‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीना कुमारी (meena kumari) यांनी आपल्या स्टाईल आणि चित्रपटांमधील अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. चित्रपटातील त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असायचे. मीना कुमारीबद्दल बरेच किस्सेही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बालपणापासून ते चित्रपटांपर्यंतचा प्रवास, प्रेमापासून ते विवाहित जीवन आणि दारूच्या व्यसनाधीन होण्यापर्यंतच्या आयुष्यात, मीना कुमारी यांनी खूप काही सहन केले आहे. यामुळेच लोक त्यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून संबोधू लागले. पण त्यांचा एक किस्सा असा आहे, जो खूप प्रसिद्ध झाला होता. हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अभिनेत्री मीना कुमारीची माफी मागितली होती.
मीना कुमारी यांनी 1939 ते 1972 या काळात चित्रपटात काम केले आणि हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. त्याकाळी त्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवायच्या आणि त्यांचे चित्रपट चित्रपटगृहात जबरदस्त हिट व्हायचे. परंतु असे असूनही, देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मीना कुमारी यांना ओळखले नाही. खरं तर लाल बहादूर शास्त्री यांना ‘पाकीजा’ चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी मुंबईतील एका स्टुडिओत बोलावले होते. महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून त्यांना येण्यासाठी इतका दबाव होता की, ते नाही म्हणू शकले नाही आणि शूटिंग पाहण्यासाठी स्टुडिओत पोहोचले.
कुलदीप नायर यांनी आपल्या ‘ऑन लिडर्स अँड आयकॉन: फ्रॉम जिन्नाह टू मोदी’ या पुस्तकात लिहिले आहे की, ”त्यावेळी बरेच मोठे तारे तेथे हजर होते. मीना कुमारींनी लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पहार घातला. शास्त्री जी यांनी मला अतिशय विनम्रतेने विचारले, या बाई कोण आहेत? आश्चर्यचकित होत मी त्यांना सांगितले की ‘मीना कुमारी.’ शास्त्री यांनी आपले अज्ञान व्यक्त केले. तरीही त्यांनी जाहीरपणे ते स्वीकारावे, अशी मी कधीही अपेक्षा केली नाही.”
कुलदीप नायर यांनी पुढे लिहिले, “शास्त्री जी ही गोष्ट सार्वजनिकपणे विचारतील, असे मला कधी वाटले नव्हते. तथापि, शास्त्रीजींच्या या भोळेपणाने आणि प्रामाणिकपणाने मी मनापासून प्रभावित झालो. नंतर लाल बहादूर शास्त्री त्यांच्या भाषणात मीना कुमारींना संबोधित करत म्हणाले, ‘मीना कुमारी जी, मला माफ करा. तुमचे नाव मी प्रथमच ऐकले आहे.’ देशाच्या पंतप्रधानांनी ज्याप्रकारे जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली, हे लोकांना खूप आवडले. पण त्यावेळी कोट्यावधी मनावर राज्य करणाऱ्या मीना कुमारी यांच्या चेहर्यावर मात्र थोडे लाजल्यासारखे झाले होते.
मीना कुमारी यांनी वयाच्या 7 व्या वर्षापासूनच चित्रपटात काम करण्यास सुरवात केली. यानंतर त्यांच्याकडे एकापेक्षा एक चित्रपट आले आणि त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. अभिनेत्रीने आपल्या आयुष्याची 33 वर्षे सिनेमाला दिली. त्यांनी ‘पाकीजा’, ‘मेरे अपने’, ‘आरती’, ‘परिणीता’, ‘बैजू बावरा’, ‘दिल अपना और प्रीत परई’, ‘साहेब बीवी और गुलाम’, ‘दिल एक मंदिर’ आणि ‘काजल’ असे अनेक चित्रपट केले आहेत.
अधिक वाचा-
–‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांच्या हाताला दुखापत, नेटतरी म्हणाले, ‘कुठे धडपडला…”
–भयानक अपघाताचा शिकार झाल्या होत्या मीना कुमारी, तर ‘यामुळे’ ओढणीने लपवायच्या आपला डावा हात