Monday, July 1, 2024

‘त्या’ व्हिडिओत सलमानने दिलेले वचन केले पूर्ण; शाहरुख संकटात असताना धावला त्याच्या मदतीला

सध्या माध्यमांमध्ये एकच विषय झळकत आहे, ते म्हणजे आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरण. सुपरस्टार शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानबाबत जरा जास्तच चिंतेत आहे. क्रूझ अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन चांगलाच अडकताना दिसत आहे. यावेळी तो एनसीबीच्या ताब्यात आहे. गुरुवारी (०७ ऑक्टोबर) आर्यनचा एनसीबीच्या कोठडीतील शेवटचा दिवस आहे. शाहरुखचे पूर्ण कुटुंब आर्यनबाबत चिंतेत आहे. बॉलिवूड कलाकारांनी शाहरुखला पाठिंबा दिला आहे. अनेकजण त्याच्या घरीही पोहोचले आहेत. अशामध्ये शाहरुख आणि सलमान खानचा एक जुना व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शाहरुख म्हणत आहे की, कधीही त्याच्या कुटुंबावर संकट आले, तर सलमान नेहमी त्यांच्यासोबत उभा राहील.

नुकतेच सलमान खानने या जुन्या व्हिडिओत म्हटलेली गोष्ट खरी करून दाखवली आहे. सलमानला जशी शाहरुखचा मुलगा आर्यनच्या अटकेची बातमी मिळाली, तसा तो लगेच शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला. सलमान या संकटाच्या काळात शाहरुखसोबत उभा राहण्यासाठी तात्काळ त्याच्या घरी हजर झाला. यावेळी त्याच्यासोबत त्याच्या बहिणी आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानही उपस्थित होती. (When Actor Shahrukh Khan Told Salman Khan You Are With Me When My Family Is In Trouble)

जुन्या व्हिडिओत काय म्हणाला होता शाहरुख?
आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात फसल्यानंतर सोशल मीडियावर शाहरुख आणि सलमान यांचा एक जुन्हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सलमानच्या एका गेम शोचा आहे. यामध्ये शाहरुख आणि राणी मुखर्जी पोहोचले होते. या व्हिडिओत सलमानने शाहरुखला वचन दिले होते की, तो प्रत्येक कठीण काळात शाहरुखला पाठिंबा देईल.

या व्हिडिओत सलमान खान, शाहरुख खानला विचारत आहे की, त्याच्या असा कोणी व्यक्ती आहे, जो सुख आणि दु:खात त्याची साथ देईल? यावर शाहरुख म्हणतो की, “सलमान जर मी कधीही संकटात असेल, तेव्हा तू आहेस. माझ्यापेक्षा अधिक माझे कुटुंब जर संकटात असेल, तेव्हा तू तिथे असशील.” शाहरुखचे हे वाक्य ऐकून सलमान म्हणतो की, “एकदम बरोबर.” यानंतर सलमान शाहरुखला मिठी मारतो.

शाहरुख खानचे सांत्वन करण्यासाठी आर्यनच्या अटकेनंतर लगेच सलमान त्याच्या घरी पोहोचला होता. त्याने असे करून फक्त आपली मैत्री निभावली नाही, तर दिलेले वचनही पूर्ण केले. केवळ सलमानच नाही, तर शाहरुखही सलमानची सोबत देऊन आपली मैत्री निभावतो.

हे देखील वाचा