Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड वाढदिवस विशेष- जेव्हा क्रिकेटचा ‘देव’ सचिनने दिला होता सुशांतला क्रिकेटमध्ये येण्याचा सल्ला

वाढदिवस विशेष- जेव्हा क्रिकेटचा ‘देव’ सचिनने दिला होता सुशांतला क्रिकेटमध्ये येण्याचा सल्ला

सरत्या वर्षात भारतात अभिनेता सुशांत सिंगची मोठी चर्चा झाली. सुशांतने भारतात लॉकडाऊन सुरु असताना राहत्या घरात आत्महत्या केली. एका प्रतिभावान कलाकाराच्या मृत्युमूळे सिनेप्रेमी व चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली होती. त्याचे पुढे राजकारणही झाले. ते राजकारण अगदी सहा-सात महिने पुरले. परंतू एका चांगल्या अभिनेत्याचे जाण्याचे सिनेसृष्टीचे झालेले नुकसान भरुन न येण्यासारखे होते. आज सुशांत असता तर तो आपला ३५वा वाढदिवस साजरा करत असता. अशाच या अकाली गेलेल्या अभिनेत्याबदद्ल आज आम्ही तुम्हाला वाढदिवसाचे औचित्य साधून काही खास गोष्टी सांगणार आहोत. तसेच त्याच्या जीवनप्रवासावरही प्रकाश टाकणार आहोत.

२१ जानेवारी १९८६ ला पटना येथे सुशांत सिंग राजपूतचा जन्म झाला. दिल्लीमध्ये इंजीनिअरिंगला असताना सुशांतने शामक दावरचा डान्स ग्रुप जॉईन केला. त्यानंतर त्याने देश-विदेशात अनेक डान्स शो केले. २००८ मध्ये सुशांतला ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. नंतर ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत लीड रोल मिळाला. इथूनच त्याचे नशीब पालटले आणि त्याला ओळख मिळाली. सुशांतने अथक मेहनतीने त्याने टेलिव्हिजन इंडस्ट्री ते बॉलिवूड असा प्रवास मोठा आणि अवघड प्रवास केला. टीव्हीसृष्टीत शिखरावर असताना त्याने बॉलिवूडची वाट धरली आणि तिथेही आपल्या पहिल्याच चित्रपटाने त्याने सर्वाना त्याची दखल घ्यायला भाग पडले.

सुशांत सिंगने त्याच्या जिवंत अभिनयाने कलाकारांसोबतच प्रेक्षकांचीही मनं जिंकली. सुशांत हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ, करियरच्या आणि यशाच्या उंचीवर असतानाच सुशांतने १४ जून २०२० ला स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवले. आज त्याला जाऊन अनेक महिने उलटले मात्र अजूनही सुशांत आत्महत्या का केली हे कोडे उलगडले नाहीये.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून सुशांतला जबरदस्त लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. सुशांतने ‘काय पो चे’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. त्याच्या सहजसुंदर अभिनयाने सर्वानाच आपलेसे केले. ‘धोनी’ सिनेमाने तर त्याला बॉलिवूडमध्ये अढळ स्थान मिळवून दिले. मात्र वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. आज याच सुशांतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सुशांतच्या आयुष्याशी संबंधित काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

१) सुशांत त्याच्या आईच्या खूप जवळ होता. त्याचे त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होते. ही गोष्ट त्याने त्याच्या अनेक मुलाखतींदरम्यान सांगितली. जेव्हा २००२ मध्ये सुशांत केवळ १६ वर्षाचा असताना त्याच्या आईचे निधन झाले तेव्हा तो खूप खचला होता. सुशांतने अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या आईबाबत भावनिक पोस्ट शेयर केल्या होत्या.

२) सुशांतने पटनाच्या सेंट कॅरन्स हायस्कुल मधून शालेय शिक्षण घेतले, त्यानंतर त्याने दिल्लीच्या कॉलेजमधून मेकॅनिकल इंजीनियरिंगचा अभ्यास केला. सुशांतला अभ्यासाची खूप आवड होती. तो अभ्यासातही हुशारही होता. इंजीनियरिंगच्या प्रवेश परीक्षेत त्याने सातवी रँक मिळवली होती. मात्र अभिनयात येण्यासाठी त्याने शिक्षण सोडून मुंबई गाठले.

