मोठ्या पडद्यावर हिरो नेहमीच व्हिलनला धोपटताना दिसतो. एकटा हिरो समोर असणाऱ्या एका नाही, तर ५-५ अन् १०-१० गुंड्यांची जाम धुलाई करतो, आणि आपल्यालाही ते पाहायला लय भारी वाटतं. पण मंडळी हे पडद्यावरचं झालं बरं का. खऱ्या आयुष्यात हिरो लोकांनी असं वागणं म्हणजे जास्तच होईल, पण जर खऱ्या आयुष्यातच हिरोला फटके पडले, तर…? आता तुम्हीही म्हणाल, हे कसं काय होईल बरं तो तर हिरो आहे ना. पण थांबा. असा एक हिरो आहे, ज्याला खऱ्या आयुष्यात मार खावा लागलाय अन् तेही त्याच्या चाहत्याकडून. तो हिरो म्हणजेच सैफ अली खान (Saif Ali Khan).
हा किस्सा आहे १९९४ सालचा. त्यावेळी नुकताच नवाब सैफच्या ‘मैं खिलाडी तू अनाडी’ सिनेमाचा प्रीमिअर झालेला. आता आपला सिनेमा येतोय म्हणल्यावर इतर हिरोंसारखंच सैफ भाऊही पार्टीच्या मूडमध्ये होता. त्यामुळं प्रीमिअरच्या रात्रीच सैफ मुंबईच्या नाईट क्लबमध्ये आपल्या मित्रांसोबत गेला. त्यावेळी त्याला अन् त्याच्या मित्रांना मजा करायची होती. पण तिथंच माशी शिंकली. दोन पोरी तिथं आल्या. त्यांनी सांगितलं की, त्या सैफच्या डाय हार्ट फॅन आहेत, अन् त्यांना सैफसोबत काही वेळ डान्स करायचाय. पण लगेच पोरींना होकार देईल तो सैफ कसला. तोही म्हणाला, त्याला आता असलं काहीच करायचं नाहीये कृपया हे राहूच द्या. पण पोरीही काही कमी नव्हत्या. त्यांनी सैफचं एक ऐकलं नाही. त्या पोरींसोबत त्यांचे बॉयफ्रेंड्सही होते. सैफनं पोरींच्या बॉयफ्रेंड्सला समजावलं की, बाबांनो यांना तुम्ही घेऊन जावा. आम्हाला इथं कुणाशीही बोलायचं नाहीये.
पण सैफचं हे बोलणं ऐकून त्या बॉयफ्रेंडला राग आला. त्याने सैफला म्हटलं, हा जो तुझा चेहरा आहे, ज्यानं तू लाखो- करोडो कमावतो. तो मी बिघडवून टाकेल. सैफ काही बोलणार, तेवढ्यात त्याच्या डोक्यात एका मागं एक अशा बुक्क्या पडू लागल्या. यानंतर सैफ खूपच गंभीर जखमी झाला. एवढा मोठा वाद झाल्यानंतर मीडियामध्ये याच्या बातम्या येणारंच होत्या. असं म्हटलं जात होतं की, सैफ पोलीस तक्रार करेल. पण भाऊंनी कोणतीही तक्रार केली नाही. त्याचं म्हणणं होतं की, त्याला फुकटची चर्चा नकोय. कारण तो इंडस्ट्रीत नवखा होता. त्याला वैवाहिक आयुष्य जगायचं होतं. त्यामुळंच त्याच्या आणि अमृताच्या नात्यात कोणताही दुरावा येऊ नये म्हणूनच त्यानं हे प्रकरण बाहेर येऊ दिलं नाही.
मात्र, मीडियात या घटनेच्या बातम्या छापल्या होत्याच. तसेच त्यात असं म्हटलं गेलं होतं की, त्या क्लबमध्ये त्याच्यासोबत फक्त त्याचे मित्र नव्हते, तर अभिनेत्री ममता कुलकर्णी होती. नंतर सैफनं मीडियाशी बोलताना सांगितलं की, “त्या क्लबमध्ये त्याचा मित्र आणि तोच होता. ममता कुलकर्णी नव्हती. त्या पोरांनी मला बुक्क्या मारल्या त्यानंतर माझ्या कपाळावर एक निशाण बनले.” हे निशाण आजही सैफच्या कपाळावर आहे. पण प्रकरण जेव्हा बाहेर आलं, तेव्हा सैफला आपली पहिली पत्नी अमृताची माफी मागावी लागली. तो म्हणाला, इथून पुढं असं काही होणार नाही, ज्यामुळं तुझी मान खाली जाईल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा