मागच्या दोन महिन्यांपासून देशाच्या राजधानीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरु आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हे नवीन कृषी कायदे मागे केले जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल असा धमकीवजा इशारा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. त्यांच्या या आंदोलनाची दखल आता देशासोबतच परदेशातही घेतली जात आहे. सध्या हे आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत आहे. यापूर्वी या आंदोलनावर भारतातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मतं मांडली आहेत. यात आता हॉलिवूडची जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय पॉप सिंगर रिहानाचा देखील समावेश झाला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने या विशिष्ट परिसरातील इंटरनेट सेवादेखील बंद केली आहे.
रिहानाने नुकतेच या आंदोलनाची एक बातमी पोस्ट करत लिहिले आहे की, “आपण याबद्दल काहीच का बोलत नाहीये.” सोबतच तिने #FarmersProtest हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
why aren’t we talking about this?! #FarmersProtest https://t.co/obmIlXhK9S
— Rihanna (@rihanna) February 2, 2021
तिच्या या ट्विटला अनेक भारतीय कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर रिहाना चांगलीच चर्चेत आली आहे. ती सध्या इंटरनेटवर ट्रेंडिंग टॉपिकमध्ये अव्वल आहे.
या लेखातून जाणून घेऊया नक्की ही रिहाना आहे तरी कोण?
रिहाना ही हॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय पॉप सिंगर, अभिनेत्री, मॉडल आणि प्रसिद्ध व्यावसायिकसुद्धा आहे. रिहानाचे फॅन्स फक्त हॉलिवूडपुरता मर्यादित नसून संपूर्ण जगभर तिचे चाहते आहेत. रिहानाचं खरं नाव रोबिन रिहाना फेंटी असे असून तिचा जन्म २० फेब्रुवारी १९८८ साली झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासूनच तिने तिच्या करियरची सुरुवात केली.
२००५ साली रिहानाचा पहिला ‘म्युझिक ऑफ द सन’ अल्बम प्रसिद्ध झाला. रिहानाचा हा पहिलाच म्युझिक अल्बम बिलबोर्ड २०० चार्टच्या पहिल्या दहामध्ये पोहोचला होता. रिहानाला ट्विटरवर १०० मिलियन फॉलोवर्स आहेत. ट्विटरवर जगातल्या सर्वातजास्त फॉलोवर्स असणाऱ्या कलाकारांच्या यादीत राहणंच चौथा नंबर लागतो. तिने ‘Don’t stop the music’, ‘Love the way you lie’, ‘Umbrella’ असे हिट्स गाणे दिले आहेत. रिहानाने हॉलिवूडच्या बॅटलशिप आणि ‘Ocean’s 8’ सारख्या चित्रपटांमधून काम केले आहेत. ३२ वर्षीय रिहानाचा Fenty नावाचा एक फॅशन ब्रँड देखील आहे.
जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकाराच्या यादीत रिहानाचा समावेश आहे. रिहानाकडे तब्बल ६०० मिलिअन डॉलर्स संपत्ती असल्याचे सांगण्यात येते. रिहाना अनेकदा समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असते. ट्रम्प सरकाराने घेतलेल्या इमिग्रेशन संदर्भातील निर्णयावरही तिने टीका केली होती. नुकतेच तिने म्यानमारच्या विषयावरही ट्विट केले होते.