३) सुशांतने दिल्लीमध्ये असताना प्रसिद्ध अशा शामक डावर डान्स ग्रुपमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्याने अनेक शो केले. ५१ व्या फिल्मफेयर पुरस्कारांच्या सांगता समारोहात त्याने बॅकग्राउंड डान्सर म्हणून डान्स केला. मुंबईला आल्यानंतर त्याने नादिरा बब्बर यांच्या नाटकांचा ग्रुप जॉईन केला. सोबतच त्याने बॅरी जॉन यांच्या अकादमी मधून अभिनयाचे प्रशिक्षण देखील घेतले.

४) २००८ साली सुशांतने ‘बालाजी टेलिफिल्म्स’ च्या एका सिरियलसाठी ऑडिशन दिले, आणि त्याची ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेतल्या ‘प्रीत जुनेजा’ या भूमिकेसाठी निवड झाली. त्यांनतर त्याने २००९ साली आलेल्या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत ‘मानव’ ही मुख्य भूमिका साकारली आणि तो प्रसिद्ध झाला.

५) ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या दरम्यान सुशांत आणि त्याची सहकलाकार अंकिता लोखंडे रिलेशनशिपमध्ये आले. त्यांनी साखरपुडा देखील केला होता, मात्र २०१६ साली त्यांचे नाते संपुष्टात आले.

६) सुशांतला लहानपणापासूनच क्रिकेटर बनायचे होते. एकदा सुशांत ‘धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटासाठी क्रिकेटची प्रॅक्टिस करत असताना, सचिन तेंडुलकरने त्याला एक शॉट मारताना पहिले, आणि म्हणाला ‘ मला विश्वास होत नाहीये की तू एक अभिनेता आहेस, हा शॉट तू एखाद्या प्रोफेशनल क्रिकेटर प्रमाणे मारला आहेस. तुझी इच्छा असेल तर तू नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेट खेळशील.’

७) ‘धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटासाठी सुशांतने १८ महिने क्रिकेटचा सराव केला. ज्यात त्याने ९ महिने ग्राउंडवर प्रॅक्टिस केली. धोनीची भूमिका पडद्यावर साकारणे सोपे नव्हते मात्र सुशांतने त्याच्या मेहनतीच्या जोरावर ही भूमिका अतिशय सुंदर साकारली.

८) धोनीच्या पद्धतीने क्रिकेट तो शिकलाच मात्र या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना तो एक उत्तम फलंदाज झाला. तो नेट्स मध्ये प्रॅक्टिस करत असताना तीन तासात एकदाही बाद झाला नाही. त्याची ही गोष्ट भारतीय क्रिकेटचे माजी कॅप्टन किरण मोरे यांना खूप भावली, म्हणून त्यांनी सुशांतला त्यांची टीम इंडियाची जर्सी भेट म्हणून दिली. त्यावेळी त्याने जर्सीसोबत एक फोटो ट्विटरवर देखील टाकला होता.

९) सुशांतने अनेकदा सार्वजनिक ठिकाणी त्याचे शाहरुख बद्दल असलेले प्रेम व्यक्त केले. अनेक कार्यक्रमात तो शाहरुख बद्दल भरभरून बोलायचा. एकदा त्याने शाहरुखच्याच एका कार्यक्रमात सांगितले होते की, सुशांत शाळेत असताना मुलींना इंप्रेस करण्यासाठी शाहरुखची नक्कल करायचा.

१०) सुशांतला ऍस्ट्रॉनॉमीमध्ये खूप आवड होती. तो नेहमी त्याच्या घरातून तारे बघत बसायचा. यासाठी त्याने एका भलामोठा टेलिस्कोप देखील घेतला होता. असे म्हणतात की त्याने चंद्रावर जमिनीचा काही भाग देखील खरेदी केला होता.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा