Sunday, June 8, 2025
Home मराठी ‘द फॅमिली मॅन दोन’च्या प्रदर्शनाची तारीख झाली जाहीर! वेबसिरीजचं मोशन पोस्टर प्रदर्शित!

‘द फॅमिली मॅन दोन’च्या प्रदर्शनाची तारीख झाली जाहीर! वेबसिरीजचं मोशन पोस्टर प्रदर्शित!

गेल्या काही वर्षांपासून आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि तिथे उपलब्ध असणाऱ्या वेबसिरीज पाहण्याची सवयच झाली आहे. मर्यादित भागांच्या या वेबसिरीजमध्ये झटकन आणि पटकन मनोरंजनाचा एक वेगळाच डोस मिळतो. सेक्रेड गेम्स, आश्रम, पाताललोक, मिर्झापुर, द विचर, समांतर, स्ट्रेंजर थिंग्ज, अभय, असुर, स्पेशल ऑप्स ही काही मोजकीच नावं इथे नमूद करतोय परंतु फार वेगवेगळे विषय आणि कल्पना या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. आपण जर वेबसिरीज पाहिल्या नसतील तर लवकरच पाहायला सुरुवात करा.

अशाच उत्तम कलाकृतींपैकी एक कलाकृती म्हणजे मनोज बाजपेयी स्टारर ‘द फॅमिली मॅन’ ही वेबसिरीज! मनोज वाजपेयी स्टारर वेबसिरीजमध्ये, एक मध्यमवर्गीय व्यक्ती टी.ए.एस.सी. साठी गुप्तहेर अधिकारी म्हणून काम करतो. जी राष्टीय अन्वेषण विभागाची बनावट शाखा आहे. अशी या वेबसिरीजचं थोडक्यात कथानक आहे. या वेबसिरीजद्वारे मनोज बाजपेयी यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं. मनोज बाजपेयींचा अभिनय आणि वेबसिरीजची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की प्रेक्षक या वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनची वाट पाहत होते. तर या सर्व प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे त्यांची प्रतीक्षा आता संपली असून द फॅमिली मॅन चा दुसरा सिझन कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार आहे ही वेबसिरीज चला पाहुयात!

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज ‘द फॅमिली मॅन’ सीझन २ चं पहिलं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलं होतं. यानंतर आता या वेबसिरीजचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यासोबत वेबसिरीजच्या प्रदर्शनाची तारीख या मोशन पोस्टरमध्ये नमूद करण्यात आली आहे. आता ही वेबसिरीज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या वेबसिरीजचे चाहते आतापासूनच १२ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहत असतील हे आपल्याला काही वेगळं सांगायला नको… आपण स्वतःसुद्धा त्यापैकी एक असालच की!

सीझन १ प्रदर्शित झाल्यापासून ‘द फॅमिली मॅन’ ला जगभरातून खूप प्रेम आणि कौतुक मिळालं. राज आणि डीके निर्मित तसंच दिग्दर्शित ‘द फॅमिली मॅन’ सीझन २ आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर १२ फेब्रुवारीला प्रसारित होईल. प्रिया मणी आणि शरद केळकर यांच्यासमवेत मनोज बाजपेयी आणि शरब हाश्मी हे कलाकार त्यांच्या भूमिकांमध्ये पुन्हा एकदा झळकताना दिसतील. या वेबसिरीजमधून दाक्षिणात्य सुपरस्टार सामंता अक्किनेनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. काय मग आहात ना उत्सुक या वेबसिरीजचा दुसरा सिझन पाहण्यासाठी…

हे देखील वाचा