी तयार केले ‘हे’ तीन कडक नियम

डिपनेक लाँग गाऊनमध्ये खुलले माधवी निमकरचे सौंदर्य, नवीन फोटो आले चर्चेत

दहा वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची सुपरबोल्ड निया शर्मा, फोटोमध्ये ओळखनेही आहे कठीण!

 

हे देखील वाचा